MarathiWorld - HomeServices
About Us About Marathi World Suggest a site Feedback Contact Site Map

बिनधास्त
"तुला अमेरिकेला का जायचे आहे?''

''तुला अमेरिकेत का जायचे आहे?'' अमेरिकन व्हिसा काउन्सिलेट मधल्या कर्मचा-याने मला पहिला प्रश्न विचारला. यु.एस.ला जाण्यासाठी सगळयात अवघड पायरी म्हणजे व्हिसा इंन्टरव्हयू. एकवेळ तुम्हाला चागंल्या युनिव्हर्सिटीत प्रवेश मिळेल, पण म्हणून व्हिसा मिळेलच असे नाही. ९/११ नंतर अमेरिकेने बाहेरून शिकायला येणा-या विद्यार्थ्यांवर कडक नियंत्रण आणले होते. कारण ' त्या ' १९ जणांपैकी, काही अमेरिकन युनिव्हर्सिटीमध्ये शिकायला आलेले विद्यार्थीच होते. एकदाचा 'स्टूडंन्ट व्हिसा' मिळाला पण हा प्रवास फार अवघड होता.

व्हिसा इन्टरव्हयूच्या तयारीसाठी सगळयात वेळ लागणारी गोष्ट म्हणजे कागदपत्र गोळा करणे. तुमची डिग्री सर्टीफिकेट्स, आर्थिक परिस्थिती दाखविणारे सर्टीफिकेट्स इत्यादी ...सगळी कागदपत्र मिळविता मिळविता चार महिने निघून जातात. त्याच बरोबर फक्त अर्ज देऊन भागत नाही त्या बरोबर तब्बल दहा हजार रूपये फी द्यावी लागते.

सर्वप्रथम लागणारी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचे 'ट्रान्सस्क्रीपट्स'. तुम्ही अभियांत्रिकीच्या चार वर्षात काय केले, ह्याचा लेखाजोखा असतो त्याच्यात. 'ट्रान्सस्क्रीपट्स' मिळविण्यासाठी सरकारी कर्मचा-यांसमोर हात जोडून उभे रहावे लागते. दोन-तीन साहेबांच्या सह्या घ्याव्या लागतात. हे काम आटोपता आटोपताच १ महिना निघून जातो. आर्थिक कागदपत्रात तुम्ही तुमचे अमेरिकेतील संपूर्ण शिक्षणाचा खर्च स्वत: करू शकता, हे पटवून देण्यासाठी असतात. ह्यात वडिलांचे बँक स्टेटमेंट, फिक्स डिपॉझीट, इतर इनव्हेस्टमेंट, शैक्षणिक खर्च, घर व प्रॉपर्टीची माहिती दयावी लागते.तुम्हाला ऍडमिशन मिळालेल्या युनिर्व्हसिटीची फी, तुमचा राहण्याचा खर्च आणि हेल्थ इन्शुरन्स तुम्हाला भरता येतील की नाही, हे तपासून पाहण्यासाठी ही कागदपत्रे बघण्यात येतात. ह्या सगळया डॉक्युमेंट्स नीट ठेवाव्या लागतात.

आता इन्टरव्हयूच्या वेळेस नेमके हवे असलेले कागद काढून दाखवणे अवघड असते. त्यासाठी एक खास ''हार्मोनिअम'' फाईल घ्यावी असे सांगण्यात येते. व्हिसा इंटरव्हयूच्या रांगेत सगळेजण त्यांचे हार्मोनिअम घेऊन शांतपणे उभे असतात. आता तर व्हिसा इंटरव्हयूची तयारी कशी करावी हयाचे काउन्सिलींग पण आता सुरू झाले आहे. त्यात तुमच्याकडून व्हिसा इंटरव्हयूचा रितसर सराव करून घेण्यात येतो. थोडक्यात एका विद्यार्थ्याला अमेरिकेला पाठवण्यामागे अनेक लोकांचे खिसे गरम होतात!

इंटरव्हयूच्या दिवशी सकाळी लवकर मुंबईच्या व्हिसा सेंटरला पोहचलो. ते उघडलं नव्हतं, पण गर्दी आधीच झालेली. एवढी रांग मी त्या आधी मंदिर आणि थिएटरच्या बाहेरच पाहिली होती. सकाळची झोप पूर्ण न झाल्यामुळे बरेच लोक उभ्या उभ्या पेगंत होते. काही जण आपली फाईल परत परत तपासून पाहत होते. एक मोठे गुजराथी कुटूंब त्यांच्या(आता लाडक्या झालेल्या) नातेवाईकांच्या लग्नाला न्यूजर्सीला निघाले होते. त्यांच्यातील ''सांस भी कभी बहू थी'' मधल्या बा सारख्या दिसणा-या आजीनी सगळयांना ढोकळा-शेव-पापडी खाऊनच इन्टरव्हयूला पाठवायचा निरधार केला होता. असो त्यांच्या गप्पा ऐकत मी पण माझे टेन्शन घालवण्याचा प्रयत्न करत होतो.

ठीक साडेनऊ वाजता समोरचा दरवाजा उघडला. लोकल मध्ये मुसंडी मारून घुसायची सवय असलेले लोक, आज शांतपणे उभे होते! अमेरिकन लोक अतिशय शिस्त पाळतात वैगरे गोष्टी इथपर्यंत पोहोचल्याचा परिणाम असावा. हळू हळू रांग सरकू लागली. एअरपोर्टवर पाळण्यात येणा-या सुरक्षा प्रक्रियेनुसार सगळयांची झडती घेण्यात येत होती. आत शिरताच तुम्हाला टोकन नंबर देण्यात येतो. तो घेऊन तुम्ही वाट बघत बसायचे. मला ७१७ नंबर मिळाला.

माझा नंबर येता येता दुपारचे तीन वाजले होते. त्या दरम्यान मी अनेक लोकांचे अमेरिकेला जाण्याचे स्वप्न खरे होतांना आणि व्हिसा सेन्टर मध्येच संपताना पाहिले. माझा टोकन नंबर खिडकी क्रमांक १३ वर आला! तसा मी अधंश्रध्दाळू नाही, पण निदान आज तरी तेरा नको असे मला वाटून गेले. माझ्या पुढे नऊ जण स्टूडन्ट व्हिसासाठीच आले होते. इंटरव्हयू जास्तीत जास्त २ मिनिटे होत होता. माझ्या पुढे पुण्याची एक स्मार्ट मुलगी निर्धाराने उभी होती. समोरच्या खिडकीमागे गो-यासाहेबांचे सोनेरी केस दिसत होते. तिचा इंटरव्हयू सुरळीत जात आहे असे वाटत असतांनाच ती मागे वळाली. क्षणभर आमची नजरा नजर झाली. तिच्या डोळयात तरळत असलेल्या अश्रूंना ती थांबवू शकली नाही. खाली बघून ती जाते, तोवर ''नेक्सट'' अशी हाक आली. आता माझा नंबर.... गो-यासाहेबाचा पहिला प्रश्न, ''तुला अमेरिकेला का जायचे आहे?''

अभय परांजपे
कॅलीफोर्निया

आपल्या प्रतिक्रिया मराठीवर्ल्डला जरूर कळवा.
Abhay Paranjapeअभय परांजपे हे अभियंता असून ऍरोझोना युनिव्हर्सीटीतून त्यांनी एम एस केले आहे. लहानपणापासून अभ्यासाबरोबरच टेबलटेनिस, नाटक, वक्तृत्व, लिखाण याची विशेष आवड असणा-या संवेदनशील अभयने त्याच्या अनुभवांची गुंफण तसेच देशा-परदेशातले बारकावे आपल्यासाठी टिपले आहे.


मराठीवर्ल्ड शॉपींग
Mala bhetaleli manase
Tumche shabd samarthya vadwa
Big B Special Vol 1
Love Forever pack