MarathiWorld - Home
About Us About Marathi World Suggest a site Feedback Contact Site Map

कलाक्रिडा > संगीत > भावगीतांची दुनिया

अति गोड गोड ललकारी

अति गोड गोड ललकारी
सोड बुलबुला प्यारी तव न्यारी..........!ध्रु!

कशि लोपत माया गिरिधारी
झुरते राधा मनात भारी
आतां घे धाव झणि मुरारी
हा संदेश सांग सुखकारी.................!१!

गिरगांव मुंबईतले सुप्रसिद्ध शीघ्रकवी श्री. सदाशिव अनंत (स.अ.) शुक्ल यांचं हे भावगीत १९३८ साली श्री. जनार्दन लक्ष्मण (जे. एल.) रानडे ह्यांनी हिज मास्टर्स व्हाईस (H.M.V) कंपनी करीता ध्वनिमुद्रित केलं. भीमपलास रागातल्या ह्या गाण्यानं लोकप्रियतेचे व खपाचे नवीन विक्रम केले. त्यांचं छायाचित्र कंपनीच्या माहिती पुस्तिकेवर छापण्यात आलं. श्री. रानडे ह्यांनी पुढे सांगलीत टुमदार बंगला बांधला व त्याचं नाव 'ललकारी' असं ठेवलं.
जे. एल. रानडे ह्यांचा जन्म २७ मार्च १९०५ चा - इचलकरंजीतला! संगीताचं बाळकडू आईकडून मिळालं. १९११ साली वडील वारले. तीन मुलांच्या शिक्षणासाठी आईनं सांगलीला घर केलं. सिटी हायस्कुलात संगीत शिक्षणाला अनुकूल वातावरण होतं. आधी मोरोबा गोंधळी व नंतर गोडबोले गुरुजींकडून त्यांनी संगीताचे धडे गिरवले. भातखंडे, रा.ब.देवल व सी. क्लेमंट्स ह्यांचे ग्रंथ त्यांना अभ्यासायला मिळाले. १९२१ साली आई वारली व शिक्षण सोडून नोकरी करणं भाग पडलं. अहमदनगरच्या डिस्ट्रिक्ट कोर्टात कारकुनाची नोकरी मिळाली ती त्यांनी १९२७ ते १९५९ इतक्या प्रदीर्घ काळ केली. त्यावेळी श्री. सी. क्लेमंट्स डिस्ट्रिक्ट जज्ज होते. कोर्टाच्या चेंबरमध्येच संगीत शिक्षण व चर्चा होत असत. त्या काळात नगरला संगीताचं असं काहीच वातावरण नव्हतं. त्यामुळे गवई, संगीत शिक्षक अशी कारकीर्द त्यांनी सुरु केली. १९३६ पर्यंत दर शनिवारी पुण्यात विनायकबुवा पटवर्धनांकडे गाणं शिकायला नगरहून जात असत.
त्या काळात आकाशवाणी व ग्रामोफोन रेकॊर्डस ह्या द्वारे कलाकार प्रसिद्ध होत. नवीन कलाकारांना प्रोत्साहन मिळत असे. रानडे ह्यांचा आवाज सुरेल, ताना दाणेदार. गाणं मोजकं, पण रंजकपणे मांडत असत. बालगंधर्व, गोविंदराव टेंबे ह्यांची शिफारसपत्रं घेऊन रानडे मुंबईला आले. रेडियोत दिनकर अमेंबल व बुखारींना तर ग्रामोफोन कंपनीत रमाकांत रुपजी व जी.एन.जोशींना भेटले. परिणामी २४ डिसेंबर १९३३ रोजी त्यांचं रेडियोत पहिलं गाणं झालं तर जुलाई १९३४ मध्ये पहिली ध्वनिमुद्रिका निघाली. पुढे १९५२ पर्यंत ते ह्या दोन्ही माध्यमांत रमले. त्यांनी ४० ध्वनिमुद्रिका म्हणजे ८० गाणी मुद्रित केली. दुर्देवाने त्यातलं एकही गाणं कंपनीनं पुन्हा एल.पी./ई.पी. वर वितरित केलं नाही. शास्त्रीय, सुगम शास्त्रीय, मराठी भावगीतांच्या वैविध्य व वैशिष्टयपूर्ण ध्वनिमुद्रिका त्यांनी दिलेल्या आहेत. त्यांची काही गाजलेली गाणी - 'अति गोड गोड ललकारी', 'कलिका गोड नाचे छुमछुम','गोड गोड मुरली सखेगे','फुलल्या कळ्या प्रेमाच्या','नभि हसली चन्द्रिका चकोरा','नवल ही बासरी','आज सखी श्यामसुंदर','राहा उभी तशीच ग','वैरिणही रजनी प्रियविण'. त्यांचे गीतकार होते - श्री. स. अ. शुक्ल, ग. दि. माडगुळकर, भा. वि. वरेरकर, रा. ना. पवार, मा. ग. पातकर, बाबूराव गोखले व पांडुरंग दिक्षित. ही सर्व गाणी ७८ आर.पी.एम. तबकडयांवर असून एक गाणं तीन / साडेतीन मिनिटं वाजतं.
त्यांचं व्यक्तिमत्व प्रांजळ व पारदर्शी होतं. प्रापंचिक जीवनही मोठं सुखाचं गेलं. १९६० च्या सुमारास रिटायर झाल्यावर वर्धा येथे 'महिलाश्रम' मध्ये त्यांनी कार्यालयीन काम व संगीताचं शिक्षण अशी दुहेरी जबाबदारी पत्करली. अखिल भारतीय गांधर्व विद्यालयाच्या वर्धा शाखेचं काम त्यांनी १९६१ ते १९९१ पर्यंत पाहिलं. संन्यस्त व अलिप्त व्रुत्ती असल्यानं व आपला उपसर्ग मुलाबाळांना होऊ नये म्हणून अखेरीस ते व्रुध्दाश्रमात जाउन राहिले. १९९७ साली वयाच्या ९२ व्या वर्षात ते हे जग सोडून गेले. ध्वनिमुद्रण तंत्रातील बदलांचे ते साक्षीदार होते. त्यांच्या सर्व ध्वनिमुद्रिका संग्राहकांकडे सुरक्षित असून त्यांचं पुन्हा वितरण होणं आवश्यक आहे.

- डॉ.सुरेश चांदवणकर
मानद सचिव, ' सोसायटी ऑफ इंडियन रेकॉड कलेक्टर्स'
chandvankar@yahoo.com

 

 

इतर भावगीत लेख