| कलाक्रिडा > संगीत > भावगीतांची दुनिया |
|
मराठी भावगीतांचा कालखंड साधारणपणे १९२५-१९७० हा आहे. त्यामध्ये १९४०-६० हा सुवर्णकाळ मानला जातो. श्री. गजाननराव वाटवे व लता मंगेशकर अशी दोन नावे चटकन आठवतात. ह्यांच्यामध्ये सुमारे ३०० स्त्री-पुरुष भावगीत गायक-गायिकांची यादी आहे. मराठी भावगीतांचा इतिहास अजून लिहिला जायचा आहे. तो लिहावा असा इथे हेतु नाही, पण त्यादिशेने टाकलेले छोटेसे पाऊल असे ह्या लेखमालेचे स्वरुप असणार आहे. भावगीत गायक/गायिकेची थोडक्यात माहिती, कामगिरीचा आढावा, एखाद्या गाण्याचे शब्द, त्यावेळची राजकीय, सामाजिक व सांस्कृतिक पार्श्वभूमी मांडावी असा विचार आहे. जी गीते ध्वनिमुद्रित झाली त्यातली फारच थोडी आजही ऐकायला मिळतात, त्यांची गोडी अवीटच आहे.
एका अंदाजाप्रमाणे सुमारे २००० भावगीते तरी लिखित स्वरूपात उपलब्ध आहेत. त्यातली काही ध्वनिमुद्रिकांवरती व आता ध्वनिफीती, सीडी वर ऎकायला मिळतात. आपल्या 'मनात' व 'गळ्यात' किती गाणी आहेत बरे? 'साहित्य प्रसार केन्द्र, मुंबई' ह्या प्रकाशनाने १९९० च्या सुमारास 'गाणी गळ्यातली, गाणी मनातली' चे ११ भाग प्रसिद्ध केले व गानरसिकांसाठी ११०० गाणी शब्दांसह सादर केली. त्याच्याही अगोदर १९६०-७० च्या दशकात मुंबई-पुण्यातील काही खाजगी प्रकाशकांनी 'गोड गोड भावगीते' चे अनेक भाग बाजारात आणले. एकेका गायक/गायिकेची सगळी लोकप्रिय गाणी पण पुस्तक रुपाने गानलुब्धांना मिळू लागली.
- सुरेश चांदवणकर
मानद सचिव, 'Society of Indian Record Collectors'
मुंबई
chandvankar@yahoo.com
|
|

|
|
|