विविध खेळ

लगो-या

Lagorya लगो-या हा एक भारतातील पारंपरिक खेळ असून यास ‘लिंगोरचर’ असेही म्हणतात. संत एकनाथांच्या गाथेत या खेळाचा निर्देश आढळतो. पेशवाईतही तो खेळला जात असल्याचे उल्लेख सापडतात. या खेळात दोन संघ असतात. खेळाचा उद्देश म्हणजे यात असलेल्या लगो-या एकावर एक ठेवणे. त्या चेंडूने विस्कळीत करणे (म्हणजेच फोडणे) व परत विरुद्ध बाजूच्या संघाने ज्या चेंडूने लगोरी फोडली आहे, त्याच चेंडूने लगो-या रचणा-या संघास बाद करणे. असे बाद न होता जो संघ फोडलेली लगोरी अधिकवेळा लावील, तो संघ विजयी होतो.

या खेळात वापरल्या जाणा-या चपट्या लाकडी गोल ठोकळ्यांना लगोरी म्हणतात. ही लगोरी पारंपरिक, विनासंयोजित खेळामध्ये फरशीच्या वा विटांच्या तुकड्यांची असे. मात्र आता बाजारात, एकापेक्षा एक होत लहान जाणा-या देवळाच्या शिखराप्रमाणे किंवा शंकूच्या आकारासारखा निमुळत्या होत गेलेल्या सात वर्तुळाकार, रंगीत, गोल आकारांचा लगोरी संच मिळतो. त्या फोडण्यासाठी टेनिसचा चेंडू वापरतात.

लगो-या व चेंडू एवढेच साहित्य, साधे-सोपे नियम आणि छोटे मैदान यामुळे हा खेळ बालकांना खेळण्यास सुलभ व प्रिय ठरतो.

लगो-याचे मैदान
६ ते १३ वयोगटाच्या मुलामुलींसाठी हा खेळ साधारणपणे योग्य आहे. या खेळासाठी १८.२८ मी. ते ३०.४८ मी (६० ते १०० फूट) व्यासाचे एक वर्तुळ आखून घेतात. त्याची परीघरेषा ही अंतिम मर्यादा मानतात. या मोठ्या वर्तुळाच्या मध्यभागी एक छोटे वर्तुळ लगोरी ठेवण्यासाठी आखतात. लावताना लगोरी ही येथे रचावी लागते. सात वा अकरा खेळाडूंचे असे दोन संघ असतात. प्रत्येक संघातील एक-एक खेळाडू लगोरी फोडण्यास येतो. लगोरी फोडण्यासाठी तीन वेळा चेंडू मारण्याची संधी मिळते. लगोरी फोडणारा लागोरीच्या एका बाजूला नेमक्षेत्रात व त्याचा लगोरी फोडता फोडता लगोरीकडून मागे जाणारा चेंडू अडविण्यासाठी एक क्षेत्ररक्षक मागे उभा असतो. इतर १० क्षेत्ररक्षक आखलेल्या मोठ्या वर्तुळात लगोरी रचणा-या खेळाडूंचा विचार करून उभे केलेले असतात.

प्रत्यक्ष खेळ व लगोरी होणे

लगोरी फोडणारा लगोरी फोडताना बाद होऊ शकतो. तो लगोरी फोडण्याचा प्रयत्न करीत असता त्याला जमिनीवर टप्पा पडून उडालेला चेंडू जर लागोरीमागील किंवा शेजारील खेळाडूने वरचेवर झेलला, तर तो बाद होतो. लगोरी फोडणारा लगोरी फोडली की उडालेला वा पडलेला चेंडू लगोरी रचणा-या खेळाडूंपैकी एकानेच, एकदाच पायाने लाथाडायला परवानगी असते. त्याहीपेक्षा महत्त्वाचे, ते लगोरी लावणे. ज्यांनी लगोरी फोडली आहे, त्याच संघातील खेळाडूंनी लगो-या एकावर एक रचणे महत्त्वाचे असते. क्षेत्ररक्षकाचे अशा वेळी काम असते, लगोरी लावणा-यांपैकी एकाला चेंडू मारणे. असा चेंडू एकाला जरी लागला, तरी त्या संघास एक गुण मिळतो. प्रत्येक संघाच्या सर्व खेळाडूंना लगोरी फोडण्याची संधी मिळेपर्यंत खेळ चालतो. ज्या संघाच्या अधिक लगो-या होतात, म्हणजेच अधिक गुण होतात, तो संघ विजयी घोषित केला जातो.

गंजीफा

Ganjifa पत्यांचा एक भारतीय खेळ. हा खेळ प्राचीन काळी लोकप्रिय होता. महाराष्ट्रत हा खेळ ‘दशावतारी’ या नावाने प्रसिध्द आहे.

गंजीफा मत्स्य, कच्छ, वराह, नरसिंह, वामन, परशुराम, राम, कृष्ण, बुध्द आणि कलंकी असे दहा अवतारांचे पत्ते असतात. हे चांगले कलात्मक आणि गोल आकाराचे असतात. प्रत्येक अवताराची राजा किंवा मीर (अमीर) वजीर ते दश्शा अशी बारा बारा पाने असतात. एकुण १२० पत्त्यांचा संच असतो.

मत्स्यच्या पोटातून निघालेला विष्णू तो मत्स्य राजा, कासवाच्या पोटातून जन्म घेतलेला विष्णू तो कच्छ राजा, वराहाच्या पोटातून जन्म घेणारा विष्णू तो वराह राजा, खांबातून बाहेर पडून हिरण्यकश्यपूचा वध करणारा विष्णू तो नरसिंह राजा, बटू वामन असलेला वामन राजा अशी पाच चित्रे असतात. परशुराम ते कलंकी यांची चित्रे उरलेल्या राजांच्या पत्त्यावर असतात. प्रत्येक अवताराच्या चित्राबरोरच घोडेस्वार काढलेला असतो तो वजीर. त्या त्या अवताराचे लहान चित्र आणि एक ते दहा क्रमांक असलेले दहा पत्ते या खेळात असतात.

प्रत्येक अवतारातील राजाचा पत्ता श्रेष्ठ असून त्याच्या खालोखाल वजीराचा दर्जा असतो. मत्स्य ते वामन या पहिल्या पाच अवतारांत वजीरानंतर एक्का ते दश्शा असा उतरता क्रम असतो. परशुराम ते कलंकी या पाच अवतारांत राजा आणि वजीर यांचा दर्जा पहिल्या पाच अवतारांच्या पत्त्यांसारखाच असला, तरी त्यानंतर दश्शा वरिष्ठ असून त्याच्या खाली नव्व्या, आठ्ठया अशा क्रमाने एक्क्याला सर्वांत खालचे स्थान असते.

हा खेळ तीन खेळाडू खेळत असल्याने प्रत्येकाला ४० पाने वाटतात. दिवसा राम राजा आणि रात्री कृष्ण राजा ज्याच्या हातात येईल, त्याला डाव सुरू करण्याचा अधिकार असतो. डाव सुरू करणाऱ्याला सर्ुक्या असे म्हणतात. सर्ुक्या राम राजा (किंवा रात्री कृष्ण राजा) आणि एक त्याच अवताराचे हलके पान खेळतो. त्यानंतर बाकीचे दोघे खेळाडू कोणतेही दोन दोन पत्ते टाकतात. ही सहा पाने सर्ुक्याला मिळतात. या आणि इतर अनेक प्रकारांनी पाने मिळविता येतात. या खेळाला आधुनिक पत्त्यांच्या खेळांपेक्षा पुष्कळच जास्त वेळ लागतो. ज्याच्याकडे अधिक पाने जमतील, त्याला इतरांची पाने ओढता येतात. देणे-घेणे चालतात. उत्तम स्मरणशक्ती असणाऱ्या खेळाडूला प्रतिसर््पध्यांची पाने ध्यानात ठेऊन आखरी मारता येते. हा उच्च सर असे अनेक प्रकार आहेत.

काबुने इस्लाम, आईन-इ-अकबरी, बाबरनामा, गिरिधरकृत गंजीफालेखन, श्री तत्वनिधी इ. अनेक ग्रंथांत गंजीफाविषयी वेगवेगळी माहिती सापडते. काही डावांत बारा बारा पानांचे आठ गट असतात. चंग कांचनी नावाचा आठ रंगांचा गंजीफाचा एक प्रकार आहे. नऊ ग्रहांच्या, नऊ राशींच्या नवग्रहछद नावाचाही गंजीफा असतो. श्री तत्वनिधीत गंजीफाचे तेरा प्रकार दिलेले आहेत. आता हा खेळ जवळजवळ लुप्त होत आला आहे.