| मुक्तांगण- एक शून्य शून्य |
|
जैन मंदिरातील चोरी (भाग १)
दक्षिण मुंबईतील फोर्ट परिसरात असलेल्या पोलिस ठाण्यात मी नेमणूकीस होतो. त्या दिवशी फोर्ट परिसरात असलेल्या जैन मंदिराचे विश्वस्त पोलिस ठाण्यात आले आणि मंदिरात चोरी झाल्याची माहिती दिली. जैन व्यक्तींना दीक्षा देण्यापूर्वी त्यांची एका चांदीच्या रथातून मिरवणूक काढली जाते. तो रथ म्हणजे एक प्रकारे बैलगाडीच असते. मात्र त्यावर चांदीचा नक्षीकाम केलेला पत्रा चढविलेला असतो. गाडीला रथासारखा आकार दिलेला असतो आणि वरती कळससुध्दा असतो. अत्यंत उमद्या बैल जोडीच्या मदतीने त्या रथाची मिरवणूक काढली जाते. मिरवणूकीनंतर तो रथ जैन मंदिरातच एका गोडाऊनमध्ये सुरक्षित ठेवलेला असतो.
दुस-या दिवशी रथाचा वापर करायचा असल्याने पॉलिश करण्यासाठी तो गोडाऊनमधून बाहेर काढला असता त्यावर जागोजोगी चांदीचा पत्रा फाडून काढलेला होता. फाडलेला पत्रा सुमारे १० ते १२ किलो वजनाचा होता. तक्रार समजताच ठाणे अंमलदार अधिकारी माझ्या कक्षात आला आणि त्याने मला त्याबाबत माहिती दिली. धार्मिक स्थळामध्ये चोरी झालेली असल्याने प्रकरण निश्चितच गंभीर होते. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन मी स्वत: माझ्या विशेष पथकातील दोन पोलिसांना घेऊन ठाणे अंमलदार अधिका-यासोबत जैन मंदिरात पोहोचेलो. मंदिराच्या आत ब-याच खोल्या होत्या. त्यापैकी एका कोप-यातल्या खोलीला रोलिंग शटर लावलेले आढळले ते शटर उघडतांना जमीन व शटर ह्यामध्ये सुमारे आठ इंच जागा मोकळी रहात असल्याचे मी पाहिले. शटर गंजलेले असल्याने पूर्ण बंदही होत नव्हते. गोडाऊन मंदिराच्या परिसरात, अंर्तभागात असल्याने शटर दुरुस्त करून घेण्याची काळजी घेतली नव्हती असे विश्वस्तांचे स्पष्टीकरण होते.
शटर उघडून आम्ही गोडऊनमध्ये प्रवेश केला. झगझगीत चांदीमुळे डौलदार वाटणारा रथ, फाडलेल्या चांदीच्या डागांमुळे अतिशय केविलवाणा दिसत होता. ह्यापूर्वी हा रथ कधी वापरला होता याबद्दल चौकशी केली असता विश्वस्तांनी दोन महिन्यापूर्वी, मिरवणूकीनंतर रथ गोडाऊनमध्ये ठेवल्याचे व त्यानंतर सकाळीच गोडाऊन उघडल्याचे सांगितले. म्हणजेच चोरी दोन महिन्यातच कधीतरी झाली होती. ह्या दोन महिन्यात शेकडो नव्हे तर हजारो भाविक मंदिरात येऊन गेले असतील. ह्या चोरीचा तपास लागणे अशक्य वाटते ही ठाणे अंमलदार अधिका-यांची पहिली प्रतिक्रिया दुर्लक्षित करून मी रथाचे निरीक्षण करण्यास सुरूवात केली. रथाचा डवीकडील भाग, जवळपास पूर्ण जोखड (बैलाच्या मानेवर ठेवला जाणारा आडवा जाड दांडा) तसेच रथाच्या कळसाचा डावीकडील भाग येथील पूर्ण पत्रा फाडून काढलेला होता.
चांदीचा पत्रा फाडून काढल्यानंतर त्याच्या फाटलेल्या कडा चमकदार असतात पंरतु मुंबईच्या दमट हवामानामुळे त्या काही काळाने काळया पडतात. रथाचा पत्रा काढलेल्या कडा चांगल्याच काळवंडलेल्या दिसत होत्या त्याअर्थी चोरी होऊन बराच काळ लोटलेला असावा असा माझा प्राथमिक निष्कर्ष होता. दुसरी बाब म्हणजे सदरचा पत्रा मेटल एम्बॉसिंग तंत्राप्रमाणे लाकडावर अतिशय घट्ट ठोकलेला असतो व त्यामुळेच लाकडावर कोरलेली नक्षी चांदीच्या पत्र्यावरून स्पष्ट दिसत असते. अशाप्रकारे काळजीपूर्वक ठोकलेला पत्रा काढणे सहज शक्य नसते. त्यातही फाडलेल्या त्या पातळ पत्र्याच्या तुकडयाचे वजन १०/१२ किलो भरत होते म्हणजेच सहज उचलेगिरी करणा-या संधी साधू चोरटयाचे हे काम नक्कीच नव्हते.
त्यानंतर मी विश्वस्तांकडे जास्त विचारपूस करण्यास सुरूवात केली. मंदिरात रात्री मुक्कामाला कोण असते ह्याबाबत माहिती देतांना विश्वस्तांनी मंदिराचे पुजारी रहातात व त्यांच्या व्यतिरिक्त जैन देरासरमध्ये ज्या जेवणावळ होतात त्यासाठी केटरिंग एजन्सीची माणसेही रात्री तेथे असतात असे सांगितले.
जैन पध्दतीची जेवण करणारे काही ठराविकच केटरर्स जैन मंदिरातील जेवणाची कंत्राटे घेत असतात, त्यामुळे मी गेल्या दोन महिन्यात ज्या केटरिंगवाल्यांनी जेवणाची कंत्राटे घेतली होती त्यांची नावे व पत्ते मागितली. मला पाच कंपनीची नांवे मिळाली. सदर पाच केटरिंग कंपनीजमध्ये जाऊन चौकशी केली असता दोन कंपनीमधील जेवण तयार करणारे सर्व कर्मचारी नियमितपणे कामावर हजर असल्याचे सांगितले. बाकी तीन कंपनीमध्ये नेहमी काम करणारे कर्मचारी काही ना काही कारणामुळे कामावर येत नाहीत असे समजले. त्यापैकी एक कर्मचारी स्वभावताच अनियमित असल्याचे दिसले बाकी दोन कंपन्यांपैकी एका कंपनीतील एक कर्मचारी सुमारे सव्वा महिन्यापासून येत नाही असे समजले. त्याचे नांव विचारले असता त्याचे टोपण नाव 'बटलर' असे समजले. बटलर नावाचे स्पष्टीकरण विचारताच तो बुटका व लहानखुरा असल्याने त्साला बटलर म्हणतात असे सांगितले. त्या बटलर नावाने माझी जिज्ञासा चाळवली व मी त्याच्यावर लक्ष केंद्रित केले. तो बुटका व लहानखुरा असल्याने बिघडलेल्या रोलिंग शटर व जमीन ह्यातील ८ इंचाच्या मोकळया जागेतून सरपटत आत शिरकाव करून घेईल असा अंदाज होता.
दक्षिण मुंबईत भुलेश्वर भागात जेवणावळीत वाढीची कामे करणारे लोक रोजगारासाठी ठराविक गल्लीत जमतात व त्यांचे काही एजंटही असतात ह्याची मला सर्वसामान्य माहिती होती.
भुलेश्वरमधील त्या गल्लीत जाऊन मी तेथील एका जुन्या जाणत्या एंजटला गाठले व बटलर बद्दल चौकशी केली असता त्याने गेल्या काही दिवसांपासून कामाच्या शोधात गल्लीत येतो असे सांगितले, पंरतु त्याच्या येण्याबद्दल निश्चित काहीही सांगता येणार नाही असे सांगितले. विनाकारण एका माणसासाठी दिवसेंदिवस पोलीस शिपायांना बसवून ठेवणेही अयोग्य होते. कारण पोलिस ठाण्यातही इतरही महत्त्वाच्या गुन्ह्यांचा शोध घेण्याचे काम सुरू होते म्हणून मी एक धाडसी निर्णय घेतला.
- सुहास गोखले
|
|
कृपया लेखांबाबत वाचकांनी प्रतिक्रिया feedback@marathiworld.com वर ईमेलने कळविल्यास यानंतरही काही संस्मरणीय प्रकरणांची माहिती देता येईल.
सदर हकीगत कथनकर्ता, लेखक नसून सामाजिक जाणीवा जागृत ठेवण्याचा प्रयत्न करणारा पोलीस अधिकारी आहे हे विचांरात घ्यावे ही विनंती. |
|
|