चिखलातलं एक कमळ - सखी संघटन (भाग-२)
केस तर वेळेत नोंदविली गेली. परंतु पुढील चौकशीस नेहमीप्रमाणे दिरंगाई. पोलीस चौकीत अनेक चकरा मारल्या महिती मिळवायचा प्रयत्न केला. अनेक दिवस वाट पाहून, काही उपयोग न झाल्याने एक दिवस संघटनेच्या सदस्यांनी पोलीस चौकीवर मोर्चा काढायचे ठरविले. संस्थेच्या सदस्यानीही पाठिंबा दिला व सहकार्य केले. मोर्चामुळे सगळी यंत्रणा हलू लागली. पोलीसांनी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले व पुढे ते पाळले देखील. इकडे त्या गुंडाचे मित्र व सहकार्यांचे साधनाला धमकी देणे, केस मागे घेण्यासाठी पैशाची आमिष दाखवणे, संघटना व संस्थेपासून तोडण्याचे प्रयत्न करणे अशा सर्व गोष्टी चालूच होत्या. साधना काही या सगळयाला भूलली नाही. तिचा संघटनेवरचा व संस्थेवरचा विश्वास कधीच ढळला नाही व केस संदर्भातला विचारही कधी बदलला नाही.
साधनाबरोबरच संस्था व संघटनेच्या सदस्यांनी ही केस स्वत:ची असल्यासारखी आपुलकीने लढली. साधनाला तिच्या विचारांच्या, मानसिकतेच्या चढउतारात खंबीर साथ दिली. केसच्या साक्षी, जबान्या चालू झाल्या. गरजेप्रमाणे साधनाच्या संरक्षणाची काळजी घेतली. सरकारी वकिलही चांगले मिळाले. आणि केसच्या निकालाचा दिवस आला सर्वांना यशाची खूप आशा होती. पण निकाल साधनाच्या विरोधात लागला.
संघटना व संस्था सदस्यांनी उच्च न्यायालयात जाण्यासाठी साधनाला सहाय्य करायचे ठरविले आणि अपिल केले देखिल. निकाल विरोधात लागल्यावरही साधनाची प्रतिक्रिया खूप बोलकी होती. ती म्हणाली ''कायद्याच्या दारातही न्याय मिळावा म्हणून मी वरच्या कार्टात जाणारचं. पण मी केस हरले नाही. कारण केस करण्यामागे दोन उद्देश होते. एक तर आम्हाला सारखा त्रास देणार्या गुंडाचा त्रास कमी व्हावा व त्याला कळावे की आम्ही त्याला टक्कर देवू शकतो. दुसरं म्हणजे लोकांना हे समजावं की धंद्यातली बाई म्हणजे कोणालाही कधीही उपलब्ध असते असं नाही. तिच्यावरही बलात्कार होवू शकतो. हे दोन्ही उद्देश साध्य झालेत त्यामुळे तसं म्हटलं तर मी केस जिंकल्यातच जमा आहे पण त्यावर कायदेशीर शिक्का मार्तब व्हावा म्हणून वरच्या कार्टात जाणारचं''
मंदा चव्हाण
सोलापूर जिल्ह्यातील शिंदेवाडी येथील रोजंदारीवर काम करणार्या कुटुंबात जन्मलेली मंदा. पाच बहिणी, दोन भाऊ, आई आणि वडिल असं ९ जणाचं कुटुंब. मंदा सर्वात मोठी. आई-वडिलांनी मोठया मेहनतीने तिला ६ वी पर्यंत शिकविले. त्यांच्यावर अजून ६ मुलांची जबाबदारी. परिस्थितीचा अंदाज घेवून ओळखीच्या एकांनी सुचविलेल्या मुलाबरोबर थोडेच दिवसात म्हणजे मंदाच्या वयाच्या ११व्या वर्षी तिचे लग्न करून दिले. घरात सासू, सासरे, दोन दीर, पण ऊस तोडणी कामगार असणार्या मंदाच्या नवर्याला ना धड समज होती, ना धड बोलता येत होतं, ना ऐकू. पण मंदाला निभावून नेण्याशिवाय पर्याय नव्हता. एकापाठोपाठ एक अशा दोन मुली झाल्या आणि मुलींना वाढविण्याची मोठी जबाबदारी मंदावर आली. जमेल ते छोटं मोठं काम करून, लोकांकडून कर्ज घेऊन मंदा कसंबसं मुलींचं शिक्षण करत होती. पण कर्जाचा डोंगर वाढतच होता. अशातच काही कामानिमित्त पुण्याला गेली असताना एका माणसाने पैशाचे अमिष दाखविले व मंदाने धंद्यात प्रवेश केला. गावी परत गेल्यावर गावातल्या एका बाईने देखील पैसे मिळविण्यासाठी हाच मार्ग सुचविला व गिर्हाईक मिळवून द्यायची जबाबदारी पण घेतली. मंदाला मुलींची लग्न करून देवून त्यांना मार्गी लावायचं होतं. पण गावात राहून धंदा करणं तिला मान्य नव्हतं. तिने थेट कोल्हापूर गाठलं.
गेली आठ ते दहा वर्ष मंदा हा धंदा करते. दोन्ही मुलींची लग्न होऊन मंदाला नातवंड पण आहेत. घरच्यांच, मुलींच, जावयांचं, नातवंडाचं सगळयाचं मंदा करते. पण अशा कामात असल्याने तिला गावी परत जायचे नाही.
कोल्हापूरात एकटी राहून धंदा करून कमावणं बिचारी मंदाला सोपी गोष्ट नव्हती. कामाचं स्वरूप, त्याचा होणारा त्रास हे सर्व स्वीकारून मंदा पूर्णपणे दारूच्या आहारी गेली. गिर्हाईकाबरोबर दारू प्यायली की जास्त पैसे मिळत. हळू हळू सकाळी उठल्यापासून मंदाला दारूची गरज पडू लागली. बघता बघता दिनक्रम, गिर्हाईक करून पैसे मिळवायचे आणि ते दारूत संपवायचे असा झाला. जगण्याची फारशी इच्छाच उरली नव्हती.
साधारण ५ वर्षांपूर्वी म्हणजे २००४ च्या डिसेंबर मध्ये कोल्हापूरात एम.एस.पी.एस.एस या संस्थेद्वारे सेक्स वर्कर्स बरोबर एचआयव्ही/एड्स चा प्रकल्प सुरू झाला हळू हळू प्रकल्पाचे कार्यकर्ते मंदापर्यंत पोहोचले आणि तिला सुधारावयाचा जणू विडाच उचलला.
प्रेम व कळकळ असणारी, आदर देणारी माणसे भेटल्यावर मंदाही हळूहळू बदलू लागली. कार्यकर्त्यांच्या प्रयत्नांना प्रतिसाद देऊ लागली. मंदात होणारे बदल, तिची बुध्दी, विचार करण्याची कुवत पाहून कार्यकर्त्यांचा हुरूप वाढत होता.
मंदाला, तिच्यातले नेतृत्व गुण बघून पिअर एज्युकेटर म्हणून प्रकल्पाशी जोडून घेतलं. मंदा देखील आपलेपणाने काम करू लागली. नवीन शिकण्याच्या प्रबळ इच्छेने जास्तीत जास्त माहिती करून घेवून धंद्यातल्या इतर महिलांना आरोग्याबद्दल, बचतीबद्दल, व्यसनं सोडण्याबद्दल माणूस म्हणून जगण्याबद्दल, एकत्र येण्याबद्दल माहिती देवू लागली. मंदाच आयुष्यचं जणू बदलून गेलं. इतर बायका, संस्थेचे काम ही आयुष्यातील प्राधान्याची बाब झाली आहे.
आणि एक दिवस मंदाला कळलं की ती एचआयव्ही पॉझिटिव्ह आहे. कार्यकर्त्यांना जेव्हा तिने हे सांगितले तेव्हा त्यांनी तिला धीर दिला. सुरवातीला खचू लागलेली मंदा ठामपणे उभी राहिली. दोन ते तीन वेळा कठीण आजारातून बाहेर आलेली मंदा म्हणते ''ज्या बायका माझ्यासारख्या आहेत त्याचं उरलेलं आयुष्य चांगलं जावं व ज्या माझ्यासारख्या नाहीत (एचआयव्ही संसर्गित) त्या माझ्यासारख्या होऊ नयेत म्हणून मला काम करायचंय आणि ते पण सगळयाच्या साक्षीने''.
आज मंदा सखी संघटनेची खजिनदार आहे. एचआयव्ही सेक्स वर्कर्सच्यासाठी आरोग्यनिधी उभारण्यात तिचा सिंहाचा वाटा आहे. बायकांना बचतीचे महत्व समजावून सांगून प्रश्न सोडवण्यात सहभागी होते. महिलांचे हक्क व अधिकार जपण्यासाठी पुढाकार घेते. महिलांचे प्रश्न सोडवण्यात सहभागी होते. पोलीस चौकी, सरकारी दवाखाना यामध्ये मंदाला आदराची वागणूक असते. कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठात सेक्स वर्कर्स संबंधीच्या चर्चासत्रासाठी मंदाला विषयतज्ञ म्हणून बोलाविण्यात आले. टोरांटो येथील सोळाव्या जागतिक एड्स परिषदेत मंदाने सेक्स वर्कर्स महिलांचे प्रतिनिधित्व केले. मानवाधिकार दिनाच्या दिवशी पंतप्रधान आय. के गुजराल यांना दिलेल्या निवेदनात सेक्स वर्कर्स व एचआयव्ही पॉझिटिव्ह सेक्स वर्करच्या अधिकाराबाबत मंदाने मत मांडले. महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्थेच्या राज्यस्तरीय एचआयव्ही संसर्गित लोकांच्या समितीवर सेक्स वर्कर करणार्या स्त्रियांचे प्रतिनिधित्व मंदा करते.
एकेकाळी जगण्याची इच्छा संपलेल्या मंदाची ही आतापर्यंतची वाटचाल. धंद्यातील इतर महिलांनाही नव्हे तर प्रकल्पाचे कार्यकर्ते व इतर अनेक लोकांसाठी प्रेरणादायी आहे.
खूप कठीण गेलं -- माणसांवर विश्वास टाकणं! --- पण शेवटी कमळ उगवलं.
रितसर लोकशाही पध्द्तीनं निर्माण झालं - सखी संघटन.
आता विश्वास बसत नाही!
पोलिस दिसले की पळत सुटायची ती मीच? रस्त्यावर झिंगून पडायची ती मी?
आता पोलिस स्टेशनला चहा पाजला जातो, नारी सारखी मोठी संस्था एच आय व्ही
सेंटरला सर्वेसाठी येते तेव्हा आमच्या ज्योतीताईंना प्लॅनींगसाठी बोलावते. गुन्हेगारी कमी झालेय. कमी वयाच्या मुली वेश्याव्यवसायात दिसल्या तर सखी संघटनाच त्यांना परावृत्त करते.
पण पुढे खूप काही आव्हानं आहेत. स्वत:चं आरोग्य सांभाळायचयं, मुलींना शिक्षण देऊन वेगळी संधी मिळवून द्यायचेय.
एच आयव्हीनं शिरकाव केलेल्या बहिणींच्या मोठ्या गटाला आधार द्यायचाय. बघा ना - टी बी ची ट्रीट्मेंट मोफत मिळते, पण त्यावेळा धंदा होत नाही. पोटात कोण घालणार?
अश्या अनेक मोठ्या अडचणी व त्यासाठी लागणारा पैसा. ते सोंग नाही आणता येत एकत्र येऊनही.
शरीर विकून सात आठ हजार गोळा झालेत, पण कसे पुरतील?
आता एक मात्र झालय. मनात विश्वास आहे -- की समाज सहृदय आहे.
याच विश्वासानं तुम्हा सर्वांना हे बोलावणं. या इथं भेटायला, नातं जोडायला. परवा अभिनेते विक्रम गोखले नातं जोडून गेले भावाचं.
देणगी द्यावीशी वाटली हे वाचून - तर संपर्क करा -
सखी संघटन, धर्मादाय आयुक्त नोंदणी क्रमांक - महा/२५९६५/को.
दूरध्वनी - ९१ - २३१२६४२८७६, ९१ - ९४२२४२४८५८
इ-मेल - sakhisanghatan@gmail.com
आपण आपली मदत बॅंकेतही जमा करु शकता -
Bank Account - SAKHI SANGHATAN,
State bank of Hydrabad.
A/C no. - 62107599580.
|