बटाटेवडा
| कविता मुख्य पान |
''मराठमोळी कुठे अस्मिता?'' पुसले मजला कधी कुणी
''बटाटेवडा'' उत्तर माझे ओठी येईल त्याच क्षणी
रंग कसा तो सुवर्णकांती खरपुस ठिपके मधे मधे
नसूण चटणीसंगे येतो, नकळत शिरतो मुखामधे
तिखट मराठी तलवारीपरि तिखट तयाचा प्राण असे
मिळमिळित कधि झाला तो तर, ''पुचाट'' गणला जात असे
मराठी भाषेची रसवंती वडयांवरि जरी ना दिसते
वास तळणीचा खमंग येता जिव्हेवर ती रसरसते
संतांच्या वचनाला स्मरूनी भेदभाव तो करीत नसे
तारांकित हो हॉटेल किंवा हातगाडीवर शोभतसे
मर्हाठीचा रांगडेपणा हो कृतीत त्याच्या भिंनलेला
नवशिक्याने केला तरीही, कधी पाहिला फसलेला?
संगीत, नाटक वेड मराठी रक्तातच जे मुरलेले
वेड तेच, दिसतात वडे हे रंगमंदिरी तळलेले
'उद्योजकता'', कानमंत्र आजच्या युगाचा ठरलेला
वडा-पाव विकणार्या शाखा शाखांनी तो अनुसरला
मुलुखगिरी शिवबाची, अमुच्या परंपरेची शान असे
दूरदेशीच्या मंडळातही 'वडे-पताका' फडकतसे
''माय मराठी, तशी संस्कृती टिकेल ना?'' कधि पुसू नका
जोवर आहे बटाटेवडा, चिंता कसली करू नका.
कल्याणी
