साहित्य संमेलन मुख्यपान

 

७४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनइंदूर- दि.१९ - अखिल भारतीय पातळीवरील ७४ व्या मराठी साहित्य संमेलन व ग्रंथ दिंडी कार्यक्रमाला आज सकाळी सुरूवात झाली. ही दिंडी शहराच्या विविध भागांत फिरुन तब्बल चार तासांचा प्रवास करून संमेलनस्थळी म्हणजेच अभय प्रशाला संकुलात येऊन पोचली.

संमेलनाचे रीतसर उद्धाटन दुपारी ४ वाजता इंदूरचे रहिवासी आणि सध्या अमेरिकास्थित सॉफ्टवेअर इंजिनीअर असलेले प्रकाश भालेराव यांच्या हस्ते होईल.मावळते अध्यक्ष डॉ.य.दि.फ़डके हे डॉ.विजया राजाध्यक्ष यांना सूत्रे प्रदान करतील.उद्धाटनाचा सोहळा दु. ४ ते ७ पर्यंत दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर थेट प्रक्षेपित केला जाईल.

आज सकाळी ग्रंथदिंडीमध्ये डॉ.य.दि.फडके, विजया राजाध्यक्ष, स्वागताध्यक्ष व केंद्रीय मंत्री सुमित्रा महाजन,कवी ना.धों.महानोर, ज्येष्ठ गायक अरूण दाते, महामंडळ अध्यक्ष वसुंधरा पेंडसे-नाईक सहभागी झाले.दिंडीत विविध शाळांचे विद्यार्थी, तरूण,तरूणी, मराठी रसिक मोठया संख्येने सहभागी झाले होते.दिंडीत पारंपारिक पोशाख घातलेले तरूण, तरूणी, शिंदे-होळकर घराण्यांचे वैभव उभे करीत घोडया वरून कूच करीत होते.भजनी मंडळीच्या टाळ-चिपळयांच्या आणि ढोल-नगाऱ्यांच्या आवाजाने इंदूर शहरातील रामबाग, नारायण बाग हे भाग जागे झाले.

ही दिंडी संमेलनस्थळी आली. त्यानंतर ग्रंथ प्रदर्शनाचे उद्धाटन डॉ.य.दि.फडके यांनी केले.यावेळी बोलताना ते म्हणाले,'महाराष्ट्रात आणि बृहन्महाराष्ट्रातही सांस्कृतिक व्यवहार वाढले पाहिजेत'. दिंडीची गर्दी आणि ग्रंथप्रदर्शन पाहण्यासाठी आलेल्यांची गर्दी झाली, रेटारेटी आणि झोंबाझोंबी चालू असतानाच फडके यांनी फीत कापून ग्रंथ प्रदर्शनाचे उद्धाटन केले.यावेळी रा.रं.बोराडे, गंगाधर गाडगीळ,विजया राजाध्यक्ष आवर्जून उपस्थित होत्या.

बाहेरगावाहून ६०० पेक्षाही अधिक प्रतिनीधी आले आहेत. इंदूरकरही मोठया संख्येने संमेलनस्थळी जमू लागले आहेत. आणि सर्वजण संमेलनाच्या रितसर उद्धाटनाच्या प्रतिक्षेत आहेत.


७४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन - काही क्षणचित्रे


 
Share
 
Joomla SEO powered by JoomSEF

 
सेवासुविधा