सातच्या आत घरात (एक ज्वलंत सामाजिक विषय)

saatchyaaatgharatतमाशा फड, गावची पाटीलकी, ग्रामीण भागातील अस्सल गावरान मराठी भाषा, नऊवार लुगडयातली नायिका, ठसकेबाज लावण्या अशा प्रकारचं साचेबध्द स्वरूप एकेकाळी मराठी चित्रपटाचं होतं. पण तेव्हा व्ही. शांताराम, अरूण सरनाईक, राजा गोसावी, डॉ. घाणेकर, स्मिता पाटील अशी कितीतरी दिग्गज मंडळी अग्रेसर होती. त्यानंतर काळ बदलला. लक्ष्मीकांत बेर्डे आणि अशोक सराफ ही जोडगोळी मराठी चित्रपटात आली अन् मराठी चित्रपट पुन्हा एकदा पांचट अशा साचेबध्द भांडयात पडला. अशोक-लक्ष्मीकांतच्या एकाच पठडीतल्या त्याच त्या विनोदी चित्रपटांना मराठी रसिकवर्ग कंटाळला. यानंतर मराठी चित्रपटांची शेवटची घटका भरली, की काय असेच सर्वांना वाटत होते. पण.. काळ बदलला, लोकही बदलले, ग्रामीण भागाचे शहरी रूपांतर झाल्यामुळे मराठी चित्रपटही हा साचेबध्द ग्रामीण चक्रव्यूह फोडून बाहेर आलाय. बिनधास्त, सातच्या आत घरात असे फॉरवर्ड मराठी संस्कृतीचे दर्शन घडवणारे चित्रपट काढले जात आहे.

जुनं ते सोनं प्रमाणे आपल्या काही जुन्या रूढी अशी परंपरा आजही किती लाख मोलाच्या आहेत, तसेच समाज जरी २१ व्या शतकात संगणकाचे व पाश्चात्य संस्कृती-विचारांचे अंधानुकरण करीत वाटचाल करीत असला तरी पुरुषांची स्त्रीकडे बघण्याची दृष्टी आजही पूर्वीचीच आहे. आजच्या पोरीबाळी साडया-लुगडयांऐवजी जीन्स-टी शर्ट जरी घालत असल्या तरी त्यांचे समाजातील स्थान हे पूर्वीसारखे कायम आहे. इतकेच काय तर युगं बदलली, तरी आजही रामयणाचेच दळण दळले जात आहे. सत्ययुगात सीतेला स्वत:चे शीलत्व सिध्द करण्यासाठी अग्निपरीक्षा द्यावी लागली. ती तर महादेवी होती. मग आजची स्त्री ‘किस खेत की मूली!’ त्यामुळे आजच्या मॉड पिढीतील मुलींनी मर्यादा न पाळल्यास काय होऊ शकते याचे यथार्थ चित्रण ‘सातच्या आत घरात’ मध्ये दाखवण्यात आले आहे.

नंदिनी, अनिकेत, मधूरा, वेंकी, तेजल आणि केतकी या ग्रुपची ही कहाणी आहे. नव्या विचारांचे नवे वारे डोक्यात गेल्याने या मंडळींचे अभ्यासाऐवजी रात्री-बेरात्री बाहेर फिरणे, डिस्कोला जाणे आणि हे एन्जॉय करण्यासाठी अंधा-या रस्त्यावरील खड्डयात पडावे तसे आंधळेपणाने प्रेमात पडणे हेच उद्योग असतात. व्हॅलेंटाईन डे एन्जॉय करण्यासाठी हा ग्रुप रात्री उशिरापर्यंत बाहेर राहतो.

अनिकेत व नंदिनी ग्रुपपासून दूर जातात. त्यानंतर नंदिनीवर बलात्कार होतो. तिचे सर्वस्व गेल्यावर या गँगला आपली चूक लक्षात येते. नंतर नंदिनीचे काय होते? तो बलात्कारी पकडला जातो का? ही मुले सुधारतात का? या प्रश्नांची उत्तरे आपल्याला सातच्या आत घरात मध्ये बघायला मिळतील.

अस्मिता चित्र या बॅनरखाली स्मिता तळवलकरांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. कळत नकळत चौकट राजा, तू तिथं मी अशा वेगवेगळया विषयांवर चांगले चित्रपट स्मिता तळवलकरांनी प्रेक्षकांना दिले आहेत. ‘सातच्या आत घरात’ चे दिग्दर्शन संजय सूरकर यांनी केले आहे. संजय पवार यांचे मराठी, हिंदी आणि इंग्रजी मधील संवाद सध्याच्या काळातल्या मराठी चित्रपटात काहीसे वेगळे पण सुसह्य वाटतात. राहुल रानडेंचं संगीत, संजय जाधव यांची सिनेमॅटोग्राफी अप्रतिम. कार्तिका राणे, मानव कौल, मकरंद अनासपुरे, निशिकांत कामत, मृण्मयी लागू, अमृता पत्की, विभावरी देशपांडे, गिरीश रानडे, दीपा लिमये हे युवा कलाकार प्रमुख तर निळू फुले, सुहास जोशी, नीना कुलकर्णी, स्मिता तळवलकर, डॉ. गिरीश ओक, भारती आचरेकर, दीपा श्रीराम, उदय टिकेकर, शरद अवस्थी, राखी सावंत हे कलाकार छोटया पण महत्वाच्या भूमिकेत आहेत.

‘सातच्या आत घरात’ची फॉरवर्ड फोडणी ब-यापैकी खमंग झाली आहे. दिग्दर्शक संजय सूरकर यांनी हा ज्वलंत सामाजिक विषय योग्य पध्दतीने हाताळला आहे. एक वेगळे काही बघायचे, म्हणून ‘सातच्या आत घरात’ बघायला काही हरकत नाही.गावकरीच्या सौजन्याने.

सावरखेड… एक गाव

Savarkhed Ek Gaon अलीकडच्या इंटरनेट ई मेल, डॉट कॉम, एसएमएस मोबाईल जनरेशनचं वारं अगदी पायवाटेच्या खेडयापाडयातही पोहोचू लागलयं. खेडेगावीही एस.टी.डी बूथबरोबर मोबाईल कानी लावलेले तरुण दिसू लागलेत. ग्रामीण भागातील जुनी माती-विटा-कौलांची घरं, चिखलमातीचे रस्ते बदलले नसले तरी, ‘गाव तिथं एसटी’ ची वाहतूक व्यवस्था व्यापक असल्याने ग्रामीण भागाचा शहरी भागाशी वाढता संबंध होऊ लागलाय. ग्रामीण भागातील पाटलाच्या दरारी राजकारणाऐवजी आमदारकी, चेअरमनच्या कारस्थानाचा दबदबा वाढलाय. सत्तासंघर्षातून पेटलेलं वैर, खून, वस्ती जाळपोळीतून व्यक्त होऊ लागलंय. चेअरमन, संचालकाची, आमदाराची पोरं शहरात शिकून गावाकडे येताना शहरी भाषा घेऊन, शहरी जीन्स-टी शर्टस् घालताना दिसू लागलेत.

महाराष्ट्रातील ग्रामीण भागाचा व्यक्तिचित्रांचा हा बदलता चेहरा घेऊन आलाय ‘सावरखेड… एक गावं’ हा मराठी चित्रपट. सावरखेड… एक गावची निर्मिती इरा फिल्म्स या चित्रसंस्थेने केली आहे व निर्माते आहेत नाशिकचे प्रशांत पाटील. कथा-पटकथा-संवाद दिग्दर्शन ही चित्रपटाचा पाया समजली जाणारी महत्वाची जबाबदारी सांभाळली आहे राजीव पाटील यांनी.

राजीव पाटीलांनी कथा लिहिली आहे ग्रामीण भागात ‘सावरखेड’ या खेडेगावात घडणारी; पण तिथं प्रगतीशील शेतीमुळे शहरी फिल असतो. तुकाराम पाटील यांचा मुलगा राहूल हा थेट इस्त्राईलहून प्रगत शेतीतंत्रज्ञान घेऊन आलेला असतो. संपतराव मोरेंची मुलगी प्रिया, पुतण्या अजय, घोरपडेंची बहीण समिधा, ईश्वर, बबन असा राहूलचा /फेडंशीप ग्रुप. स्नेहा राऊत ही पत्रकार मुंबईहून आलेली असते. सारं काही ठाकठीक असतांना रात्री बेरात्री आगी लागणं, माणसं मरणं हे प्रकार चालू होतात. गावक-यांना हा भानामतीचा प्रकार वाटतो. शेवटी कोण कशासाठी हे करत होते याचा शोध लागतो. अशा कथेच्या मुख्य प्रवाहात प्रेमप्रकरण, मैत्री-वैर वगैरे उपप्रवाह जोडण्यात आले आहेत.

तरूण पिढीतील भांडण, संशय, वैर हे मात्र अगदी पूर्वीसारखं कु-हाडी पर्यंत न दाखवता तेवढयापुरतं दाखवलंय. रात्रीच्या वेळी घडणा-या घडामोडींचे टेकींग उत्तम म्हणावे असे आहे. पाठलाग-शोधाची दृश्य प्रेक्षकमनाची उत्सुकता वाढवणारी आहेत.

सदाशिव अमरापूरकर, विक्रम गोखले, अंकुश चौधरी, श्रेयस तळपदे, प्रशांत पाटील, मकरंद अनासपुरे, सोनाली खरे, शर्वरी जेमेनीस हे चांगले, देखण्या चेह-याचे गुणी कलावंत या चित्रपटात लहान मोठया भूमिकांत पाहायला मिळतात; पण घटना कमी आणि पात्र जास्त या अडचणीमुळे या सा-याच गुणी कलावंतांना योग्य तेवढा वाव मिळालेला नाही. संजय जाधवांची सिनेमास्कोप-रंगीत फोटोग्राफी दर्जेदार आहे. रात्रीचे खेडयातले आऊट डोअरचे प्रसंग वास्तव वाटतील असे कॅमे-यातून टिपणे जरा अवघडच असते. या चित्रपटात गाणी कमी आहेत. बॅकग्राऊंड म्युझीकचे जोडलेले पिसेस ग्रामीण पार्श्वभूमीवरील कथेचा मराठी सिनेमा वाटणार नाहीत इतके वेगळे आहेत.

एकूणच ग्रामीण पार्श्वभूमीवर आधारीत असा हा मराठी चित्रपट असला तरी शहरी तरूण प्रेक्षकाला पाहताना आपलासा वाटेल असा आहे. त्याचं मुख्य कारण तरुण कलावंतांचे मॉड ड्रेसेस आणि शहरी भाषा..