MarathiWorld - Home
About Us About Marathi World Suggest a site Feedback Contact Site Map
भ्रमंती - माझे प्रवासवर्णन - वनयात्रा


आजपर्यंत आदिवासी लोकांविषयी फक्त पुस्तके आणि टिव्हीच्या माध्यमातून परिचय होता. प्रवासाला जातांना दूरवर डोंगरात दिसणारे त्यांचे 'पाडे' पाहिले की आपल्यालाही तिथपर्यंत जाता यायला हवे असे मनात कायम येत असे. मनातली ही इच्छा लवकरच पूर्ण झाली, आमचे मित्र श्री.चंद्रशेखर आणि सौ. मंजूषा डहाळे ह्यांच्या आमंत्रणाने. त्यांनी आम्हाला 'एकल विद्यालयाच्या' आदिवासी शाळांमध्ये येण्याचे आणि वनयात्रेचे आमंत्रण दिले.

आमच्यासारखेच उत्साही वीसजण रविवारी सकाळी सुमोने पेठ-सुरगाणाच्या दिशेने रवाना झालो. वाटेत नाश्ता आणि सर्व चमूचा परिचय झाल्यावर साधारण बाराच्या सुमारास आमची गाडी एका खडकाळ दरीपाशी थांबली. आता ही वाट आम्हाला उतरुन चालायची होती त्यामुळे सर्वजण तयार झाले. एकल विद्यालयाची कार्यकर्ती 'यशोदा' आमची वाटाडया होती. तिच्या मार्गदर्शनानुसार प्रत्येकजण दरी उतरत होता. दोन कि.मी खाली उतरल्यावर आम्हाला नदी लागली. ह्या नदीला लागूनच होता गुजरातचा अदिवासी भाग आणि नदीच्या पलिकडे होते 'गायधोंड' पाडयाचे आदिवासी. नदी पार करुन पलिकडे गेल्यावर अदिवासींनी केलेले स्वागत अनोखे होते. सुवासिनींनी पंचारतीने सर्वांना ओवाळले. झेंडू, तगर, कण्हेरीच्या फुलांच्या माळा लहान-मोठयांना घातल्या. हे सर्व चालू असतांना एक वयस्कर आजोबा तारपा वाद्य वाजवत होते तर काही तरुण विशिष्ट ड्फ वाजवत होते. गावाकडे जायला निघाल्यावर आदिवासी तरुण मुलींनी ओळीने खास तारपा नृत्य करायला सुरुवात केली. आजपर्यंत फक्त 'वारली' चित्रकलेत काढलेले हे नृत्य प्रत्यक्ष बघतांना अंगावर रोमांच उभे राहिले. साध्या पण लय आणि तालबध्द हालचालींमुळे प्रत्येकालाच त्यावर ठेका धरावासा वाटत होता .

मग काय, चमूतला प्रत्येकजण नृत्यात सामिल झाला. काहींनी तारपा हे वाद्य वाजवून बघितले. त्याला वाजविण्यासाठी (साधे फुंकण्यासाठी) किती शक्ती लागते हे वाजवून बघितल्यावरच कळते. वाजत, गाजत आणि नाचत पाहुण्यांची आमची वरात गायधोंड शाळेत आली. गायधोंडची शाळा म्हणजे मारुतीचे साधे पण थोडे मोठे मंदिर होते. गावच्या प्रतिष्ठीत अदिवासी आणि कार्यकर्त्यांची ओळख झाल्यावर 'मास्तरांनी' (रविवार असून सुध्दा!) शाळा भरवली. मास्तरांच्या ह्या शाळेत साधारण १५-२० मुले होती. प्रथम भाषा आणि मग गणिताचा तास घेण्यात आला. ह्यामध्ये मुलींनी अधिक उत्तरे दिली. काही मुले-मुली इतक्या चुणचुणीत होत्या की शहरातल्या असाव्यात असा संभ्रम व्हावा. नंतर मास्तरांनी "आम्ही गडया डोंगरचे राहणारं, चाकर शिवबाचे होणारं" हे बहारदार गीत सहाभिनय सादर केले. माझी लेक मृण्मयी हिनेही तिच्या ह्या नवीन मित्रांना गाणे शिकवले. राष्ट्रगीताने त्या दिवशीच्या शाळेची सांगता झाली. मुलांना खाऊ आणि रंगपेटया वाटण्यात आल्या.

एव्हाना दोन वाजत आल्यामुळे सर्वांनाच भूक लागली होती. एका घराच्या पडवीत आमची पंगत ओळीने बसली. जेवण्यासाठी 'कर्माळा' झाडाची दोन पाने देण्यात आली. दोन पाने आडवी शेजारीशेजारी ठेवल्यावर छानसे 'इको फ्रेंडली' ताट तयार झाले. अदिवासींच्या शेतात उगवलेला तांदूळ (ब्राऊन राईस), त्यावर उडदाचे वरण, कारळ्याची चटणी आणि नागलीची भाकरी असा मेन्यू होता. आमच्या शहरी लोकांसाठी म्हणून खास त्यांनी वांगी-बटाटयाचा रस्सा आणि गोड बुंदीही केली होती. त्यांचे आदरातिथ्य आणि आग्रह पाहून आमचे शहरीमन अधिकच संकोचले. क्षणभर विचार आला आपल्या घरी जर हे जेवायला आले तर आपण त्यांचे इतके प्रेमाने करु का? असो. जेवण तर लज्जदार होते. लहान मुलेही कुठलीच कुरकुर न करता आनंदाने जेवली. जेवण झाल्यावर त्यांच्या पाडयातून फेरफटका मारला. सर्व घरे आणि त्याच्या आजूबाजूचा परिसर अतिशय स्वच्छ होता. प्लॅस्टिकची घाण आणि प्रदुषणाचा अभाव ह्यामुळे आम्हा सर्वांनाच त्यांच्या जीवनशैलीचे अप्रूप वाटले. प्रेमाने निरोप दिल्यावर वाटेत 'एकल' ची कार्यकर्ती यशोदाशी गप्पा झाल्या. यशोदा आणि तिचा नवरा एकलचे पूर्णवेळ कार्यकर्ते होते. वेगवेगळ्या गावात राहून पूर्णवेळ कार्य करणा-या आणि वर्ष-सहा महिन्यातून एकदाच भेटणा-या ह्या जोडप्याचे मला कौतूक वाटले. त्यांची आठ वर्षाची मुलगी संस्थेच्याच शाळेत आणि वसतीगृहात राहून शिकत होती. गप्पा मारत परत आमच्या वाहनतळापाशी येऊन पोहोचलो.

आमचा पुढचा तळ होता 'रानविहीर' पाडयावर. तेथे पोहोचल्यावर पुन्हा आदीवासी पारंपारिक पध्दतीने स्वागत करण्यात आले. गायधोंडपेक्षा हे गाव थोडे सुधारीत वाटले. तिथल्या शाळेत पोहोचल्यावर थंडगार पाणी आणि गोडमिटट चहाने आमचे स्वागत करण्यात आले. ही शाळा ब-यापैकी मोठी आणि स्वच्छ सारवलेली होती. वर्गात २०-२५ विद्यार्थी होते. नुकताच मुंबईवर हल्ला झाल्यामुळे विद्यार्थ्यांना त्याविषयी विचारण्यात आले. आश्चर्य म्हणजे त्यांना त्या विषयी माहिती होती. मुलांनी हस्तकलेच्या सुंदर आणि वेगवेगळ्या वस्तू करुन दाखवल्या. कागदाची गावरान टोपी तर झक्कास जमली होती. सर्वात शेवटी मुलींनी पारंपारिक गाण्यावर बहारदार नृत्य केले. लहानांबरोबर मोठ्यांनीही त्यावर ताल धरला होता. संध्याकाळ सरत आल्यामुळे आम्ही सर्वजण परतीच्या वाटेला लागलो. गाडी शहराच्या दिशेने वेग घेत होती पण मन मात्र अजूनही पाडयावर गुंतून राहिले होते.

- भाग्यश्री केंगे
shree@marathiworld.com





 











 

 

 

 


 

 

 

 












 

 

 







   
 
Copyright © 2000 MarathiWorld. All Rights Reserved Worldwide.
Site designed & maintained by
CyberEdge Solutions.