पाऊस ध्वनीफित

Pausपावसाच्या आगमना बरोबरच बाजारात अनेक ध्वनीफिती पाऊस ह्या संकल्पनेवर दाखल होतात. ह्या भाऊगर्दीत सागरिका अकॉस्ट्रॉनिक्स ह्या कंपनीची ‘पाऊस’ ही ध्वनीफित आपले वेगळेपण जपणारी व निश्चितच ऐकण्याजोगी. पाऊस हा थेट हृदयाशी नाते सांगणारा, जणू तुम्हा आम्हा सर्वांचा सोबती. आपल्या वेगवेगळया मूडस्चा पाऊस हा साक्षीदार असतो. पाऊस ध्वनीफिती मधली आठ गाणी सुध्दा वेगवेगळया मूडस्ची. प्रत्येक गाण्याची रचना आणि संगीताचा बाज नुसताच भिन्न भिन्न नाही तर लक्षात यावा इतका परस्परांपासून वेगळा आहे.

पारंपारिक तसेच आधुनिक साज देऊन गाणी श्रवणीय झाली आहेत. अवधूत गुप्ते ह्याच्या आवाजातलं ‘पावसा ये रे पावसा’ हे गीत तरुणांना नक्कीच भावणारं. वैशाली सामंत तसेच अवधूत गुप्ते ह्या दोघांच ‘सोनेरी उन्हात हिरव्या रानात’ हे पारंपारिक बाज असणार द्वंद्वगीत निश्चितच ठेका धरायला लावणारं. साजणाला साद घालणारे ‘अंगणी माझ्या मनाच्या’ हे शब्द वैशालीने खटयाळ शैलीत श्रवणीय केले आहेत. ह्या गीतांबरोबरच ‘असा पाऊस मनमानी’, ‘पावसाची सरसर’, ‘रिमझिम श्रावण’, ‘उनाड पाऊस’, ‘जा घनांनो जा’ ही पारंपारिक तसेच अधुनिक सुरावटींची गाणी लक्षात राहण्याजोगी झाली आहेत.

गीतकार चंद्रशेखर सानेकर यांची शब्दरचना वैशाली आणि अवधूतने प्रत्येक गीतांचा मूडस् सांभाळत आपल्यापर्यंत पोहचवली आहे. मराठी संगीत क्षेत्रातलं एक गुणी कलावंत म्हणून जिच्याकडे पाहिलं जातं त्या वैशाली सामंतने ‘अंगणी माझ्या, पावसाची सरसर आणि सोनेरी ऊन्हात’ ह्या गीतांद्वारे तिच्यामधील वैविध्य सिध्द केले आहे.

Paus अवधूत गुप्ते ह्या उभरत्या कलाकाराने ‘पावसा येरे पावसा’ तसेच ‘पाऊस मनमानी’ ह्या भिन्न प्रकृतीच्या गाण्यांना सहजतेनं आणि आत्मविश्वासाने पेलले आहे. संगीत दिग्दर्शक म्हणूनही त्याने ही जबाबदारी समर्थपणे सांभाळली आहे. लय, शब्द, ताल-सूर आणि गायकी अशा सर्वांगांनी परिपूर्ण अशी ही ध्वनिफित आपल्या संग्रही निश्चितच असायला हवी. भविष्यातही ‘सागरिका’ लय, शब्द, ताल-सूर आणि गायकी ह्या सर्वांगांनी परिपूर्ण आणि श्रवणीय ध्वनिफिती मराठी रसिकांसाठी बाजारात आणतील ही अपेक्षा.

पाऊस
गायक – वैशाली सामंत व अवधूत गुप्ते
संगीत – अवधूत गुप्ते
गीतकार – चंद्रशेखर सानेकर
संगीत संयोजक – निलेश मोहरिर व अवधूत गुप्ते
रिदम– अतुर जोशी
बासरी – अश्विन
पहिली बाजू दुसरी बाजू

१. पावसा ये रे पावसा

दे जिवाला दे भरवसा
देते कधीही तुला हाक माझी तृषा
बघ जिवाची किती होतसे कहिली
ही घनांची कवाडे अता कर खुली

धीर नाही रं फारसा
चालता आटुनी जीवनाचा झरा
एक आशा तुझी अन् तुझा आसरा
धावुनी वेगे ये कसा

अंबराचा तुझा देश सोडून ये
आसवे सांगती तूच दाटून ये
दे तुझा दे दिलासा

१. रिमझिम श्रावण, रिमझिम श्रावण

रिमझिम श्रावण, रिमझिम श्रावण
चहूकडे हिरवे संम्मोहन
कुबेर पाऊस पेरून जाई
मातीच्या पोटी हिरवे धन

मोहरलेली हिरवी कांती
सडा जसा स्फटिकांचा पडला
तरूवेलींच्या देहावरती
हिरवा हिरवा साज झळकला

आनंदाच्या या सोहळयाला
इंद्रधनूचे रंगीत तोरण -१

पाऊस हा सोनार कसबी
करतो अप्रूप कौशल्याने
तेच जरी होते दागिने
परी घडविले सर्व नव्याने

धरती अपुले रूप न्याहाळे
करून आभाळाचे दर्पण

२. अंगणी माझ्या मनाच्या

अंगणी माझ्या मनाच्या मोर नाचू लागले
दाटुनी आभाळ आले मेघ बरसू लागले

अशा चिंब ओल्या क्षणी
पुकारे तुझी साजणी
चांदीची ही थेंबफुले या
माळुनी येती सरी
आणि मातीच्या गंधाने
भरती सरसर घागरी
धुंद नाचती उन्मनी

गार वारा मन भरारा
शिरशिरी देही उठे
हा असा पाऊस आणि
मी तुला शोधू कुठे
खोड ही तुझी रे जुनी

२. सोनेरी उन्हाती उन्हात, हिरव्या रानात

सोनेरी उन्हाती उन्हात,
हिरव्या रानात
कोसळे असा हा पाऊस खुशाल

हवेत हलतो,
झुलतो डुलतो
सरीसरींचा हा रुपेरी महाल
पिसाट पाऊस, सुसाट पाऊस
डोंगर दरीत त्याचा दरारा
कडकपारी भिजून थिजून
झेलून वादळी त्याचा फवारा

इथून तिथून
कळेना कोठुन

वेगाने येई तो करीत चाल

विराट पाऊस अफाट पाऊस
निवांत नदीला करी बेभान
भोवरा करून वाऱ्याला पळवी
उरात भरून त्याच्या उधाण

उदार होवून
ज्याला जे हवे ते
त्याला ते पाऊस करी बहाल

३. असा पाऊस मनमानी

असा पाऊस मनमानी
त्याची बेफिकीरी करते
सरीसरींना तुफानी

झाडाझाडांना झिंजाडे
तिढया वार्‍याची मुसंडी
त्याच्या मुसंडीने झाल्या
गार पाखरांच्या झुंडी
वळचणीच्या थार्‍याला ठाव घेतला पंखानी

रंग आभाळाचा करडा
जरी रस बरसे चांदीचा
काय आवेगाने होतो
रंग वेगळा मस्तीचा
किती धुरकट धुरकट केले
आसमंताला धारांनी

३. उनाड पाऊस, अशांत पाऊस

उनाड पाऊस, अशांत पाऊस
अधीर भिरभिरणारा पाऊस
निरोप घेऊन आभाळाचा
भटके हा बंजारा पाऊस

हाक तृषेची येता कानी
मातीची ऐकुन विराणी
मेघांच्या कुंभातुन बरसे

अमृतमय जलधारा पाऊस
प्राण नवे झाडांना देई
गीत नवे पक्षांना देई
बैरागी रानातुन फिरवी
शांत शीतल वारा पाऊस

पहाड, राने, नदी, सरोवर,
उराउरी भेटुन सार्‍यांना
एकेकाली लावुन जाई
सृजनाचा भंडारा पाऊस

४. पावसाची सरसर

पावसाची सरसर
कोसळते अनावर
तळहाती धरधर
चाल तिची तुरूतुरू
जीव तिचा हुरूहुरू
रास तिची झाली सुरू
ध्यान तिचे समेवर -१

धीर तिला नाही साधा
जणू बावरी गं राधा
ऐकुनिया वेणूनादा
शोधते गं गिरीधर -२

कुणाच्या गं विरहाने
बरसते आवेगाने
उतू जाई थेंबावर
गाणे तिचे नवथर -३

४. जा घनांनो जा

तृप्तीचा फुलवीत पिसारा
सळसळता ताजा
जा घनांनो जा

तहानलेल्या तप्त जिवाला
अमृतमय आधार मिळाला
अशीच तुमची शीतल छाया
या मातीला द्या

नवल फुलले नवसृजनाचे
हिरवे कौतुक अता नव्याचे
रंग असे हे शुभशकुनाचे
पुन्हा पुन्हा उधळा