राधाची डायरी

राधाची डायरी – पान १

मी खूप दिवस बघत होते. आई सारखी काँम्प्युटर वरच काम करते आहे. तिच्या टेबलवर खूप कागदांचा पसारा आहे. दिवसरात्र पसरून काम करत रहाते- सारखी!!
काँम्प्युटर आणला तेव्हा मला खूप मज्जा वाटली होती. खूप बटणं असलेला, टिव्ही सारखा दिसणारा, पण रिमोट कन्ट्रोल नसलेला!

आई काम करायची तेव्हा येणा-या बटणांचा टुकटुक आवाज मला सॉलिड आवडला होता!
(अजूनही आवडतो! आई शेजारी काम करत असली की छान झोप लागते!)
शिवानी (माझी बेस्ट फ्रेंन्ड) आली की आम्ही एकेक अक्षर शोधत टाईप करायचो. आईसारखं ‘काम-काम’ खेळायचो किंवा पेन्टब्रशवर चित्र काढायचो. मला ‘सेव्ह’ सुध्दा करता यायला लागलं होतं…
पण आता कॉम्प्युटर मिळतंच नाही.
आई सारखी काम करत असते. सारखीच!
आता त्या बटणांचा टुकटुक आवाजही आवडत नाही मला!
नकोच मला तो कॉम्प्युटर.
पण आज मी सॉलिड खुष होते. मला नाचावसं वाटत होतं. आईच्या कुशीत शिरावसं, तिच्याबरोबर गाडीतून फिरायला जावसं..
आमच्या शाळेच्या नाटकात मला मस्त रोल दिला होता, कारण माझं लवकर पाठ होतं ना!
मी उडया मारतच घरी आले. आईला सगळं सगळं सांगायचं होतं…
तर आई नेहेमीप्रमाणे कॉम्प्युटरवर काम करत होती. शिवाय फोनवर बोलतही होती. कितीतरी वेळ! मी वाट पहात होते..
माझ्या नाकात झिणझिण्या आल्या. मी मोठयांदा रडायला लागले. आईनी फोन ठेवला आणि पटकन मला जवळ घेतलं.
माझ्या पाठीवरून हात फिरवत होती. मी फसले होते.
जरा वेळाने आई म्हणाली ‘चिमूताई तुला गंमत सांगायची आहे..’
मी फुगलेलीच होते. म्हणाले, ‘आधी मी सांगणारे गंमत. तुला ऐकावीच लागेल.’
मग आईनी मला कुशीत बसवलं आणि मी तिला नाटकाचं सगळं सगळं सांगितलं. नाटकाचं नाव, गोष्ट, कपडे- आईही मला कायकाय विचारत होती. मस्त गप्पा मारल्या- खूप हसलो दोघी! सॉलिड मजा !
‘राधू, आता माझी गंमत हं!
मग मला अजूनच कुशीत घेत आई म्हणाली, ‘आपण दोघी इंग्लंडला चाललो आहोत’
‘वाव्! कधी?
‘पुढच्या महिन्यात’
‘आणि बाबा?’
‘तो आपल्याला तिकडे भेटायला येणार ना!’
‘किती दिवस?
‘आणि माझं नाटक?’
‘ते झाल्यावर निघता येतयं का बघू’.
मला एकदम शिवानीची आठवण झाली. माझ्या सायकलची, शाळेची-मी एकदम गप्प बसले.
‘तिथे मी अभ्यास करणारे-राधू- तू तुझ्या शाळेत जायचंस, आणि मी माझ्या!’
मला हसूच आलं-आईपण शाळेत? आम्ही दोघी सेम पिंच?
‘तुला माहितेय का, तिथे पांढराशुभ्र बर्फ पडतो आणि छान समुद्र आहे आणि मोठया बागा-‘
मी डोळे मोठे करून ऐकत होते-आई खूप काय काय सांगत होती.
‘आणि तू नव्या शाळेत गेलीस ना? की तुला भरपूर मैत्रिणी मिळतील, सोनेरी केसांच्या-बार्बी सारख्या दिसणा-या-
आईशप्पथ! बार्बी सारख्यां मैत्रिणी? ख-या बार्बी सारख्या? म्हणजे बार्बीसारख्या ख-या मैत्रिणी?
हे काहीच्या बाहीच-
मी आणि माझी आई-दोघीच जाणार होतो.
बर्फ पडणा-या, समुद्राच्या काठावरच्या हिरव्यागार बागांच्या आणि बार्बीसारख्या मुलींच्या गावाला-
मला सॉलिड काहीतरी वाटायला लागलं- एकदम सुपरमॅनसारखं शूर!!
मी आणि आई दोघीच?
सॉलिड!!

– मधुरा डहाणूकर

मधुरा डहाणूकर ह्या मराठी रंगभूमी, दूरदर्शन मालिकां मधील प्रसिध्द अभिनेत्री आहेत. साहित्य आणि कलेचा वारसा लाभलेल्या मधुरा डहाणूकर पुण्याच्या ‘चिल्ड्रन फिल्म सर्कल’ च्या संस्थापक कार्यकर्त्या आहेत.