कलाकार – लेख

प्रभाकर पणशीकर – एका नट्श्रेष्ठांची पंचाहत्तरी

prabhakari panshikar प्रभाकर पणशीकर उर्फ पंत यांचे नाव उच्चारताच डोळयांसमोर अनेक व्यक्तिरेखा उभ्या राहतात. लखोबा लोखंडे, औरंगजेब, प्रो. विद्यानंद अशा कितीतरी भूमिका पंतांनी आपल्या अभिनय सामर्थ्याने अजरामर करून ठेवल्या आहेत. अशा या नटश्रेष्ठाने १४ मार्च, २००६ रोजी वयाची पंचाहत्तरी पार केली. गेली जवळजवळ ५० दशके पंतांनी रंगभूमीची इमाने-इतबारे सेवा केली. घरच्यांचा विरोध पत्करूनही पंत या क्षेत्रात उतरले होते. ‘हा तोंडाला रंग फासून घरच्यांच्या तोंडाला काळं फासतो’, असा घरच्यांनी आरोप करूनही पंतांचे चित्त विचलीत झाले नाही.

सुरुवातीला मो. ग. रांगणेकर यांच्या ‘नाटयनिकेतन’ संस्थेत पंत पडेल ते काम करत राहिले. एखाद्या कलाकाराच्या गैरहजेरीत पंतांना त्या कलाकाराची भूमिका करणे भाग पडायचे. पण ह्या भूमिका अगदीच नगण्य होत्या आणि त्यामुळे त्या भूमिका करणारे प्रभाकर पणशीकर लोकांच्या लक्षात राहणे शक्यच नव्हते. तरीही पोटापाण्याकरता पंत पडेल ते काम करत राहिले. ‘राणीचा बाग’, ‘कुलवधू’ यांसारख्या नाटकांतून भूमिका केल्यावर मात्र पणशीकर नाटयनिकेतन मध्ये चांगलेच स्थिरावले.

‘तो मी नव्हेच’ हे आचार्य अत्रे लिखित नाटक जेव्हा नाटयनिकेतन संस्थेतर्फे करायचे ठरले. तेव्हा नाटकातील प्रमुख भूमिका करणारा नट हा संस्थेतला असावा म्हणजे तो आपल्या आवाक्यात राहील, अशा धोरणी भूमिकेतून पणशीकरांनीच ही भूमिका करावी असा रांगणेकरांनी हट्ट धरला. आचार्य अत्रेंना सुरुवातीला हा निर्णय मान्य नव्हता. पण रांगणेकरांच्या हट्टापुढे अत्रेंचे काही चालले नाही आणि ती भूमिका पणशीकरांना मिळाली. नंतर मात्र ‘तो मी नव्हेच’ मधला खलनायकी लखोबा लोखंडे पणशीकरांनी असा काही रंगवला की, लखोबा लोखंडे आणि पणशीकर यांचे घट्ट नातेच बनले. प्रभाकर पणशीकरांशिवाय ‘तो मी नव्हेच’ या नाटकाचा विचार करणे त्या काळीही कोणाला शक्य झाले नाही आणि आजही होत नाही. ‘तो मी नव्हेच’चा फिरता रंगमंच ही पंतांची कल्पना.

‘तो मी नव्हेच’ या नाटकाद्वारे पंतांच्या यशस्वी नाटय कारकिर्दीची सुरुवात झाली असे म्हटल्यास ते चुकीचे ठरणार नाही. मध्यंतरी एका कार्यक्रमाच्या निमित्ताने पणशीकरांची प्रकट मुलाखत ऐकण्याचा योग आला होता. तेव्हाही जाणवला तो त्यांचा नम्र, हसतमुख स्वभाव आणि हजरजबाबीपणा. भूतकाळातील कोणतीही घटना ते इतक्या तपशिलवार सांगत होते की जणू त्या घटना कालपरवाच घडल्या असाव्यात. बरोबरीच्या लोकांना सोबत घेऊन पुढे जाणारे अशी पंतांची ख्याती आहे. जवळजवळ ५० वर्षे नाटकांच्या निमित्ताने त्यांनी अख्खा महाराष्ट्र पालथा घातला आहे. याशिवाय बेळगाव, दिल्ली, इंदूर, धारवाड येथे खेडयापाडयांतूनही पंतांनी नाटकांकरता भ्रमंती केली आहे. ह्या सर्व ठिकाणांची ते तपशिलवार माहिती पुरवू शकतात. तिथे कसं जायचं, तेथील राहण्या-जेवण्याची व्यवस्था याशिवाय आयत्यावेळी स्टेजवर उभा राहण्याकरता कलाकार कुठून मिळेल ह्याचीही ते इत्थंभूत माहिती देतात. आज पंचाहत्तराव्या वर्षीही पंत इतके क्रियाशील आहेत की एखादा तरुणही लाजावा.

वसंत कानेटकरांचं ‘इथे ओशाळला मृत्यू’ हे नाटक त्यांनी संभाजीला न्याय मिळावा याकरता लिहिलं. पण प्रत्यक्षात जेव्हा ते रंगभूमीवर उभं राहिलं तेव्हा मात्र नाटकाचा पूर्ण प्रकाशझोत औरंगजेबाच्या भूमिकेतील पंतांवर स्थिरावला. संभाजीपेक्षाही त्या नाटकात औरंगजेब प्रभावी ठरू लागला. याविषयी त्यांना विचारताच ते म्हणतात की, औरंगजेबाची भूमिका करताना त्या भूमिकेचा प्रत्येक पैलू समजून घेऊन तो लोकांसमोर यावा याकरता मी प्रयत्न केला होता.

‘अश्रूंची झाली फुले’ या नाटकातील प्रो. विद्यानंद पणशीकरांनी खूपच सुंदर साकार केला होता. ज्या काळी नाटकांचे दौरे करणं आजच्याइतकी सुखाची बाब नव्हती तेव्हापासून आत्तापर्यंत पंतांनी ‘अश्रूंची झाली फुले’ या नाटकाचे तब्बल ११११ प्रयोग केले आहेत. प्रा. विद्यानंद याची मानसिक द्विधावस्था खूप चांगल्या प्रकारे सादर केली होती. तसेच ‘कटयार काळजात घुसली’च्या निमित्ताने संगीत नाटकाचं पुनरुज्जीवन हेही पंतांचं रंगभूमीला दिलेलं कॉन्ट्रीब्युशन.

आजही पंत त्यांच्या आवाजात जेव्हा ‘इथे ओशाळला मृत्यू’ मधील काही संवाद म्हणून दाखवतात तेव्हा आपोआपच रसिक त्या नाटकाच्या वातावरणात खेचले जातात.
‘तो मी नव्हेच’च्या अभूतपूर्व यशानंतर पणशीकरांनी मोहन वाघ आणि वासुदेव कोल्हटकर यांच्या साथीने ‘नाटयसंपदा’ ही नाटय संस्था स्थापन केली. ‘अश्रूंची झाली फुले’, ‘कटयार काळजात घुसली’, ‘इथे ओशाळला मृत्यू’, ‘थँक्यू मि. ग्लाड’, ‘मला काही सांगायचंय’ यांसारखी नाटकं त्यांनी नाटयसंपदा या आपल्या संस्थेद्वारे रंगभूमीवर आणली.

प्रभाकर पणशीकर यांच्या गौरवार्थ अमृतमहोत्सवी सोहळा ७ ते ९ एप्रिल, २००६ दरम्यान मुंबईतील यशवंत नाटयमंदिरात आयोजित करण्यात आला होता. त्यांच्या कारकिर्दीला आणि कर्तबगारीला सलाम करायला नाटयसृष्टीतील अनेक नामवंत मंडळी आपणहून ह्या महोत्सवात सामील झाली होती. ह्यातच त्यांचे मोठेपण आहे. ह्या कार्यक्रमा दरम्यान त्यांना महाराष्ट्र सरकारतर्फे पहिला राज्य रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार देण्यात आला.