सखी

संगोपन

आनंद निकेतन ‘प्रयोग’ शाळा


पटावरच्या गप्पा

Hayat Film चित्रपट खरे तर एक प्रभावी दृक्श्राव्य माध्यम. दूरदर्शनचा वाढता प्रसार, प्रभाव, वाहिन्यांची वाढत जाणारी संख्या आणि २४ x ७ घातला जाणारा मनोरंजनाचा रतीब या सर्वातून चित्रपटासारखे प्रभावी माध्यम शिक्षणासाठी वापरता येईल? अशक्य वाटते ना ही गोष्ट? पण अशक्य ते शक्य होऊ शकतं, हे आम्हाला शिकवलं आमच्या मुलांनी!

३० नोव्हेंबर या महिनाअखेरीच्या दिवशी आम्ही मुलांना चित्रपट दाखवायचं निश्चित केलं. तो चित्रपट मुलांच्या वयाशी सुसंगत असावा, उत्तम चित्रपट कसा बघावा, त्यातील नेमकं काय पाहावं याकडे या निमित्ताने मुलांचं लक्ष वेधावं, एवढाच हेतू मनात धरून ‘हयात’ या इराणी चित्रपटाची निवड केली.

हयात नावाची चौथीत शिकणारी मुलगी, तिचे आई-वडील, छोटा भाऊ व सहा महिन्यांची छोटी बहीण असं हे कुटुंब. वडील आजारी व आईचा भागीदारीत दुधाचा व्यवसाय. आर्थिक ओढाताण तर नित्याचीच! त्या दिवशी पहाटे आई हयातला अभ्यासासाठी उठवते, कारण तिची त्या दिवशी स्कॉलरशिपची परीक्षा असते. ही परीक्षा उत्तीर्ण होणं तिच्यासाठी आत्यंतिक गरजेचं, कारण त्या आधारे तिचा पुढच्या शिक्षणाचा मार्ग खुला होणार असतो, अन्यथा मुलीला शिकविण्याची ऐपत तिच्या पालकांची नसते. आई तिला उठवून वडिलांना हाक मारते तर ते बेशुद्ध झालेले आढळतात. सहा महिन्यांची तान्ही बहीण, शाळेत जाणारा भाऊ, गुरं-ढोरं, घरची सर्व जबाबदारी हयातवर सोडून तिची आई नवऱ्याला डॉक्टरांकडे घेऊन निघते. नंतर येणाऱ्या अनंत अडचणींवर मात करून हयात परीक्षेला कशी पोहोचते, या मधल्या दोन तासांचे चित्रण करणारा हा चित्रपट. वेगवान घटना नाहीत किंबहुना हा पटच तेवढा मोठा नाही. गाणी नाहीत, मारामारी नाही, खलनायक नाही, विनोद नाहीत; पण तरीही जे काही घडतं, ते खिळवून ठेवतं. शब्दांची गरजच नाही. परदेशी वातावरणाचा अडथळा नाही. असा हा दीड तासांचा चित्रपट मुलांनी शांतपणे पाहिला. निरुपायाने आपल्या सहा महिन्यांच्या बहिणीला घरातच झोपवून परीक्षेला जाऊ इच्छिणा-या हयातला पाहताना ‘अगं जा! जा! लवकर, जा ना!’ असे सहजोद्गार प्रेक्षकांमधून उत्स्फूर्तपणे निघत होते.

हा चित्रपट संपल्यानंतर यातली कोणती गोष्ट तुमच्या लक्षात राहिली, ती एका वाक्यात सांगा; असं मुलांना म्हणताच प्रतिक्रियांसाठी अनेक हात वर आले.

‘परीक्षा असूनही घरचं एकही काम किंवा जबाबदारी तिने टाळली नाही.’

‘तेथील भौगोलिक परिस्थिती व जागेचा कमाल वापर- कारण गोठा हा जमिनीखाली भुयारात होता, यावरून तेथील थंडीची कल्पना येते.’

‘छोटय़ा बाळाला घरात एकटं ठेवतानाही त्याचा हात लागू नये, म्हणून तिने छोटा कंदील वर उचलून ठेवला.’

‘त्याला कोंबडय़ा त्रास देऊ नये, म्हणून खोलीला कुलूप घातलं.’

‘विहिरीत पडलेली चावी शोधण्यासाठी चुंबक शोधून दोरीला बांधला.’

‘छोटा भाऊ शाळेत गेला तरी बहिणीसाठी ही परीक्षा महत्त्वाची आहे, हे त्याला कळलं होतं; म्हणून तोही काही बहाणा करून घरी येण्याच्या प्रयत्नात होता.’

‘हयातची तिच्या वर्गातील स्पर्धक मुलगी स्पर्धा विसरून तिला मदत करायला तयार झाली.’

‘मुलीला शिकून काय करायचंय, म्हणून तिच्या बहिणीला सांभाळायला कोणी तयार होत नाही, म्हणजे तेथे मुलींना दुय्यमपणाची वागणूक मिळते.’

‘आंघोळ करून येते, असं खोटं सांग. परीक्षेला जाते, असं सांगू नकोस’, असं मैत्रिणीने सांगूनही हयात खोटं बोलायला नकार देते.’

‘परीक्षा गेली तरी चालेल, पण छोटीला कशाही स्थितीत ठेवण्याची हयातची तयारी नसते.’

‘सर्व कामे करताना तिच्या मनात परीक्षेसाठी गणित, विज्ञान अशा विषयांची उजळणी सुरूच असते.’

अशी अनेक निरीक्षणे मुलांनी नोंदवली. भूगोल, सामाजिक परिस्थिती, नातेसंबंध, आर्थिक स्थिती अशा अनेक अंगांनी मुले चित्रपटाला भिडली. यासंबंधी घरी बोललात का? असं विचारलं असता सर्वानी एकमुखाने होकार दिला. मग पालक काय म्हणाले?

– ‘कळलं ग, बास आता.’
– ‘माझ्या बाबांनी असे खूप चित्रपट पाहिले आहेत, त्यामुळे त्यांना माहीतच होतं.’
– ‘आई लगेच म्हणाली, बघ जबाबदा-या घ्यायला पाहिजेत. मग मीच म्हटलं- बास गं आई!’
– ‘आई कामात होती, तिला वेळच नव्हता.’
– ‘तुझ्या आईने तर तुला चांगलंच समजावलं असेल?’

या प्रतिक्रियाच इतक्या बोलक्या आहेत की, त्यांच्या विश्लेषणाची गरजच नाही. ९० (खरं तर शंभर) टक्के पालकांना वेळच नाही. मुलांच्या मनाचा धांडोळा घेण्यासाठी किंवा त्यांना घाई आहे, त्यातून तात्पर्य काढण्याची. जबाबदारीची जाणीव करून देण्याची एकही संधी न सोडण्याची. या चित्रपटातून मुलांच्या मनावर काय ठसलं, हे जाणून घेण्याचा प्रयत्न जरी केला असता तरी त्यांना समजलं असतं की, हयातची जिद्द, शिक्षणाची तळमळ, जबाबदारीची जाणीव, मर्यादाशीलता, अभ्यासू वृत्ती, हुशारी हे सर्व त्यांना जाणवलंय, कारण हे वयच संवेदनशील आहे.

मग आपण एक पालक म्हणून काय करूया? – मुलांशी खूप खूप बोलू या, नव्हे जास्त त्यांचं ऐकू या.
दृक्-श्राव्य माध्यमांशी भांडण मांडण्यापेक्षा चांगलं बघण्याची चव मुलांना देऊ या.
चांगल्या कार्यक्रमांची सहअनुभूती त्यांच्याबरोबर घेऊ या. या अनुभवाबद्दल बोलू या, पण बोधकथेसारखा तात्पर्याचा आग्रह सोडू या.
शाळा, पुस्तके या पलीकडे जाऊन शिक्षणाची नवनवी माध्यमे शोधू या.

ता. क. : निमिषाने ‘हयात’नंतर तिच्या बाबांबरोबर ‘प्रलय २०१२’ पाहिला. ती बाबांना म्हणाली, ‘मराठीत नाही का हो असे चित्रपट बनत?’ आता तिच्या बाबांनी तिला ‘शेजारी’ दाखवण्याचं ठरवलंय.

– शोभना भिडे, मुख्याध्यापक – आनंदनिकेतन