MarathiWorld - Home
About Us About Marathi World Suggest a site Feedback Contact Site Map

भ्रमंती - प्रवास मार्गदर्शक


आपला प्रवास सुखाचा होवो !

मागच्या पिढयांच्या तुलनेत गेल्या काही वर्षात पर्यटनाकडे बघायचा दृष्टिकोन व्यापक होत चालला आहे. बदलत्या काळानुसार संपूर्ण मे महिना 'मामाच्या गावाला' जाणे केंव्हाच मागे पडले आहे. त्याऐवजी नवनवीन ठिकाणी जाऊन तेथील पर्यटन स्थळांचा आणि संस्कृतीचा आनंद घेणे अधिक रुढ होत चालले आहे. तसेच पर्यटन हे आपल्या देशापुरते मर्यादित राहिले नसून परदेशी जाण्याकडेही मध्यमवर्गीयांचा ओढा आहे. पर्यटन किंवा प्रवास ह्याचा इंग्रजी शब्द 'Travel'. मूळ फ्रेंच शब्द travailler ("travail") ह्या शब्दापासून इंग्रजीत travailen ("to toil") हा शब्द तयार झाला आणि नंतर 'travel' म्हणून स्थिरावला. प्रवास करणे ह्याचा सोपा अर्थ म्हणजे आपल्या आनंदाकरिता प्रवास करणे, नातेवाईक व आप्तेष्टांच्या भेटी, व्यवसायानिमित्त किंवा दैनंदीन कार्यालय किंवा शिक्षणाकरिता रोजचा प्रवास करणे. ट्रॅव्हल पासूनच पुढे ट्रान्सपोर्ट, टुरिझम, ट्रॅव्हल एजन्सी, ट्रॅव्हल एडव्हाजरी ह्या संकल्पना आणि शब्द आले. ट्रान्सपोर्ट हा मूळ लॅटीन शब्दापासून तयार झाला म्हण्जेच trans ("across") and portare ("to carry"). माणसांचे किंवा वस्तू, goods चे एका ठिकाणाहून दुसरया ठिकाणी स्थलांतर म्हणजेच ट्रान्सपोर्ट.आता तर टुरिझम हा पूर्णवेळाचा व्यवसाय असून प्रत्येक देशाची आर्थिक गणितेही त्याच्यावर अवलंबून आहेत. वर्ल्ड टुरिझम ऑर्गनाझेशन (World Tourism Organization) नुसार २००६ साली ८४ कोटी आंतरराष्ट्रीय प्रवासी वेगवेगळ्या देशात पर्यटनाकरिता गेले होते. त्यात युरोप मधले देश सर्वात अग्रेसर आहेत. अमेरिकेनंतर फ्रान्स, इटली, लंडन हे देश पर्यटनामध्ये टॉप टेन मध्ये आहेत. वर्ल्ड टुरिझम ऑर्गनायझेशननी लोकप्रिय पर्यटन स्थळेही नमूद केली आहेत. त्यात न्यूयॉर्कचे टाईम्स स्क्वेअर, डिस्नेलॅंड, नायगारा धबधबा ही ठिकाणे अग्रेसर आहेत तर आपल्या 'ताजमहालचा' नंबर पन्नासावा (?) आहे. ह्या विषयी अधिक माहितीसाठी -
http://en.wikipedia.org/wiki/Tourism, http://en.wikipedia.org/wiki/Transport

दळणवळणाचे लांबच्या प्रवासाचे मार्ग आहेत रस्ते, रेल्वे, समुद्र आणि विमानप्रवास. भारतीय रेल्वेजची साईट http://www.indianrail.gov.in/ ही अत्यंत उपयुक्त आहे. ऑनलाईन आरक्षण, रेल्वेचे वेळापत्रक, तिकीटांचे दर, प्रवासादरम्यान लागणारी महत्त्वाची स्टेशन्स ही सगळी माहिती आपल्याला साईटवर मिळू शकते. Indian Railway Catering and Tourism Corporation Ltd ह्यांनी http://www.irctc.co.in/ आणि http://www.railtourismindia.com/ ह्या साईट पर्यटकांना लाभ व्हावा म्हणून कार्यरत आहेत. ह्या साईटवर आपल्याला 'टुरिस्ट ट्रेन्स' बद्दल माहिती मिळते. जसे की 'भारत दर्शन' च्या अंतर्गत वेगवेगळ्या गावांनुसार रेल्वे आहेत. ठराविक दिवसात प्रवाशांना रेल्वेतून वेगवेगळी गावं पाहायला मिळतात. त्यांच्या 'पॅकेज टूर्स' किंवा 'हॉलिडे टूर्स' ही उपलब्ध आहेत. त्यामध्ये रेल्वे प्रवासाबरोबरच विविध गावाला राहण्याची सोय, तेथील गावांमधील प्रवासाची सोयही उपलब्ध आहे. भारतीय तसेच परदेशी प्रवाशांसाठी वेगवेगळया सहलीच्या योजना उपलब्ध आहेत. ह्या साईट्सवर प्रवाशांना पडणा-या विविध प्रश्नांची उत्तरेही दिलेली आहेत. ह्या सगळ्या ट्रेन्सचे आरक्षण क्रेडीट कार्ड द्वारा करता येते.

आजकाल विमानप्रवासही मध्यमवर्गीयांच्या आवाक्यात आलेला आहे. www.airindia.com आणि www.indianairlines.in ह्या साईट्सवर विमानांचे वेळापत्रक, तिकीटांचे दर इत्यादीची माहिती मिळून आतंराष्ट्रीय किंवा राष्ट्रीय प्रवासाचे ऑनलाईन आरक्षण करता येते. त्याबरोबर एखाद्या विमानाचे 'स्टेटस' जाणून घ्यायचे असल्यास त्याचीही माहिती आपल्याला साईटवर उपलब्ध आहे. ह्या कंपन्यांची स्वतःची 'पॅकेज टूर्स' किंवा 'हॉलिडे टूर्स' ही उपलब्ध आहेत त्याचा लाभ पर्यटक घेऊ शकतात. विमानाचे ऑनलाईन आरक्षण आपल्याला क्रेडीट कार्ड द्वारा करता येते. आता ब-याच खाजगी कंपन्याही विमानसेवेत आहेत www.jetairways.com, www.airdeccan.net, www.flykingfisher.com ही काही वानगीदाखल उदाहरणे.

आपला भारत उत्तरे पासून दक्षिणेपर्यंत आणि पूर्वे पासून पश्चिमेपर्यंत विविधतेने आणि सौंदर्याने नटलेला आहे. त्यामुळे पर्यटनाला नक्की कुठे जायचे हा प्रश्न प्रत्येक कुटूंबाला पडतोच. त्यासाठी आपली आवड, आर्थिक बजेट, कुटूंबियांचा शारिरीक आवाका, स्थळांची भौगोलिक परिस्थितीनुसार ठिकाण ठरविता येते. लांबच्या किंवा अगदी जवळच्या ठिकाणी जरी जायचे असल्यास तेथील लोकप्रिय पर्यटन स्थळे तसेच वेगळीपण फारशी लोकप्रिय नसलेल्या स्थळेही माहिती करुन घ्यायला हवी. आपण जाणार आहोत त्या भागाची भौगोलिक व ऐतिहासिक महत्त्वाची ठिकाणे, तेथील संस्कृतीची, वैशिष्टयपूर्ण खाद्यांची, खरेदीच्या ठिकाणांची माहिती आधीच करुन घेतल्यास आपल्या वेळेचा आणि प्रवासखर्चाचा पुरेपूर मोबदला घेता येतो. ज्या राज्यात आपल्याला जायचे आहे त्या राज्याच्या अधिकृत साईटस नेटवर गुगलच्या सहाय्याने आपल्याला सहज सापडतात.

http://en.wikipedia.org/wiki/India ह्या साईटवरुन आपल्या भारताचा एकूण आढावा तर घेता येतोच परंतु त्याच बरोबर भारताच्या प्रत्येक राज्यासाठी वेगळी लिंक असून त्या राज्यांची संपूर्ण माहिती आपल्याला वाचायला मिळते. नेटमुळे आपल्याला हॉटेल, रिसोर्टचे ऑनलाईन बुकींगही करता येते. www.yatra.com, www.makemytrip.co.in सारखी साईटतर आपल्या मदतीला तत्पर असते. हा साईटचा प्रत्यक्ष लाभ घेण्यासाठी साईटचे सभासद असणे जरुरी आहे. पर्यटनाच्या ठिकाणी रहायची सोय हवी असल्यास
प्रत्येकाच्या बजेटनुसार हॉटेल शोधता येते. आपले बजेट, राहण्याचा कालावधी, माणसे आणि खोल्यांनुसार सर्च केल्यास त्या शहरात असलेली हॉटेल्स आपल्याला दिसतात. तेथे हॉटेलच्या खोल्या, इतर सोयी वगैरेंची छायाचित्रे आपल्याला पाहता येतात. पसंत पडल्यास ऑनलाईन बुकींग करता येते. हे बुकींग क्रेडीकार्ड द्वारा करता येते. ह्याच साईटवरुन वेगवेगळ्या प्रतिष्ठीत एअरलाईन कंपन्याचे विमानाचे बुकींगही करता येते. येथे 'Travel Guides' ह्या लिंकवर भारतातली उत्तम ठिकाणे, तेथे कसे पोहोचायचे, तेथील राहायची सोय, खाद्यसंस्कृती, खरेदी वगैरेची संपूर्ण माहिती आपल्याला एकाच ठिकाणी उपलब्ध होते. ह्या प्रमाणे राहण्याची अधिक माहिती हवी असल्यास प्रत्येक राज्याच्या टुरिझमच्या साईटस आहेत. तसेच अधिक सर्च केल्यास ट्रॅव्हल कंपन्याच्या साईटसवर किंवा हॉटेल्सच्या स्वतःच्या साईटस असल्यास आपल्याला अधिक माहिती मिळू शकते.

रोजच्या दिनक्रमात बदल आणि आनंदाकरिता केलेल्या पर्यटनबरोबरच हल्ली काही विशिष्ट उद्देशाने 'थीम' पर्यटन केले जाते. त्यात ऍग्रो टुरिझम, हेल्थ/आयुर्वेदीक टुरिझम, वाईल्डलाईफ टुरिझम, हेरिटेज टुरिझम, ट्रेकींग किंवा ऍडवेन्चर टुरिझम असे काही प्रकार सांगता येतील. ऍग्रो टुरिझम मध्ये शेतकरी आपल्या जमिनीचा किंवा शेतीचा पर्यटनाच्या दृष्टीकोनातून विकास करतात. शेती बरोबरच दुर्मिळ वृक्षांचे संवर्धन, फळा-फुलांची लागवड, मस्यशेती, पाळीव प्राणी-पक्षीपालन, पर्यटकांसाठी मनोरंजनात्मक खेळणी व उपक्रम, त्यांच्या जेवणा-राहण्याची सोय ऍग्रो टुरिझममध्ये केली जाते. पर्यटकाला निर्सगाच्या जास्तीतजास्त जवळ आणण्यासाठी ऍग्रो टुरिझम महत्त्वाचे काम करते. भारतात आणि महाराष्ट्रात हल्ली गावोगावी अशी पर्यटन स्थळे उभारली जात आहेत.

भारतात योग आणि आयुर्वेदाची परंपरा अतिप्राचीन आहे. योग आणि आयुर्वेदाचा लाभ घेण्यासाठी तसेच शिकण्यासाठीही अनेक भारतीय आणि परदेशी पर्यटक भेटी देत असतात. ही स्थळे बहुतेक वेळा शांत आणि निसर्गरम्य ठिकाणी असतात. केरळाचा आयुर्वेदीक मसाजही अत्यंत प्रसिध्द आहे. प्रकृतीनुसार प्रत्येकाला पंचकर्म, स्नेहन व स्वेदन केले जाते. बदलत्या जीवनशैलीमुळे योग, आयुर्वेदाला अत्यंत महत्त्व प्राप्त झाले असून ही सेवा देणारी केंद्रे पर्यटन स्थळे म्हणून विकसीत झाली आहेत. वाईल्डलाईफ आणि हेरिटेज टुरिझमच्या अंतर्गत वन्यप्राणी-पक्षी ह्यांच्याशी जवळीक साधण्याकरिता अभयारण्याला भेटी दिल्या जातात. परदेशी पर्यटकांना हेरिटेज टुरिझमचे अत्यंत आकर्षण असल्याचे सांगितले जाते. पुरातन किल्ले, राजवाडे, महाल, गुहा, संग्रहालयाला तसेच पौराणिक महत्त्व असलेल्या स्थळांना भेटी दिल्या जातात.

पर्यटनाचा विचार करता भारतात आणि भारताबाहेरही बघण्यासारखे खूप आहे. 'रुटीन कामातून बदल' इतका फक्त उद्देश न ठेवता अधिक सजगपणे पर्यटन केल्यास व्यक्तीमत्व समृध्द होते. इतकेच कशाला फोटोग्राफी, चित्रकला, काव्य व लेखनासारखे आपले छंद अधिक समृध्द होतात. म्हणूनच श्री समर्थांनी म्हटलेच आहे - केल्याने देशाटन ,पंडीत मैत्री अणि सभेत संचार, मनुजा चातुर्य येत असे फार.

- भाग्यश्री केंगे
shree@marathiworld.com

आपल्या प्रतिक्रिया मराठीवर्ल्डला जरूर कळवा.