| मुक्तांगण- एक शून्य शून्य |
|
शोध अविनाशचा (भाग-२)
पोलिस दलातील कामाच्या सरावामुळे आणि विशेषत: गंभीर गुन्ह्यांच्या शोधाच्या सरावाने गुन्हेगार कोणत्या पध्दतीने विचार करतील याचा अंदाज करता येतो. माझ्या अंदाजाप्रमाणे अनिल परबने दुबई येथून फोन करून त्याच्या हस्तकापैकी एकाला अविनाशच्या घरी चौकशी करण्यास सांगितले. दुपारी तो अविनाशच्या घरी गेला व त्याने आईकडे चौकशी केली. अपेक्षेप्रमाणे अविनाशच्या आईने त्याला अविनाश मित्राकडे लपलेला आहे. पोलिस शोधत असल्याने तो मुंबई बाहेर जाणार आहे, आणि सर्व शांत झाल्यावर परत येईल असे सांगितले. संध्याकाळी आम्ही पुन्हा अविनाशला दुबई येथे फोन लावण्यास सांगितले. आईला सांगितलेली हकीगतच पुढे सुरू ठेवण्याचे ठरले होते व त्याप्रमाणे अविनाशला पढविण्यात आले होते. "आण्णा माझ्याकडे पैसे नाहीत थोडे पैसे मिळाले तर मी मुंबई बाहेर जाईन आणि २०-२५ दिवसांनी सर्व शांत झाले म्हणजे परत येईन", असे अविनाशने सांगितले.
"मी तुला मुंबईमधील एक नंबर देतो, त्या नंबरवर फोन करून बिट्टूशेठसाठी विचार व शेठला सांग तुमचे कपडे आले आहेत डिलीव्हरी कुठे देऊ? तो जागा सांगेन तेथे तुला पैसे मिळतील", अनिल परबने सुचना दिल्या.
आरोपी अविनाशला फोन करण्यासाठी वारंवार बाहेर काढणे धोक्याचे असल्याने दुसर्या दिवशी मीच अविनाश नावाने फोन करून बिट्टूशेठला डिलीव्हरीच्या जागेबाबत विचारले. "व्यापारी, हमे सेठने सब बताया है। तुम पिछले वक्त जहाँ डिलीव्हरी दिया था वहाँ कल दोपहर में आ जाना" असे बिट्टूशेठने सांगितले. एकंदरीत अनिल परब अद्यापही खात्री करून घेत होता हे माझ्या लक्षात आले. मी आरोपीला लॉकअप मधून बाहेर काढून त्याच्याकडे विचारपूस करण्यास सुरूवात केली. "आत्तापर्यंत किती वेळा पैसे मिळाले? ५-६ वेळा मिळाले आहेत. किती पैसे मिळतात. ५ ते १० हजार, कोण देतो? दरवेळी जागा वेगवेगळया असतात. शेवटचे पैसे कोठे मिळाले होते? मी धीर करून विचारले.
"ठाणा स्टेशनच्या पश्चिमेला स्टेशन बाहेर हॉटेल आहे तेथे मिळाले होते", त्याने सांगितले.
माझ्या प्रयत्नांना यश येत होते. मी पुढच्या तपासाचा मार्ग स्पष्ट व्हावा यासाठी अविनाशला पुन्हा दूबई येथे फोन करून त्यांच्या टोळीचा स्थानिक म्होरक्यास भेटण्याची इच्छा व्यक्त करण्यास सांगितले. वारंवार बाहेर पडणे शक्य नसल्याने दुसर्या दिवशी ठाण्याच्या जवळपासच भेटण्याची व्यवस्था करण्यास सांगितले. अनिल परबने संध्याकाळी फोन करण्यास सांगितले व संध्याकाळी त्याचा स्थानिक म्होरक्या मुंलूड पश्चिम येथे वीणा नगर परिसरात भेटेल असे सांगून 'टेली-लिंक' नावाच्या कम्यूनिकेशन सेंटर जवळ थांबण्यास सांगितले. दुसर्या दिवशी सकाळीच आम्ही दोन पंचासह आरोपीला घेऊन मुंलूंड पश्चिम येथे प्रयाण केले.
लाल बहादूर शास्त्री मार्गावरच एका छोटया गल्लीत वीणा नगर वसाहत व टेलीलिंक कम्यूनिकेशन सेंटर आहे. गल्लीत फारशी वर्दळ नसल्याने आम्ही अविनाशला दोन शिपायांसह एका दुकानात बसविले आणि मी व एक शिपाई दोन पंचासह टेलीलिंकच्या बाहेर असलेल्या आईसक्रीमपार्लर बाहेरच्या टेबलावर बसलो. इतर स्टाफला गल्लीच्या बाहेर जाण्यास सांगितले.
गल्लीबाहेर पाठविलेल्या पथकाने आम्हाला काहीही न सांगता परस्पर ठाण्याची जागा पाहण्याचे ठरविले व ते निघून गेले. गल्लीबाहेर मदतीला कोणीही नाही याची आम्हाला कल्पनाच नव्हती. संघटीत गन्हेगारीमधील आरोपी धोका टाळण्यासाठी कधीही वेळ ठरवून येत नाहीत, त्यामुळे वाट पहाण्याशिवाय गत्यंतर नव्हते. बर्याच वेळाने दुकानात बसवलेल्या अविनाशच्या चेहर्यावर अचानक सावध भाव उमटलेले दिसल्याने मी त्याच्या नजरेच्या रोखाने पाहिले. एक मजबुत बांध्याचा, व्यवस्थित कपडे केलेला तरूण गल्लीत शिरत होता. त्याच्या खाद्यांवर एक निळ्या रंगाची सॅक लटकवलेली दिसत होती. त्या तरूणाकडे इशारा करून अविनाश दुकानात आणखी आत सरकला. त्याच्यासोबत असलेल्या शिपायांनी तो दिसणार नाही अशा पध्दतीने त्याला कव्हर केले होते.
गल्लीत शिरलेला तरूण टेलीलिंक जवळ न थांबता गल्लीच्या आत पार दुसर्या टोकापर्यंत गेला त्याची भिरभिरती नजर शोधकपणे फिरत होती. माझ्याकडे पिस्तूल होते तरीही आपण तेथे थांबून नि:शस्त्र शिपायाला संशयीत तरूणास अडविण्यास सांगणे मला योग्य वाटत नव्हते. मी हळूच माझे पिस्तूल शिपायाकडे सरकवले आणि सावध रहाण्यास सांगितले. "मी त्याला अडवतो तो पळायला लागला किंवा माझ्यावर हल्ला केला तर तू गोळीबार कर" असे मी शिपायाला सांगितले. तो पर्यंत गल्लीच्या दुसर्या टोकाला गेलेला तरूण परतला आणि आमच्या समोरून पुन्हा शास्त्री मार्गाकडे वळाला. मी आणि संशयीत तरूणामध्ये सुमारे १५ फुट अंतर होते, म्हणजेच मी त्याच्याकडे धावलो तर त्याला शस्त्र काढून गोळीबार करण्याची संधी होती.
"ए, संजय" मी त्याला हाक मारली तो मागे वळाला पण माझा अनोळखी चेहरा पाहून त्याने "माझे नाव संजय नाही, संदिप आहे" असे उत्तर दिले. "अरे तू येथे मुलूंडलाच राहतोस ना?" मी पुन्हा विचारले. "नाही, मी जोगेश्वरीला राहतो", तो उत्तरला. हे संभाषण सुरू असतांना तो थांबत होता व मी चालत होतो. त्यामुळे आमचे अंतर कमी झाले होते. त्याला हत्यार काढण्या इतपत संधी मिळणार नाही याची खात्री झाल्याने मी पुढे धावलो आणि त्याच्या खांद्यावरील सॅक खेचली. सॅक खेचताच त्याने ती घट्ट पकडलेली असल्याने त्याचा हात माझ्या पुढे आला व काही समजण्यापूर्वीच मी माझी स्वत:ची कोरियन बनावटीची हातकडी त्याच्या मनगटावर सरकवली. हातावर हातकडी पडताच त्याने झटापट करण्यास सुरूवात केली. मी त्याच्यावर नियंत्रण मिळवून त्याला शिपाई व पंच बसलेल्या टेबलच्या दिशेने खेचले. पिस्तूल रोखून उभ्या असलेल्या शिपांयाना पाहून तो तरूण थोडा थबकला. ताबडतोब मी त्याचा दुसरा हातही हातकडीत अडकवला. पंचासह त्याला शिपायांच्या मदतीने बाजूच्या दुकानात नेतानांच मी अविनाश सोबतचे शिपाई त्याला गल्ली बाहेर नेत असल्याची खात्री केली.
पंचासमक्ष झडती घेतली असता त्या तरूणाकडे कमरेवर शर्टखाली एक जर्मन बनावटी सात चेंबाचे व काडतुसांनी भरलेले रिव्हाल्वर सापडले. तसेच सॅकमध्ये ६ चेंबाचे ब्रिटीश बनावटीचे भरलेले रिव्हाल्वर आणि एका पिशवीत ९७ जिवंत काडतुसे सापडली. जागेवरच केलेल्या जुजबी चौकशीत तो तरूण अनिल परबच्या गँगमधील सुभाष माकडवाला उर्फ कुंची कर्वे यांचा खास सहाय्यक व माकडवाला मेल्यानंतर टोळीचा प्रमुख झालेला तरूण असल्याचे व खुनांच्या १० प्रकरणात हवा असलेला गुन्हेगार असल्याचे आढळले. आमचे झडतीचे काम सुरू असतानांच अविनाशसोबत असलेल्या शिपायांपैकी एकाने येऊन गल्लीबाहेर ठेवलेला स्टाफ जागेवर नव्हता व आताच ठाण्याच्या दिशेकडून परत आलेला असल्याचे सांगितले.
त्या स्टाफला थोडे कडक शब्दात समजावून आम्ही सर्व ठाण्याकडे रवाना झालो. आता स्टाफच्या ताब्यात दोन आरोपी झाले होते. ठाणे स्टेशनच्या बाहेर असलेल्या हॉटेलमध्येही एक शिपाई आणि पंचासह मी आंत शिरलो व अंर्तभागाची पहाणी ओसरत्या दृष्टीक्षेपात करून माझ्या नेहमीच्या सवयीप्रमाणे हॉटेलच्या मुख्य दरवाज्याकडे तोंड करून दरवाज्याजवळच्या टेबलापाशी बसलो. असे बसल्याने हॉटेलमध्ये शिरणारी प्रत्येक व्यक्ति तसेच दरवाज्याबाहेर रेगांळणार्या व्यक्ति आपल्या नजरेखाली रहातात.
थोडयावेळाने माझा एक सहकारी अधिकारी आत शिरला व माझ्या टेबलजवळ येऊन हलक्या आवाजात अविनाशला कोठे बसवायचे म्हणून विचारू लागला. आमच्यापासून थोडया अंतरावर असलेल्या टेबलावरील एक साधारण दिसणारा तरूण माझ्या सहकार्याच्या पायाकडे रोखून पहात होता. मी त्या अधिकार्याला माझ्या मागच्या टेबलाजवळ बसवावे असे सांगताच तो अधिकारी हॉटेलबाहेर गेला. तो अधिकारी बाहेर गेल्यावर बाजुच्या तरूणाने त्याचा रुमाल मुद्दाम खाली पाडून खाली वाकून आमच्या पायाकडे लक्ष दिले. आमच्या पैकी कोणाच्याच पायात पोलीसी लाल बुट न दिसल्याने तो थोडा निश्चित झाला असावा. तो पर्यंत वेटरने त्या तरूणाजवळ जाऊन ऑर्डरची विचारणा केली असता त्याने चहाची ऑर्डर दिली.
वेटर गेल्यावर तो तरूण इकडे तिकडे पहात असतानांच माझा सहकारी अधिकारी अविनाशला हाताला धरून हॉटेलमध्ये शिरला. अविनाश व त्याचा हात धरलेला माझा सहकारी यांच्याकडे लक्ष जाताच तो तरूण उठला व लगबगीने दरवाज्याकडे वळला. आमच्या पायाचे निरीक्षण करणे आणि चहाची ऑर्डर दिल्यावर चहा येण्यापूर्वीच बाहेर पडणे यामुळे माझा त्या तरूणावरील संशय खात्रीमध्ये बदलल्याने मी दरवाज्याकडे गेलो. तो पर्यंत तो तरूण समोरच्या स्टेशनकडे धावला परंतू त्याला बराच उशीर झाला होता. हॉटेल बाहेरील शिपाई त्याला पकडण्यास तत्पर होते. त्या तरूणाला पुन्हा हॉटलमध्ये आणून त्याची पंचासमक्ष झडती घेतली असता त्याच्याजवळ रू. ५०००/- च्या नोटा मिळाल्या. त्याने त्या अविनाशला देण्यासाठी शेठजीने दिलेल्या असल्याचे कबुल केल्याने त्यालाही अटक करण्यात आली. तीन आरोपींसह ठाण्याहून परत येतांनाच माहीमला जाऊन पैसे देणार्या शेठलाही अटक करण्यात आली. अविनाशच्या ताब्यात सापडलेल्या पहिल्या हंगेरिअन बनावटीच्या पिस्तूलाच्या प्रकरणाचा तपास मी करत असल्याने व त्या तपासातच हे सर्व आरोपी शस्त्रे, दारुगोळा व रोख रक्कम मिळालेली असल्याने मी स्वत: सरकार तर्फे फिर्यादी होऊन या सर्व आरोपी विरूध्द 'टाडा' या बहुचर्चित कायद्याखाली गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल केला तरी मला या प्रकरणातील साखळीत खंड पडू देण्याची इच्छा नव्हती. त्यामुळेच मी प्रथम अटक केलेल्या शेठला सांगून दूरध्वनीवरून अनिल परबला 'डिलीव्हरी' झाली असा निरोप देण्याची व्यवस्था केली.
अविनाशला पैसे मिळाले याची त्याला खात्री झालेली असतांनाच आम्ही संजय करवी पुन्हा फोन लावला. "अण्णा, मला अविनाश भेटला त्याला पैसे मिळाले आहेत. तो बाहेरगावी जाणार आहे. त्यामुळे काही 'गेम' करायचे असतील तर सांगा म्हणजे ते 'गेम' करून आम्ही दोघेही बाहेर जातो", संजय म्हणाला. अनिल परबने त्याला दूरध्वनीवर त्याचा प्रतिस्पर्धी व सध्या बँकॉक परिसरात दडून बसलेल्या डॉन याचे सहकारी व त्यांना अर्थपुरवठा करणारे बांधकाम व्यावसायिक यांचा शोध घेऊन २ ते ४ कामे वाजवून मुंबई सोडा अशी सुचना दिली.
''अण्णा हत्यारांची व्यवस्था करा नां!", संजयने विनंती केली. "अरे, अविनाश जवळचे हत्यार पोलिसांनी जमा केले, पण त्याच्याकडे आणखी एक आणि तुझी दोन हत्यारे आहेत ना!" अनिल बोलला. "अण्णा, अविनाश खूप घाबरलेला होता. जवळ हत्यार सापडले तर कोणीच वाचवू शकणार नाही म्हणूनच त्याने त्याच्याजवळचे दुसरे हत्यार खाडीत फेकले" संजयने सांगितले.
"अरे, त्याला काही अक्कल आहे की नाही? किमती हत्यारे फेकतो कशी? ठिक आहे, मी छोटयाशी (छोटा शकील)बोलतो आणि व्यवस्था करतो", अनिल परबनी अश्वासन दिले.
पोलीस ठाण्यात परतताच मी अविनाशला "आणखी काही हत्याराची माहिती आहे का?" याबाबत विचारले. एक हत्यार लपविले आहे हे मान्य केले आणि दोन साक्षीदारांसमोर निवेदन देऊन भाईंदर येथे मावशीच्या घरी लपवून ठेवलेले अमेरीकन बनावटीचे पिस्तुल व ५ काडतुसे काढून दिली.
सुरुवातीच्या एका वाक्याच्या मोघम खबरीच्या आधारावर एवढा तपास होऊन एकूण चार विदेशी बनावटीची हत्यारे व चार आरोपी सापडल्याने वरिष्ठांनी माझी आणि माझ्या पथकाची पाठ थोपटली. यानंतर त्या तपासात पुढे टोळीच्या फाहेमा, नासिर, उमर आणि रफीक अश्या चार सदस्यांना अटक झाली परंतू दुर्देवाने आणखी हत्यारे मिळू शकली नाहीत. कारण माझ्या 'टाडा'च्या गुन्ह्याबाबत पेपरमध्ये बातमी प्रसिध्द झाल्याने दुबई मधील मंडळी सावध झाली व माझी कबूली थंड पडली.
संजयकडे सापडलेली दोन्ही हत्यारे त्याच्या दहाही प्रकरणाशी शास्त्रीय पुराव्यांच्या अधारे जोडली गेली होती. अविनाशकडील पहिले हत्यार घाटकोपर (पूर्व) येथील गुन्ह्याशी जोडले गेले व भाईंदर येथून जप्त केलेले हत्यार एका हिंदूत्ववादी राजकीय पक्षाच्या आमदाराच्या खुनाशी जोडले गेले. त्यामुळे त्या प्रत्येक पोलीस ठाण्यांनी माझ्या आरोपींना न्यायालयामार्फत ताब्यात घेऊन त्यांच्याविरुध्द दोषारोप पत्रे दाखल केली.
माझ्या टाडा प्रकरणाचे दोषारोप पत्र दाखल करण्यात आले. दरम्यानच्या काळात 'टाडा' कायद्याच्या गैरवापराबाबत बरीच ओरड झाल्याने प्रत्येक राज्य सरकारांनी उच्चस्तरीय समिती नेमल्या होत्या. अनेक प्रकरणांबाबत विचार करण्यासाठी सदर समितीने ठरविलेल्या निकषाप्रमाणे ज्या आरोपीकडे हत्यारे मिळालेली आहेत त्यांच्या विरूध्दची प्रकरणे कायम झाली. हत्यारे नसलेली आरोपी सुटल्याने माझ्या प्रकरणांनाही ठाण्यातून पकडलेला दिलीप, त्याच्याशेठ, नासिर, उमर, रफीक आणि फाहिम बाहेर पडले.
जेलमधून सुटल्यावर महिन्याभरात माहिम येथे गणपतीच्या दिवसात मांडवाजवळच एका कार्यकर्त्याचा चौघांनी खून केला. त्या प्रकरणात अटक व जामिन झाल्यावर त्यांच्यापैकी एकजण पळाला व तो आता कुप्रसिध्द गुन्हेगार झालेला आहे.
अविनाश व संजय यांच्यापैकी अविनाश वाट भरकटल्याने या सर्व गुन्हेगारीत अडकलेला असल्याची खात्री असल्याने मी त्याचे मन वळविण्याचा प्रयत्न केला होता. शिक्षा भोगून बाहेर पडल्यावर त्याने माझ्याशी संपर्क साधला व तो सर्व गुन्हेगारी सोडणार असल्याने मी थोडी मदत केल्यावर तो अतिशय सामान्य जीवन जगतो आहे.
पूर्वी बांधकाम व्यावसायिकांकडून खंडणी उकळणारा अविनाश आता एका बांधकामावर वॉचमन म्हणून नोकरी करतो आहे. त्याचे लग्न झालेले असून त्याला दोन मुले आहेत. गरीबीमध्ये पण समाधानाचे जीवन जगतो आहे.
बरीच वर्षे जेलमध्ये राहील्यानंतर संजय बाहेर पडला व नाहीसा झाला. त्यानंतर माहिती काढण्याचा प्रयत्त्न केला असता आता तो पश्चिम महाराष्ट्रात एका शहरात रिक्षा चालवतो आहे असे समजले.
- सुहास गोखले
* सदर लेखातील नावे काल्पनिक आहेत.
|
कृपया लेखांबाबत वाचकांनी प्रतिक्रिया feedback@marathiworld.com वर ईमेलने कळविल्यास यानंतरही काही संस्मरणीय प्रकरणांची माहिती देता येईल.
सदर हकीगत कथनकर्ता, लेखक नसून सामाजिक जाणीवा जागृत ठेवण्याचा प्रयत्न करणारा पोलीस अधिकारी आहे हे विचांरात घ्यावे ही विनंती. |
आपल्या प्रतिक्रिया मराठीवर्ल्डला जरूर कळवा.
|