|
मराठीवर्ल्डच्या मराठी रसिकांनी पाठवलेल्या 'कविता' |
माझं गुपित
काळजाच्या डबीत मनाच्या कुशीत
जपलंय मी माझं इवलंस गुपीत
आहे त्याचा आनंद आहे
नसल्याची नाही उणीव काही
आनंद परिमल, दु:खाची मळमळ
कुठल्या भासाची तळमळ न ठेवता
जपलंय मी माझं इवलंस गुपीत।।१।।
चक्रावणार्या या चक्रव्यूहातून
गुदमरणार्या गाढ गर्दीतून
विवंचनांच्या वावटळींमधून
शहाणपण माझ आटोकाट जपत
जपलय मी माझं इवलंस गुपित।।२।।
जीवाचा आटापिटा करून
कभिन्नकाळया कातकातून
माणूसकीच्या दुष्काळातून
मायेचा पान्हा जिवंत झरत
जपलय मी माझं इवलंस गुपित।।३।।
जीवघेण्या स्पर्धेच्या गर्दीतून
बुभुक्षितांच्या हव्यासातून
पाय पायावर देण नाकारून
'पहले आपचा' पाढा पढत
जपलय मी माझं इवलंस गुपित।।४।।
निसटलं त्याचा शोक न ठेवून
आहे हाती जे ते सावरून
ठुसठुसणार्या भूतकाळाकडे
निर्धाराने मी पाठ फिरवत
जपलय मी माझं इवलंस गुपित।।५।।
उपेक्षेच्या रणरणत्या उन्हात
माणूसकीच्या चेंगरत्या लिलावात
रूजू पहाणार्या प्रत्येक आशेला
मुक्त जगण्याचा मक्ता देत
जपलय मी माझं इवलंस गुपित।।६।।
ऐहिक बेडया बेगडया तोडून
विसावतो मी शांतीच्या कुशीत
मी पणाच्या मोहाला सारून
सांभाळंत माझं माझेपण खुशीत
जपलय मी माझं इवलंस गुपित।।७।।
- यतीन सामंत
|
|
|
|
|
|
|
|