| मुक्तांगण- एक शून्य शून्य |
|
जैन मंदिरातील चोरी (भाग २)
मी माझे नांव व पोलिस ठाण्याचा पत्ता लिहून त्या एजंटाकडे दिला. त्याला समजाऊन सांगितले की जेव्हा कधी २/४ दिवसांत बटलर येईल त्यावेळी सदर एंजटाने माझ्या नावाची चिठ्ठी बटलरकडे देऊन त्याला ''हे साहेब माझे जुने परिचयाचे आहेत. त्यांचयाकडे काही धार्मिक बाबीसाठी बरेच लोक जेवायला येणार आहेत म्हणून त्यांनी २/३ विश्वासाची माणसे पाठवावी असे मला सांगितले आहे. तू ही चिठ्ठी घेऊन १/२ जोडीदारांसोबत साहेबांना पोलिस ठाण्यात जाऊन भेट, म्हणजे साहेब कार्य कधी आहे व काय आहे त्याची माहिती देतील व पैशांचेही ठरवतील " असे सांगण्याबद्दल सांगितले व मी पोलिस ठाण्यात परतलो.
तिस-या दिवशी मी पोलिस ठाण्यात काही कागदपत्रे तयार करत असतांना, शिपायाने 'बटलर' नावाचा इसम एका जोडीदारासह मला भेटायला आल्याचे सांगितले. बटलरला माझ्या कक्षात घेऊन मी त्याच्याकडे खरोखरच काहीतरी कार्य असावे अशा अविर्भावात विचारपूस केली व हळूहळू प्रश्नांचा रोख जैन मंदिराकडे वळवला. सुमारे दीड तासाच्या अथक उलटसुलट चौकशीनंतर अखेर बटलरने चांदीचा पत्रा चोरण्याची कबूली दिली. त्यानंतर चोरलेला मुद्देमाल परत मिळविण्याचे महत्त्वाचे काम बाकी राहिले.
बटलरला मी विशेष पथकाच्या ताब्यात देऊन त्याने चोरी केल्याचे कबूल केले आहे. रथाच्या कोणत्या भागातील पत्रा फाडलेला आहे हे ही अचूक सांगितले आहे. तरी आता तुम्ही तुमच्या पध्दतीने मुद्देमाल कोठे ठेवलेला आहे किंवा विकलेला आहे ह्याची माहिती काढा असे आदेश दिले.
सदर पथकाला तुमच्या पध्दतीने माहिती काढा असे सांगण्याचे कारण म्हणजे ह्या पथकातील बहुतेक कर्मचा-यांचा कल, कथा कादंब-यात पोलिसी हिसका, ''पोलिसी खाक्या'' या शब्दात वर्णन केले जाते त्या पध्दतीवर प्रचंड विश्वास होता. त्यापैकी काहींनी तर आमच्या वरिष्ठांकडे, ''साहेब नुसतेच बसवून विचारपूस करण्यात वेळ घालवतात. हातापायांचा वापर करीत नाहीत'' अशा स्वरूपाच्या तक्रारीही केल्या होत्या. तपासाच्या ह्या तंत्रावर माझा विश्वास नसल्याने आमचे काहीसे वाद होत असत.
पुढील १० दिवस सदर पथकातील कर्मचा-यांनी त्यांच्या तंत्रात बसणा-या सर्व क्लूप्त्या वापरून, विचारपूस करून पाहिली. बटलर दर दोन दिवसांनी वेगवेगळी हकीगत सांगत असे व वेगवेगळी दुकाने दाखवीत असे व तेथे माल विकल्याचे सांगत असे. प्रत्येक वेळी त्याने दिलेली माहिती खोटी असल्याचे निष्पन्न होत असे.
मी चौकशीचे प्रकार पहात होतो व पोलिसी भाषा, पोलिसी खाक्या ह्याचा अतिरेक होत नाही ना ह्याकडेही लक्ष ठेवत होतो. बटलरच्या हालचाली व वर्तणूक ह्याकडे लक्ष देत असतांना माझ्या ध्यानात आलेली एक बाब म्हणजे शरीराने अत्यंत काटक व कणखर असलेला बटलर झुरळांना घाबरत होता किंवा त्याला त्याची किळस वाटत असे.
आठवडाभराच्या चौकशीनंतर बटलरने आणखीनच नवीन हकीगत सांगितली. ती हकीगतही शहानिशा केल्यावर खोटी असल्याचे उघडकीला आले पंरतु तो किस्सा खरोखरच पोलिस खात्याच्या कामात अतिशय कायदेशीर आणि नावलैकिकात भर घालणारा ठरला. विषयात्तर होऊ नये म्हणून सध्या कथन करीत असलेल्या बटलरची हकीगत पूर्ण करतो. त्यानंतर पुढील भागात बटलरमुळे मिळालेल्या जावेदची हकीगत कथन करेन.
१० दिवसांनंतर बटलरला पुन्हा न्यायालयात हजर करण्याची मुदत २ दिवसांवर आल्याने मी पथकातील सर्व अंमलदारांना बटलरसह बोलावले आणि मुद्देमालाची माहिती मिळाली किंवा नाही ह्याबद्दल विचारणा केली. ह्यावर सर्वच अंमलदार उसळून बटलर किती निर्ढावलेला गुन्हेगार आहे व त्याच्याकडून माहिती मिळणे कसे अवघड आहे हे सांगू लागला.
पोलिसी भाषा, पोलिसी हिस्का प्रत्येकवेळीच उपयोगी पडतो ही आमची समजूत चुकीची होती व ह्यानंतर अशा तंत्राचा वापर करण्याचे शक्यतो टाळू हे त्यांनी कबूल केले आणि नंतर मी त्यांच्या देखत माझ्या चौकशीला सुरूवात केली.
बटलर सुमारे १० दिवस एकाच अर्ध्या पँटमधे रहात होता. मी एका हवालदाराला एक जुना पण न फाटलेला पायजमा आणण्यास सांगितले. एक पंचा देऊन बटलरला मळलेली हाफ पँट काढून टाकून पायजमा घालण्यापूर्वी पाहिजे असल्यास हातपाय स्वच्छ धुवून केवळ पायजमा घालावा असे सांगितले. त्यानंतर चहा, नाष्टा दिला. ह्या कनवाळू साहेबाला आपण आरामात गुंडाळू अशी त्याची मनोभूमिका तयार होत आहे ह्याची खात्री पटली. त्यानंतर दोन शिपयांना एक रिकामा खोका देऊन काय करायचे हे सांगून जवळच असलेल्या मंडईत पाठवले. शिपाई येईपर्यत बटलर चांगलाच बेफिकीर झाला होता. त्यानंतर इलॅस्टीकचे दोन बँड देऊन बटलरने घातलेल्या पायजम्याचे दोन्ही पाय बटलरच्या पायाच्या घोटयाजवळ बांधण्यास सांगितले. मंडईतून शिपाई परतल्यावर त्यांच्या हातातील खोका उघडून त्यात पकडून आणलेली १५/२० पंख असलेली तपकिरी झुरळे बटलरला दाखवून ती सर्व झुरळे आता पायजम्यात सोडण्यात येणार असल्याचेही सांगितले. आधीच ठरल्याप्रमाणे आमच्या एका वयस्क हवालदारांनी कळवळून, ''नको साहेब ही मोठी झुरळे नाजूक कातडी कुरतडतात हो त्यामुळे विषही उभरते'' अशी विनंती केली. मी तेवढयाच बेफिकीरपणे असे काही कुरतडले तर दवाखान्यात नेऊन टिटॅनसचे इंजेक्शन टोचून आणा'' असे सांगितले.
झुरळे पाहूनच बटलरला दरदरून घाम फुटला होता. तो दूर होण्याची धडपड करीत होता. मी इशारा करताच दोन शिपाई एक झुरळ पकडून बटलरकडे वळले. त्यांच्यापैकी एका अतिउत्साही शिपायाने झुरळ पायजम्याच्या आवळलेल्या नाडीजवळून आत ढकलले आणि काय आश्चर्य....
१० दिवस सर्व पोलिसी चमत्कारांना बिनधास्त तोंड देऊनही न बधणारा बटलर पोपटासारखा बोलू लागला. त्यानंतर सुमारे दोन तासात आम्ही विकलेल्या मुद्देमालासह पोलिस ठाण्यात परतलो होतो. सदर बटलर विरुध्द अखेर न्यायालयात गुन्हा सिध्द झाला व बटलर सक्त मजूरीसाठी कारागृहात रवाना झाला. संवेदनशील स्वरूपाच्या धार्मिक स्थळांतील चोरीच्या प्रकरणाची यशस्वी अखेर झाल्याने आम्ही सुटकेचा निश्वास सोडला.
- सुहास गोखले
|
|
कृपया लेखांबाबत वाचकांनी प्रतिक्रिया feedback@marathiworld.com वर ईमेलने कळविल्यास यानंतरही काही संस्मरणीय प्रकरणांची माहिती देता येईल.
सदर हकीगत कथनकर्ता, लेखक नसून सामाजिक जाणीवा जागृत ठेवण्याचा प्रयत्न करणारा पोलीस अधिकारी आहे हे विचांरात घ्यावे ही विनंती. |
|
|