पापड / मसाले


मसाले


आनंदानं जेवण करणं ही जशी चांगली बाब आहे, तसंच दुसर्‍याला आनंद मिळेल असं जेवण तयार करणं हा गृहिणींचा कौतुक करण्याजोगा गुणच म्हणावा लागेल.उन्हाळा आला, आंबट कैर्‍या, लोणची, पापड निरनिराळी वाळवणे ह्यांचा ऋतु सुरू होतो आहे.

मराठीवर्ल्डच्या वाचकांसाठी पापड कराण्याच्या कृती, तसेच लोणच्याचे प्रकार निरनिराळे मसाले तयार करण्याच्या कृती सादर करीत आहोत. तुम्हाला हा विभाग आवडेल याची खात्री आहे. चला तर मग खमंग जेवणाची सोय करण्यासाठी रोजच्याच डाळ-भात अधिक रुचकर करण्यासाठी थोडे प्राविण्य पाककलेतही मिळवूयात.

मसाला

masala साहित्य – २५० ग्रॅम बारीक हिरवे इंदूरी धने, अर्धी वाटी जिरे, ५ ग्रॅम लवंगा, १० ग्रॅम दालचिनी, मोठे वेलदोडे, १० ग्रॅम तमालपत्र, ५-६ पाने, दगडफूल ५ ग्रॅम, नागकेशर ५ ग्रॅम, बादलफूल ५ ग्रॅम, सुक्या लाल मिरच्या ५० ग्रॅम, तीळ ५० ग्रॅम, सुके खोबरे १ वाटीभर किसून, हिंग पावडर १० ग्रॅम, १ चमचा हळद, अर्धी वाटी तेल, १ टेबलस्पून मीठ.

कृती – धने स्वच्छ निवडून घ्यावेत, पाव वाटी तेल कढईत गरम करावे. त्यात लवंगा, दालचिनी, मसाला वेलदोडे, दगडफूल, नागकेशर, बादलफूल, तमालपत्र, हे सर्व जिन्नस एकामागून एक तळून घ्यावेत. शेवटी जिरे परतून घ्यावे. सर्व जिन्नस ताटात काढून गरम असतांनाच त्यावर हळदपूड घालावी. कढईत उरलेल्या तेलात सुक्या लाल मिरच्या खमंग परतून घ्याव्यात व ताटात काढून त्यावर १ टेबलस्पून मीठ घालून ठेवावे. १ वाटीभर किसलेले सुके खोबरे कढईत मंद आचेवर गुलाबी रंगावर भाजून घ्यावे. अंदाजे अर्धी वाटी किंवा ५० ग्रॅम तीळ मंद आचेवर गुलाबी रंगावर खमंग भाजावेत, उरलेले पाव वाटी तेल कढईत घालून धने मंद आचेवर काळपट भाजावेत. खलबत्यात किंवा मिक्सरच्या ड्राय ग्राईडरवर प्रथम मसाल्याचे सर्व तळलेले जिन्नस, हिंग, हळदीसह बारीक कुटून घ्यावेत. मिरच्या मिठासह कुटून त्यात घालाव्यात, धने बारीक कुटून सर्व मसाल्यात मिसळावेत व सर्व मिश्रण पिठाच्या चाळणीने चाळून घ्यावे. राहिलेला चाळ परत बारीक कुटून त्यात मिसळावा. भाजलेले खोबरे व तीळ एकत्र अथवा वेगवेगळे कुटून कुटलेल्या बाकीच्या मसाल्यात मिसळावेत व मसाला हाताने एकजीव मिसळावा. तीळ खोबर्‍याची पूड घातल्यावर मसाला परत चाळू नये.

गरम मसाला

garam-masala साहित्य – २० ग्रॅम काळे मिरे, १० ग्रॅम लवंगा, २० ग्रॅम दालचिनी, १५ ग्रॅम मसाला वेलदोडे सोलून, दाणे काढून, ५ ग्रॅम शहाजिरे, १० ग्रॅम जिरे.

कृती – मसाल्याचे सर्व पदार्थ कढईत मंद आचेवर थोडे भाजावेत. सर्व जिन्नस एकत्र बारीक कुटून पूड करून, चाळून घट्ट झाकणाच्या बाटलीत भरून ठेवावी.

कांदा लसूण मसाला

kanda-lasoon-masala साहित्य – काळया मसाल्यात सांगितलेले सर्व मसाल्याचे पदार्थ, लाल सुक्या मिरच्या २०० ग्रॅम, अर्धा किलो कांदे, अदपाव लसूण.

कृती – काळया मसाल्याप्रमाणे सर्व जिन्नस तेलात खमंग भाजून घ्यावेत. सुक्या मिरच्या तेलात तळून मीठ घालून कुटून त्यात मिसळाव्यात. कांदे पातळ उभे चिरून उन्हात चुरचुरीत वाळवावेत. नंतर थोडया तेलात परतून घ्यावेत. लसूणपण सोलून परतून घ्यावा व कांदा – लसूण कुटून तीळ खोबर्‍याच्या पुडीबरोबर मसाल्यात घालावेत. मसाला एकजीव कालवून घट्ट झाकणाच्या बरणीत भरून ठेवावा.