धडपड स्वप्नपूर्तीसाठी….

struggle for dreams समजा संगणकाप्रमाणे आयुष्यात चुकलेल्या गोष्टी Undo करून झालेल्या चुका खोडून नव्याने मनाप्रमाणे लिहिता आलं तर? झालेल्या चुका Backspace करत पुन्हा वयाच्या त्या टप्प्यावर परत जाऊन नव्याने काही करता आलं तर? काय बहार येईल..प्रत्येकाला मनासारखं जगता येईल कुठल्याही बेचैनीशिवाय! पण या केवळ कल्पनाच ठरतात. मनासारखं आयुष्य जगण्यासाठी, स्वप्नपूर्तीसाठी धडपड करताना चुका घडणारच! चुकता चुकता शिकतो तो मानव. पण त्याच त्याच चुका परत होत असतील तर मग वेळ, स्वप्न, यश यांच गणित चुकू लागत.ध्येय गाठण्यासाठी फक्त स्वप्न पाहून चालत नाही, त्या स्वप्नाला सत्यात उतरवण्यासाठी फक्त सकारात्मक राहूनही चालत नाही. ‘होईल सगळ’ असं मनाला सांगताना सोबत काळ-वेळेच भान,नियोजन आणि केलेल्या नियोजनाची काटेकोर अंमलबजावणी स्वप्नपूर्तीकडे घेऊन जाते.स्वप्न उराशी घेऊन धडपड करणारे अनेकजण असतात.पण या प्रवासात शेवटपर्यंत किती जण पोचतात? ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदकांचा विक्रम करणारा धावपटू उसेन बोल्ट म्हणतो “There are better starters than me but I am a strong finisher.” सुरुवात कितीही दमदार असली तरी सातत्य ठेऊन शेवटही समर्थपणे करणे महत्त्वाचे ठरते.

आपण आपलीच स्वप्न पाहतोय ना हे तपासणे गरजेचे ठरते. इतरांनी दाखवलेली,पाहिलेली स्वप्न आपण पूर्ण करण्याच्या मागे धावताना दमछाक होते. त्यामुळे ‘मला नेमकं काय पाहिजे आहे’? हे स्वतःला समजणे गरजेचे आहे. स्वतःला एका उंचीवर नेण्यासाठी जीवनात बदल करणे क्रमप्राप्त ठरते.

फ्रेश स्वप्न पाहायला हवीत, हे खर;
पण ती कुठल्या Mall मध्ये, हे ठाऊक नाही;
स्वतःला बदलायला हवं, हे खर,
पण म्हणजे काय करायचं, ते माहित नाही.

या संजय आवटे यांच्या कवितेतल्या ओळींप्रमाणे आपली स्थिती होते.ठरलेल्या ठिकाणी पोचूनही अस्वस्थता पाठ सोडत नाही. हेच पाहिजे होत का मला? असा प्रश्न सतावत राहतो. मग इच्छा असूनही मागे जाता येत नाही. कारण वेळ आपल्याला तिथे जाण्याचे दरवाजे बंद करून टाकते. त्यामुळे आपल्याला काय पाहिजे याची स्वतःला माहिती हवीच.

स्वतःमध्ये चांगले बदल करण्याची, ‘Comfort Zone’ सोडण्याची प्रक्रिया प्रचंड वेदनादायी असते. साचलेलं आयुष्य जीवनाचा सुगंध नष्ट करून टाकते. त्यासाठी जीवन प्रवाही ठेवावं लागते. कारण

वाहतो तो झरा, साचत ते डबके;
डबक्यावर डास येतात आणि झऱ्यावर राजहंस!

स्वतःला राजहंस म्हणून सिद्ध करण्यासाठी सोयीची मानसिकता झटकून नव्या जगात प्रवेश करावा लागतो. गरुडाला नवीन पंख मिळवण्यासाठी जुने पंख स्वतः एखद्या झाडाला आपटून छाटावे लागतात. तो यात रक्तबंबाळ होतो; पण जुने पंख छाटले नाही तर त्याचे मरण अटळ असते. कालांतराने नवीन पंख आल्यानंतर तो नव्याने भरारी घेतो. त्याचप्रमाणे आपली सवयीची मानसिकता सोडून देण्यासाठी अनेक यातना सहन कराव्या लागतात. तेव्हाच आयुष्य अर्थपूर्ण होते.

स्वप्न शेवटपर्यंत पूर्ण करण्यासाठी प्रचंड अडथळे येतात. खूप प्रलोभने खुणावतात, मोहाचे क्षण येतात. या ठिकाणी स्वतःला सावरता आलं नाही तर निराशेच्या गर्तेत सापडण्याची शक्यता असते.आयुष्य उद्ध्वस्त होते. एका लेखकाने म्हटलंय की “शिखरावर चढायला रियाज लागतो मात्र शिखरावरून घसरून दरीत कोसळायला कुठलाही रियाज लागत नाही.” त्यामुळेच आरंभशूर पणे फक्त धडाक्यात सुरुवात न करता येणाऱ्या वादळाला तोंड देत इप्सित गाठण्याचा क्षण साजरा करण्यासारखा ठरतो.

– विशाखा एस. ठाकरे