MarathiWorld - HomeServices
About Us About Marathi World Suggest a site Feedback Contact Site Map
मराठीवर्ल्ड > मुक्तांगण

आढावा गतवर्षाचा अर्थातच २००७ सालचा
मंडळी या जगात कायम ते काय....तर फक्त बदल, "चेंज इज ऑलवेज कॉनस्टंट".सरता दिवस उद्याच्या गर्भात काय ठेवलंय हे तुम्हाला सांगत नाही....मग या आलेल्या सालाने आपल्या पुढयात काय वाढून ठेवलय हे कोण सांगणार? पण एवढं मात्र खंर की सरत्या वर्षाच्या पायवाटा, खाचखळगे यातून मार्गस्थ होत आपण नववर्षाच्या राजमार्गाकडे वाटचाल करीत असतो. साल २००७ अगदी नुकतच सरल आणि आपण २००८ सालात प्रवेश केला. आपण २००७ सालातल्या महत्त्वाच्या घटनांचा मागोवा घेऊ.

राजकारण
अणूकरार आणि काँग्रेस विरूध्द डावे यामुळे २००७ सालाचे राजकारण अगदी ढवळून निघाले. डावे काँग्रेसला सोडचिठ्ठी देतात की काय असे वाटू लागले. हा करार भारतात एक क्रांती घडवेल असे काँग्रेसने सांगितल्यावर कम्युनिष्टांच्या निष्ठावंतांनी आपल्या कम्युनिकेशन स्कीलने हे कसे चुकीचे आहे हे जनतेला सांगायचा प्रयत्न केला. प्रकाश आणि वृंदा करात यांची नावे घरोघरी पोहचली. शेवटी करार अधांतरीच राहिला. याच डाव्यांच्या बंगालमध्ये नंदीग्रामत राजकारण व समाजकारण नुसाता थयथयाट करीत होते. त्यात टाटा उद्योगसुध्दा या वादात अडकला.
बंगालच्या मुख्यमंत्र्यांवर उध्दटपणाचे आरोप केले गेले. मिडियाने 'बुध्ददेवांना' युध्दखोर अशोक ठरविले. मेधा पाटकर सारख्या समाजकारण करणा-या व्यक्तींनी शक्तीप्रदर्शनासाठी हीच जागा निवडली. अन्यायाची ऍ़लर्जी असणा-या ममता बॅनर्जीनी यातही राजकारण आणले. महाराष्ट्रात मुख्यमंत्री हटाव या योजनेने इथे जोर धरला होता पण मुख्यमंत्र्यांनी 'हटा सावन की घटा' स्टाईलने विरोधकांना गप्प बसविले. व्यर्थ गेलेली अनेक शक्तीप्रदर्शने महाराष्ट्राने पाहिली. मिडियाचा विरोध, विरोधकांचा प्रचार (की अप्रचार) या सर्वांवर पध्दतशीरपणे मात करीत गुजरातचे सी.एम. (कॉमन मॅन) श्री. नरेंद्र मोदी पुन्हा एकदा सी.एम. (चीफ मिनिस्टर) झाले. हिमाचल प्रदेशात भारतीय जनता पक्षाने प्रतिष्ठेची निवडणूक जिंकली. रामसेतू केंद्राच्या सत्तेत पोचण्याचा मार्ग बनू शकतो असे भारतीय जनता पक्षास वाटू लागले. एकंदरीत सत्ताधारी पक्षास हे वर्ष तेवढे चांगले गेले नाही हेच म्हणायचे.

अर्थकारणाकडे
सनसेक्सने २०००० ची गाठलेली उंची सर्वच जगाला थक्क करणारी होती. सामान्यगुंतवणूकदारही त्यामुळे बाजारात ओढले गेले. म्युअचल फंडमध्ये सुध्दा सामान्य माणसाने तन मन धन अर्पून गुतंवणूक केली. भारताची अर्थव्यवस्था तब्बल १० टक्यापेक्षा जास्त वेगाने वाढीस लागली. Margers, Takeover ने तर यावेळी भारताचे जग व्यापून टाकले. एस्सार स्टील, हिंदालको, सुझलॉन या कंपन्यांनी परदेशी कंपन्या विकत घेतल्या. सर्वात मोठा करार केला तो 'टाटा' समूहाने. टाटास्टीलने आपल्यापेक्षा तब्बल ५ पट मोठी असणारी कंपनी 'कोरस' विकत घेतली आणि ते डील होते १२ ते १३ अब्ज डॉलर्सचे. या तेजीमुळे रूपया मात्र वधारला व त्यामुळे बीपोओ व आयटी क्षेत्राला थोडा धक्का सहन करावा लागला. यालाच म्हणतात 'जोर का झटका धीरेसे ...' २००७ साल एकंदरीतच गुंतवणूकदार, कारखानदार, छोटे मोठे उद्योगधंदे यासाठी मैलाचा दगड ठरले असं म्हणायला हरकत नाही.

दूरचित्रवाणी
चॅनलवाल्यांच्या रीयॅलीटी शोजने यंदा उच्छाद मांडला होता. 'भीक नको पण कुत्रं आवर' ही म्हण रीयॅलीटी शोच्या बाबतीत चॅनलवाल्यांना नक्की लागू पडते. अगदी बाथरूम सिंगर शोधण्यापर्यंत काही वाहिन्यांची मजल गेली. या सगळया शो मधील एसएमएसच्या विनंत्या, आरोप, प्रत्यारोप, रडारडी हे बघून वीट आला होता. पण या शोजमुळे अनेक मुलांना आपले कलागुण लोकांपुढे सादर करता आले. इतर परिस्थितीत ते त्यांना कदाचित शक्य झाले नसते. मोबाईल फोन्स व सर्व्हिस प्रोव्हायडर एसएमएसमुळे मिळणारा फायदा कोटींमध्ये गेला हे ऐकिवात आहे.

बॉलीवूड
किंग खान की खिलाडी कुमार यावर ब-याच चित्रपट पंडितांचं नंबर एक कोण यावर दुमत असले तरी आमच्या मते अक्षयकुमारने हे बेबी, भुलभुलैया, नमस्ते लंडन आणि वेलकम हे हिट चित्रपट देऊन बाजी मारलीच. शाहरूखने 'चक दे' मध्ये केलेला अभिनय अप्रतिम होता. तर 'ओम शांती ओम' मध्ये पुन्हा एकदा त्याने टिपिक्ल शाहरूख स्टाइल अभिनय केला. यावर्षी आलेल्या वेगळया धाटणीचे 'परझानियाँ' , 'मनोरमा सिक्स फिट अंडर', 'हनिमून ट्रॅव्हल्स प्रा. लिमिटेड', 'एक चालीस की लास्ट लोकल' इत्यादी चित्रपट लोकांनी सरळ नाकारले. परंतु त्यातील कलाकारांनी अभिनय उत्तमच केला. माधुरीचा 'आजा नचले' तिच्यासाठी म्हणून लाभलेला खास प्रेक्षक चित्रपट बघायला आला, राम गोपाल वर्माची 'आग' भडकायच्या आधी कधी विझली ते समजलेही नाही. 'सावरियाँ'च्या अपयशातून सावर बाबा असं संजयला आपण म्हणूया. रणबीर कपूर हा देखणा नट मात्र आपल्या वडीलांची चॉकलेट हीरो इमेज नक्की पुढे चालवेल ह्यात शंका नाही.
'जब वुई मेट', 'शुट आऊट ऍ़ट लोखंडवाला' 'जॉनी गद्दार', 'पार्टनर' या चित्रपटांनी प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले. अमिताभ बच्चनचा तब्बूबरोबरचा 'चीनी कम' वेगळाच अनुभव देऊन गेला. प्रत्येक कमबॅकला अतुलनीय परफॉर्मन्स देते म्हणून तब्बूला खरं म्हणजे लेडी मोहिंदर अमरनाथ म्हणायला पाहिजे. अश्विनी भावेचा कमबॅक म्हणून 'कदाचित' आणि 'साडे माडे तीन' हे ह्या वर्षातले यशस्वी चित्रपट.

खेळीयाड
भारताने जिंकलेला 'टवेंटी टवेंटी' कप विश्वनाथन आनंदने जिंकलेला बुध्दीबळाचा विश्वचषक, भारतीय हॉकीटीमने जिंकलेला 'आशिया कप' या उल्लेखनीय घटना म्हणाव्या लागतील.

या वर्षाचे मानकरी म्हणून पुढील व्यक्तींची निवड करायला हरकत नाही.
१. रतन टाटा - कोरस टेकओव्हर
२. सुनिता विल्यम - यशस्वी अवकाश भरारी
३. विश्वनाथन आनंद - बुध्दीबळ अजिक्यंपद
४. न्यायमुर्ती कोदे - १९९३ बॉम्बस्फोट खटल्यात १४००० पानांचा पुरावा उभा करून तब्बल १२३ आरोपींची सुनावणी
तर असं हे २००७ साल सौ. प्रतिभाताई शेखावत (प्रतिभा पाटील) यांना भारताची पहिली महिला 'राष्ट्रपती' बनवणारं, ताज महालला पुन्हा एकदा जगातील सात आश्चर्यांमध्ये मानाचं स्थान देणारं, कर्नाटकाच्या राजकारणातील डोंबा-याचा खेळ दाखवणारं, मणिशंकर अय्यर आणि कलमाडी यांना एकमेकांवर चिखलफेक करायला लावणारं, शिल्पा शेट्टीला 'बिगब्रदर' जिंकायला लावून 'बिग सिस्टर' होण्यापासून रोखणारं, 'इंडियन वॉल' राहूल द्रव्रिडला जॅम करणारं, लालूंना आश्चर्यकारकरित्या काहीच सनसनीखेज न बोलायला लावणारं, संजय दत्तला बॉम्बस्फोट खटल्यात दोषी ठरवणारं, शाहरुख, अमिताभमधलं पेटलेलं शीतयुध्द दाखवणारं, अभिषेक ऐश्वर्याचं लग्न पाहणारं, 'चक दे' मधील संयत अभिनयानंतर 'ओम शांती ओम' मधील शाहरूखच घोटवलेल शरीर दाखवणारं, माजी पंतप्रधान चंद्रशेखर, श्री दिलिन सरदेसाई, श्री. प्रमोद नवलकर, श्री. स्नेहल भाटकर, श्यामची आई -वनमाला, श्री ओ.पी. नय्यर याचं देहावसन बघायला लावणारं,

कोणीतरी म्हटलंय की पृथ्वीवरचं जगणं महागडं खरं पण त्यात सूर्याभोवतीची सफर मात्र मोफत मिळते. वर्षभरात या सफरीत आपल्या आयुष्यात ब-याच घटना घडतात. काही आयुष्य घडवतात तर काही बिघडवतात. असो २००७ सालातील आठवणीची जळमटं काढून आपण सर्वांनी २००८ मध्ये प्रवेश केलेलाच आहे.
तेव्हा सर्वांना 'चक दे २००८' !!!

मंदार माईणकर,
मुंबई