| मुक्तांगण- एक शून्य शून्य |
|
शोध अविनाशचा (भाग-१)
जे. जे. मार्ग पोलीस ठाणे येथे मी कर्तव्यावर असतांना,पोलीस ठाणे नव्यानेच सुरू झालेले असल्यामुळे तेथे पो.उपनिरीक्षक फार कमी होते. त्यामुळे व तेथील वरिष्ठ पो.निरीक्षकांच्या हाताखाली मी त्यापूर्वी काम केले असल्यामुळे त्यांना माझ्या कार्यपध्दतीची पूर्ण कल्पना असल्यामुळे, पो.ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण अधिकारी व गुन्हे प्रतिबंधक अधिकारी अशा दोन जबाबदार्या माझ्यावर टाकण्यात आल्या होत्या. मीही त्यापूर्वी सलग चार वर्षांपेक्षा जास्त काळ प्रथम विमानतळ सुरक्षा व नंतर विशेष सुरक्षा विभाग (एस.पी.जी) येथे अ कार्यकारी शाखांमध्ये काम केलेले असल्याने पोलीस ठाण्याच्या कामात अपेक्षेपेक्षा जास्त लक्ष घालत होतो. १९९२/९३ च्या भीषण जातीय दंगलीच्या पार्श्वभूमीवर पो.ठाणे नवीन सुरू करण्यात आलेले असल्याने व तेथे गुन्हेगारी जास्त असल्यामुळे, पो.ठाण्याची जरब वाढावी आणि गुन्हेगारांना वचक बसावा अशी माझी भावना होती.
त्यावेळी सलग ४/५ दिवस मी पो.ठाण्यातच रहात असे, आठवडयातून १/२ वेळा घरी जात असे. अशाच एका संध्याकाळी सात वाजण्याच्या सुमारास वरिष्ठ पो.निरीक्षकांनी मला त्यांच्या कक्षात बोलावून मी त्या दिवशी काय करणार आहे? घरी जाणार आहे का? याबद्दल विचारणा केली. "३/४ दिवस घरी गेलेलो नाही त्यामुळे जर काही तातडीचे काम नसेल तर मी आज ८ वाजता घरी जाण्याचा विचार करतो आहे" असे सांगितले. "आजचा दिवस जाऊ नकोस. रात्री हा परिसर नीट पाहून ठेव आणि रात्री तीन वाजता मला घरी फोन कर" असे सांगून साहेबांनी एका कागदावर 'शम्स्' टेमकर मोहल्ला असे लिहून तो माझ्याकडे सरकवला.
मेडिकल कॉलेजच्या कॅटीनमध्ये जेवण करून मी माझ्या कक्षात बाकावर पडलो आणि रात्रपाळीच्या शिपायाला मला अकरा ते सव्वा अकराच्या सुमारास गस्तीवर जातांना उठवण्यास सांगितले. रात्री शिपायांबरोबर पायी फिरून टेमकर मोहल्यातील 'शम्स्' नावाच्या बंद ऑफिसचा परिसर नीट पाहिला. 'शम्स्' हे कुख्यात गुन्हेगाराचे ऑफिस असून ते बरीच वर्षे बंदच आहे. दारावर व भिंतींवर न्यायालयाच्या व पोलिसांच्या असंख्य नोटीसच्या प्रती चिकटविण्यात आलेल्या होत्या. रात्री साडे तीनच्या सुमारास साहेबांना फोन करून उठवल्यावर अर्धा ते पाऊण तासात साहेब पोलिस ठाण्यात हजर झाले. मला कक्षात बोलावून त्यांनी सांगितले की वरिष्ठांकडून मिळालेल्या माहितीप्रमाणे पहाटे किंवा सकाळी अविनाश नावाचा इसम टेमकर मोहल्यात येणार असून त्याच्याकडे विदेशी बनावटीचे बेकायदा पिस्तूल आहे असे सांगितले.
मिळालेली माहिती अत्यंत तुटपूंजी तसेच अविनाशचे वर्णन नव्हते व टेमकर मोहल्यात तो 'शमस्' परिसरात येणार आहे ते ठिकाण किंवा वेळ ह्याचीही माहिती नव्हती. मी माझ्या पथकातील शिपायांना माहिती दिली आणि टेमकर मोहल्यांत आणि शम्स् ऑफिसच्या परिसरात इमारतींच्या व्हरांडयात आणि जिन्यात अंधारात शिपायांना वेगवेगळया ठिकाणी थांबवण्यास सांगून मी आणि साहेब अशाच एका अंधार्या जिन्यात थांबलो.
सुमारे तीन तास म्हणजे सात ते साडेसातच्या सुमारास गल्लीत वर्दळ वाढल्यावर तेथे थांबणे अशक्य वाटल्याने व रहिवासी आमच्याकडे संशयाने पहात असल्याने आम्ही पाळत ठेवण्याचे काम थांबविण्याचे ठरविले. रात्रभर थंडीत शिपायांना थांबविले असल्यामुळे त्यांना चहा देऊन मी पोलिस ठाण्यात आणतो असे मी साहेबांना सांगितल्यावर साहेबही आमच्यासोबत चहा पिण्यासाठी आले. दोन अधिकारी त्यातील एक वरिष्ठ अधिकारी असल्यामुळे गल्लीतील हॉटेलमध्ये शिपाई बाजूच्या टेबलवर बसले. मी माझ्या नेहमीच्या पध्दतीने आंत शिरण्याच्या दरवाजाकडे तोंड करून बसलो. चहाची वाट पहात असतांनाच हॉटेलच्या दारासमोरून एक तरूण जातांना दिसला.
"मुस्लीम मोहल्यांत हिंदू ठेवणीचा चेहेरा लगेच लक्षात येतो ना सर", मी त्याच्याकडे निर्देश करून साहेबांना म्हणालो. हो, आपल्या अविनाशकडे परदेशी बनावटीचे अग्निशस्त्र (पिस्तूल) आहे अशी खबर आहे. पण ह्या तरूणाच्या हातात पिशवीवैगरे काही दिसत नाही. फक्त एक छत्री आहे, साहेब उदगारले. तरीही मी त्याच्याकडे बघत राहिलो. तो तरूण 'शम्स्' समोरच्या पानाच्या टपरीवर गेला, त्याने सुपारी तोंडात टाकून पाच मिनिटे उभा राहिला व पुन्हा परतीच्या वाटेला लागला. तो पुन्हा हॉटेलसमोरून जाऊ लागला. तेव्हा मी पथकातील दोन शिपायांना बोलाऊन त्या तरूणाकडे हलकासा निर्देश केला, व सांगितले त्या तरूणाला त्याचे नांव विचारा अविनाश असे सांगितले तर त्याला पोलिस ठाण्यात घेऊन जा, अशा सूचना दिल्या. शिपाई गेल्यावर मला अचानक जाणीव झाली. ''सर, आपल्याला खबर पिस्तूलाची आहे जर तो तरूण अडचणीत आला तर तो शिपायांवरही हल्ला करण्याची शक्यता आहे त्याच्यांकडे कोणतेही शस्त्र नाही. विनाकारण धोका नको, असे सांगून मी चहा सोडून रस्त्यावर आलो. माझ्या समोरच दोन शिपाई त्यांच्यापुढे तो तरूण गल्लीबाहेर पडले. गल्लीबाहेर गेल्यावर शिपायांनी त्या तरूणाला थाबंवले त्याच्याशी बोलून शिपायांनी या तरूणास सोडून ते माझ्याकडे आले. काय झाले असे विचारले असता "ते पो.अधिकरी आहे. फौजदार प्रशांत देशपांडे असे त्यांचे नांव असून ते ठाण्याला असतात" असे शिपायांनी सांगितल्यावर त्या तरूणाच्या देहयष्टी व पोशाखावरून त्यांचे म्हणणे पटण्यासारखे होते. पण ठाण्याचा कोणीही पोलिस अधिकारी एकटा नागपाडयातील टेमकर मोहल्यासारख्या ठिकाणी एकटा येणार नाही, येताना त्याचे शिपाई बरोबर आणेल आणि प्रथम स्थानिक पोलिस ठाण्यात येऊन पोलिस मदत मागेल, ह्याची खात्री असल्याने मी दोन्ही शिपायांना सोडून धावतच त्या तरूणाच्या मागे गेलो व त्यास थांबवले. त्याने त्वरीत ''येथे माझ्याशी बोलू नका, माझ्यावर पाळत आहे आणि मी पोलिसांच्या कामासाठीच आलोय असे त्याने घाईघाईने सांगितले. मला त्याचे बोलणे चमत्कारी वाटल्याने मी त्याच्या पँटमध्ये खोचलेल्या शर्टच्या कमरेच्या डाव्या बाजूला हात घातला. तेव्हा अग्नीशस्त्राची मूठ हाताला लागली. मी शस्त्र बाहेर काढले असता ते हंगेरीयन बनावटीचे पिस्तूल होते. त्याच्या क्लिपमध्ये गोळयाही होत्या.
पोलिस खात्यात ९ मि.मी पिस्तूले भारतीय बनावटीची आहेत, व जी परदेशी आहेत ती बेल्जियमची आहेत. हंगेरीयन पिस्तूले महाराष्ट्र पोलिस दलात वापरत नाहीत. ह्याची माहिती असल्याने मी तेच पिस्तूल त्या तरूणावर रोखले. त्यावेळी त्याने दोन्ही हात वर करून ''साहेब मारू नका, मी हत्यार द्यायला आलो होतो.'' असे सांगितले. त्या तरूणाने पिस्तूल नागपाडयात देण्यास आलो होतो असे सांगताच, मी माझे पोलिसी कर्तव्य सुरू केले. तोपर्यंत आमच्या आजूबाजूला माणसे जमू लागली होती. त्यातील दोघांना मी साक्षीदार म्हणून काम करण्याची विनंती केली. त्यापूर्वी मी माझी स्वत:ची आणि सोबतच्या शिपायांची ओळख करून दिलेली असल्याने त्या दोन्ही व्यक्ती पंचनाम्यासाठी तयार झाल्या. दरम्यान साहेब व इतर स्टाफही तेथे पोहोचला. पंचनामा करून ते पिस्तूल जप्त करून त्या तरूणासह आम्ही पोलीस ठाण्यात आलो. त्याच्या झडतीत एक चिठ्ठी सापडली त्यावर अविनाश असे नांव व एक स्थानिक फोन नंबर होता, आणि दुसर्या एका चिठ्ठीत दुबई येथील एक नंबर होता.
आरोपीच्या सांगण्याप्रमाणे दुबईचा क्रमांक त्यांच्या मुख्याचा खास सहका-याचा होता. ते हत्याराची देवघेव करण्यास येत त्यावेळी बनावट नावाचा वापर करीत. तसेच हे अविनाश हे नाव बनावट नाव होते. नागपाडयात परत करण्यात आलेले पिस्तूल त्यांना साथीदारांनी दिलेले होते. त्याच पिस्तूलाच्या व इतर हत्यारांच्या साहाय्याने त्याने व त्याच्या साथीदाराने घाटकोपर (पूर्व) येथे टाईल्स व मार्बल विक्रेत्याचा त्याच्याच शोरूम मध्ये भरदिवसा खून केलेला होता. ते पिस्तूल त्या दिवशी परत देण्यास तो आला होता.
आरोपीस न्यायालयात हजर करून, त्याची पोलिस कोठडीत रिमांड घेण्यात आली होती. त्याच्याजवळच्या चिठ्ठी मधील स्थानिक फोनवर फोन लावण्याचा प्रयत्न केला असता त्यास उलट उत्तर मिळत नव्हते. मी माझ्या वरिष्ठांना दुबई येथील क्रमांकावर फोन लावून बघण्याची परवानगी मागितली पण त्यांनी त्यास नकार दिला. दुबई येथे फोन लावून काहीच उपयोग होणार नाही हे त्यांचे म्हणणेही रास्त होते.
हत्यार परत घेण्यासाठी येणारी व्यक्ती रस्त्यावरच भेटणार होती आणि ती व्यक्तीही 'अविनाश' हेच नांव सांगणार होती. दोघांनीही एकच नांव सांगितल्यावर ओळख पटून हत्यार त्यांच्याकडे द्यायचे होते. थोडक्यात आमचा तपासच खुंटल्याप्रमाणे वाटत होते. आता पुढे तपास लागण्याची शक्यता नसल्याने स्थानिक क्रमांक जो चिठठीवर लिहिलेला सापडला होता. त्याचा शोध घेतला असता तो सुध्दा पानाच्या एका टपरीवरील क्रमांक असल्याचे आढळले. त्यामुळे तपासाची ती दिशाही बंद झाली होती. आता आमचा तपास पूर्ण करून घाटकोपर (पूर्व) येथील पो.ठाण्यात आरोपीस ताब्यात घेण्याबाबत सांगावे असे सर्वांचेच मत झाले होते. दुसर्या दिवशी काही वृत्तपत्रात ह्या अटकेची ही बातमी प्रसारीत झाली होती. त्यादिवशीही इतर काहीच मार्गच नसल्याने मी माझ्या वरिष्ठांना दुबई येथे फोन लावून काहीतरी प्रयत्न करतो म्हणून परवानगी मागितली. इतर काहीच मार्ग नसल्याने वरिष्ठांनीही शेवटचा प्रयत्न करण्यास परवानगी दिली.
परवानगी मिळताच मी आरोपीस लॉकअप बाहेर काढून माझी योजना सांगितली व अनिल परबशी काय बोलायाचे आहे ते सांगितले. वरिष्ठ अधिकार्यांच्या देखरेखीखाली आम्ही आरोपीस एका फारशी वर्दळ नसलेल्या ISD सेंटरजवळ नेले. आरोपीने दुबई येथील नंबर लावला. संमातर फोनवर आम्ही सदर संभाषण व दुबई येथील बातचीत ऐकत होतो. दुबई येथे लावलेला फोन आण्णा ह्याने उचल्यावर आमच्या आरोपीने बोलण्यास सुरूवात केली. त्याने नाव सांगताच ''अरे तू तर पोलिसात जमा झालास ना''? आजच्या पेपरमध्ये बातमी आहे" आण्णा उदगारला. आरोपीला पढवून ठेवल्याप्रमाणे त्याने बोलण्यास सुरूवात केली. ''आण्णा, एरिया नवीन होता म्हणून मी वाडीतला एक मुलगा सोबत आणला होता. हत्यार त्याच्याजवळ ठेवले होते. त्याला टेमकर मोहल्यात पाठवून मी नाक्यावर उभा राहिलो. पोलिसांना टिप होती. त्यांनी त्याला उचलला. तो पोरगा 'व्हाईट' असल्याने (गुन्हेगारी जगातील नसल्याने) तो घाबरला आणि त्याचे नांव विचारल्यावर त्याने माझे नांव त्याचे नांव म्हणून सांगितले. पोलिसांनी त्याला हात टाकल्याबरोबर मी तेथून सटकलो. आण्णाचा आवाज साशंक होता. "मी आत्ता घाईत आहे, तू एक काम कर कोठेतरी लपून रहा आणि मला संध्याकाळी फोन कर!" आण्णाने आदेश दिला. अण्णा काहीतरी खात्री करून घेण्याचा प्रयत्न करेल, ह्याची जाणीव झाल्याने मी आरोपीस घरच्या जवळपास फोन असल्यास तेथे फोन करून आईला बोलावून घे आणि अण्णाला सांगितलेली हकीगत तिलाही सांग असे सांगितले. त्याप्रमाणे त्याने आईला तो पकडला गेला नसल्याचे व मित्राकडे लपून बसला असल्याचे सांगितले. ही माहिती मिळताच त्याच्या आईवरील तणाव दूर झाल्याचे तिच्या आवाजावरूनही जाणवले. तिने त्याला सांभाळून रहाण्याबाबत सूचना दिल्या. देवावर भरवसा ठेव असे सांगून तिने फोन बंद केला.
फोन बंद करण्यापूर्वी त्याने आईला तो काही दिवसांसाठी मुंबई सोडून जाणार आहे व परिस्थिती शांत झाल्यावर परत येईन असे सांगितले.
* सदर लेखातील नावे काल्पनिक आहेत.
- सुहास गोखले
|
कृपया लेखांबाबत वाचकांनी प्रतिक्रिया feedback@marathiworld.com वर ईमेलने कळविल्यास यानंतरही काही संस्मरणीय प्रकरणांची माहिती देता येईल.
सदर हकीगत कथनकर्ता, लेखक नसून सामाजिक जाणीवा जागृत ठेवण्याचा प्रयत्न करणारा पोलीस अधिकारी आहे हे विचांरात घ्यावे ही विनंती. |
|
|