कृष्णमूर्ती ज्योतिष

कृष्णमूर्ती पध्दतीच्या वेबसाईटसाठी येथे क्लिक करा. http://www.kpjyotish.com

वाटचाल ज्योतिषशास्त्राची

astrologyएका राजाच्या पदरी एक ‘मिहिर’ नावाचा ज्योतिषी होता. एकदा त्याने राजपुत्राची पत्रिका बघुन भविष्य वर्तवल की, हा राजपुत्र वयाच्या अमुक अमुक दिवशी एका ठराविक वेळी वराहाचे रानडुकराचे शिग पोटात घुसून मृत्यु पावेल. झालं! राजानं फर्मान सोडलं की राज्यात एकही रानडुक्कर शिल्लक राहता कामा नये. राजाच्या हुकुमानुसार राज्यात एकही रानडुक्कर शिल्लक राहीलं नाही. महिर नी सांगितल्यानुसार राजपुत्र त्या ठराविक वयाचा झाला. त्यांनी सांगितलेला तो दिवस देखील उजाडला महालातच त्याच्या कक्षात ठेवलं होतं, सतत पहारा होता मिहिर ज्योतिषाने सांगितलेली ती ठराविक वेळ झाली आणि राजाने मिहिरला सांगीतल की, बघ! तुझं भविष्य खोट झालं. मिहिर हसला व म्हणाला की, ‘शक्यच नाही. राजपुत्र कक्षात नाही. त्याला बोलावून बघा हवं तर! राजाने राजपुत्राला बोलावून आणायला माणसं पाठवली. राजपुत्र कक्षात नव्हता, सगळीकडे शोधाशोध सुरू झाली पण राजपुत्र मिळेना…काही वेळाने शिपायांनी बघितलं की राजपुत्र राजमहालाच्या गच्चीवरून खाली पडून राजाच्या राज्याचे प्रतिक असलेल्या वराहाच्या लोखंडी प्रतिकृतीचे शिंग पोटात घुसल्यामुळे मरण पावला आहे. राजाला राजपुत्राच्या मृत्युचे दुख: होऊन देखील ज्योतिष मिहिर च्या ज्ञानाची खात्री पटली होती. अशा या मिहिर ज्योतिषाला पुढे वराहमिहिर या नावाने ओळखले जाऊ लागले. ही झाली एक ऐतिहासिक गोष्ट, सांगायचा उद्देश हा की, ज्योतिषशास्त्र हे किती प्राचीन कालापासून अस्तित्वात आहे. याचा आपल्याला अंदाज येईल. नक्की ज्योतिषशास्त्राचा उगम कधी झाला? ह्या प्रश्नाचं उत्तर देण थोडसं अवघड आहे. पण अतिप्राचीन म्हणजे अगदी ऋषीमुनींच्या काळापासून ज्योतिषशास्त्र चालात आलेलं आहे पण अतिप्राचीन म्हणजे अगदी ऋषीमुनीनी व पुढे अनेक गुरुजनांनी व अभ् त्यात अनेक प्रकारे भर घातली. पुढे ज्योतिषशास्त्राच्या किंवा भविष्यकथनाच्या वेगवेगळ्या पध्दती अस्तित्वात येत गेल्या नुसती नावं घ्यायचे म्हटलं तरी पारंपारिक ज्योतिष पध्दती, कृष्णमूर्ती ज्योतिष पध्दती, हस्तसामुद्रीक, संख्याशास्त्र, लालाकिताब, रमल, लोलकविद्या, भृगृसंहिता, नाडी ज्योतिष इथपासून ते चायनीज ज्योतिषशास्त्र (chinese Astrology), टॅरोट (Tarrot) इथपर्यंत अनेक आहेत. काही ठिकाणी मेंढपाळ नुसते आकाशाकडे बघुन देखील काही गोष्टी वर्तवितात, असही मी ऐकलयं. दैवी उपासनेमुळे किंवा दैवी देणगी लाभलेले काहीजण हे अंर्तज्ञानाने देखील भविष्य कथन करतात. ह्या सर्व भविष्यकथनाच्या पध्दतीमधल्ये अभ्यासावर आधारलेल्या ज्योतिषपध्दतीमध्ये ‘कुंडलीशास्त्र’ म्हणजेच जन्मकुंडली द्वारे भविष्यकथन करण्याच्या पध्दती ह्या जास्त अचुक मानल्या जातात, कारण त्या व्यक्तीच्या जन्मतारीख, जन्म वेळ व जन्मठिकाणावर आधारीत ज्योतिष पध्दती आहेत. पत्रिकेद्वारे भविष्यकथनाच्या पध्दतीत, दोनच महत्वाच्या पध्दती आहेत त्या म्हणजे, पारंपारिक ज्योतिष पध्दती व कृष्णमर्ती पध्दती. त्यामध्ये देखील, कृष्णमूर्ती ज्योतिष पध्दती ही अचुकतेसाठी जास्त ओळखली जाते.

इतक्या अनेक वर्षांपासून ज्योतिषशास्त्र चालत आलेलं असलं तरी ते स्थितीशील मात्र नक्कीच नाही. मघाशी म्हटल्याप्रमाणे ज्योतिषशास्त्रात अनेक गुरूजनांनी व अभ्यासकांनी अनेकप्रकारे भर घातलेली आहे, त्यामुळे उगाचच ‘एवढ्या जुन्या काळाचे नियम आत्ता कुठे लागु होणार!’ असं म्हणून ज्योतिषशास्त्राला कमी लेखायची काही गरज नाही एवढी अनेक वर्ष होऊनदेखील पृथ्वी अजुन सुर्याभोवती फिरते आहे ना? चंद्र पृथ्वीभोवतीच फिरतो आहे ना? म्हणजेच काय, तर मुलभूत गोष्टी त्याच असतात पण एखाद्या विषयाची प्रगती होण्याकरीता त्यात भर घालावी लागते आणि ज्योतिषशास्त्रात मुख्यत्वेकरून ही भर घालावी लागते ती ज्योतिष नियमांच्या अवलंबाविषयी (application), म्हणजे कसं? समजा, १९५० साली एखाद्या माणसाने ज्योतिषाला विचारलं असत की, ‘मला वाहनसुख आहे का?’ तर ती एक विचार करण्यासारखी गोष्ट होती. कारण त्या काळात फक्त श्रीमंतांनाच ती चैन परवडत होती, पण हाच प्रश्न आजच्या काळात विचारला तर तो हास्यास्पद ठरेल कारण आज कनिष्ठ मध्यमवर्गाकडे देखील वाहनं (किमान दुचाकी तरी) असतचं! काही स्वत:ला अति बुध्दीमान समजणारी मंडळी काही वेळेला विचारतात की, ‘माहिती तंत्रज्ञान’ क्षेत्र (information technology) हे ज्योतिष शास्त्रात कसं बघणार? कारण प्राचीन काळी तर हे क्षेत्र अस्तित्वातच नव्हत! ज्योतिषशास्त्रामधे हे क्षेत्र मंगळ-बुधाच्या अंमलाखाली विचारात घेतलं जातं आणि ते विचारतात घेतल्याला सुध्दा आत्ता बराच काळ उलटून गेला आहे.

कुठलही भविष्यकथन करताना ‘काल’ आणि ‘स्थल’ याच भान सोडून चालत नाही. उदाहरणार्थ, पूर्वीच्या काळी मुला-मुलींची लग्न ही वयाच्या आठव्या-नवव्या वर्षीच होत. त्यावेळेला लग्न उशीरा होईल असं भविषयकथन केल्यास त्याचा अर्थ फार फार तर १२-१५ व्या वर्षी होईल, असा होत असले. पण, हेच भविष्यकथन सध्याच्या काळात केलं तर त्याचा अर्थ वयाच्या २८ नंतर किंवा कदाचित आणखी उशीरा असा देखील होऊ शकतो. ग्रह-तारे, राशी, ग्रहांचे भ्रमण ह्या सर्व गोष्टी तशाच असुन देखील काळ बदलल्यामुळे भविष्यकथनात फरक होत जातो, तो असा! भविष्यकाथनात ‘स्थळाचा’ देखील विचार करावा लागतो. समजा एखाद्या व्यक्तीच्या पत्रिकेत अमुक अमुक काळात घटस्फोट होण्याची शक्यता आहे, असं असेल आणि तो माणूस जर अमेरिकन असेल तर घटस्फोट नक्की होईल असच सांगाव लागेल. कारण, तिथे ‘रात्री झोपल्यावर नवरा खूप घोरतो’ ह्या कारणासाठी सुध्दा घटस्फोट घेतला जातो. तेच जर का तो माणूस भारतीय असेल तर मात्र नीट विचार करून मगच उत्तर द्यावं लागेल. कारण भारतात अजुन इतक्या सहजतेने घटस्फोट देण्याची प्रथा रूढ नाही. एका ज्योतिषाने म्हटल्यानुसार, ‘ज्योतिषशास्त्र हा तर्कशास्त्राचा विलास आहे, हेच खर!’

ज्योतिषशास्त्र हे कायम वादाच्या भोव-यात असतं, हे काही वेगळं सांगण्याची गरज नाही. ज्योतिषशास्त्र खरं की खोटं असे कितीही वाद झाले तरी एक गोष्ट विचार करण्यासारखी आहे आणि ती म्हणजे, इतके अनेक वाद होऊन सुध्दा ज्योतिषशास्त्र अजुन टिकून आहे. आणि जी गोष्ट वादाच्या भोव-यात राहून देखील एवढी वर्षानुवर्षे टिकून आहे त्या अर्थी त्यात नक्कीच काहीतर ‘तथ्य’ असलं पाहिजे कारण ज्यात ‘तथ्य’ असतं, तेच ‘टिकतं’ अन्यथा बुडबुड्याप्रमाणे थोड्या कालावाधीनंतर नाहीसं होतं

ज्योतिषशास्त्राच्या बाबतीत आणखी एक गोष्ट आवर्जून सांगाविशी वाटते ती म्हणजे, ज्योतिष हे शास्त्र जरी असलं तरी ते २+२=४ असं शास्त्र नाही. मुलत: सगळे नियम थोडयाफार फरकाने तेच असतात प्रत्येक व्यक्तीच्या बाबतीत त्याचं अवलंबन बदलत जातं. डॉक्टर जसे रोग्याच्या अवस्थेनुसार औषधाची मात्रा ठरवतात तसच प्रत्येक पत्रिकेची गणितं ही वेगवेगळी असतात. ‘सब घोडे बारा टक्के’, अस चालत नाही. दुसरा मुद्दा म्हणजे, ज्योतिषशास्त्राची अचुकता ही शास्त्राबरोबरच ज्योतिषी व्यक्तीवर देखील अवलंबून असते. ज्योतिषी व्यक्तीची स्वत:ची बुध्दीमत्ता, आकलन शक्ती, त्याचं ज्योतिषाविषयीचं ज्ञान, त्याचं ज्योतिषाव्यतिरिक्त विषयाचं ज्ञान, इत्यादी अनेक गोष्टींवर ही अचुकता अवलंबुन असते. डॉक्टर अनेक असतात पण तज्ञ डॉक्टर थोडेच असतात, तसच ज्योतिषाच्या बाबतीत देखील आहे. त्याचप्रमाणे, ज्योतिषी व्यक्ती आणि जातक (ज्याच भविष्य बघत आहात तो) ह्यांची नाळ देखील जुळावी लागते आपल्याला जसं काही वेळेला एखादया डॉक्टरचचं औषध लागू पडतं, इतर डॉक्टरांशी आपलं फरसं जुळत नाही, अगदी तसच इथे सुध्दा आहे.

ज्योतिषशास्त्रात भर घालण्याच काम अनेक ज्योतिषांनी जरी केलेलं असलं तरी ज्या दिग्गजांनी अगदी मुलभूत संशोधन केलय जसं प्रो. के. एस. कृष्णमुर्ती पध्दती नावाची नवीन ज्योतिष पध्दती शोधली किंवा ज्यांनी कोणी ज्योतिषशास्त्राचं मुळ शोध कार्य केलं असेल त्यांना मानाचा मुजराच करायला हवा! अर्थातच त्यांच्या ह्या कार्याला दैवी मार्गदर्शन लाभल असलचं पाहिजे, त्याशिवाय ते खूप अवघड वाटतं. ज्योतिषशास्त्राची आणखी माहिती करून घेण्याच्या आधी मुळात ज्योतिषशास्त्राची वाटचाल माहित असणंही तितकच महत्त्वाच असतं, म्हणूनच हा लेखप्रपंच!

– अभय गोडसे

Abhay Godaseअभय गोडसे हे सायबर उद्योजक आहेत. AVS Soft नावाने त्यांचा इंटरनेट तंत्रज्ञानावर आधारित असा व्यवसाय आहे. या व्यतिरिक्त कृष्णमूर्ती ज्योतिष पध्दतीचाही सखोल अभ्यास त्यांनी केलेला असून, भविष्य मार्गदर्शन, प्रश्नशास्त्र याविषयातही ते मार्गदर्शन करतात.