साहित्य सम्मेलन मुख्यपान

 

७७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, औरंगाबादग्रंथदिंडीच्या जल्लोषाने ७७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची दिमाखदार सुरवात. -दि. १० जानेवरी २००४.

महाराष्ट्रातील अठरापगड जाती-जमातींचे वैशिष्टये, विचारधारणा, संवेदना व भावनांच्या दिंडीचे आहोळ 'संत एकनाथ नागरी' मध्ये एकवटल्यावर औरंगाबाद नगरीत उत्साह, चैतन्य, आणि आनंद यांचे वातावरण पसरले.

महात्मा फुले चौक, औरंगपुरा, पैठण दरवाजा, शिवाजी महाराज पुतळा, क्रांती चौक, वेदांत चौक असा या ग्रंथदिंडीचा मार्ग होता. देवगिरी महाविद्यालय परिसरातील संत एकनाथ नगरीपाशी दिंडीचे विसर्जन झाले.

सजविलेल्या बैलजोडया, तुताऱ्या, सनई, चौघडे यांनी काही और असे रंग 'औरंगाबाद' मध्ये खुलले. औरंगाबादमधील बहुतांशी शाळांनी ग्रंथदिंडीमध्ये उत्साहाने भाग घेतला. एकंदर पाच हजार विद्यार्थी ग्रंथदिंडीमध्ये सामील झाले. मावळते संमेलनाध्यक्ष प्रा. सुभाष भेंडे यांनी ग्रंथदिंडीचे विसर्जन करताना आयोजकांचे मनापासून कौतुक केले. ग्रंथ खरेदी-विक्रीचे महत्त्व स्पष्ट करताना कराड येथे गेल्या वर्षी जवळपास एक ते दीड कोटी रकमेच्या ग्रंथांची खरेदी झाल्याचे सांगितले.

७७ व्या अखिलभारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा. रा. ग. जाधव यांनी 'सुजाण नागरीकांनी पुस्तके घेतली पाहिजेत. ग्रंथविक्रीस प्रतिसाद दिला पाहिजे, तसेच पुस्तकेसुध्दा वाचली पाहिजेत' असे सांगितले.

सनई, चौघडे, नाशिक ढोल, ताशे यांचा मंजूळ व मिश्र नाद वातावणामध्ये भरून राहिला होता. निरनिराळया आकारांच्या झांजा, काही केशरी झुबके लावलेल्या मोठया झांजा, लेझिम यांचा नाद मराठीतील विविध वाङ्मय-प्रवाहांची आठवण करून देत होता. विद्यार्थ्यांचा उत्साह व सहभाग लक्षणीय होता. संत ज्ञानेश्वर, संत निवृत्तीनाथ, सोपनदेव व मुक्ताई यांची स्मरण-दृश्ये विद्यार्थांनी रंगविली. कित्येक शाळांनी बाल शिवाजी, घोडयावर दौडणारा छत्रपती शिवराय रंगविले होते. भारतमाता, एकात्मता, वारकरी संप्रदाय, महानुभाव संप्रदाय यांची ठळक नोंद बऱ्याच शाळांनी घेतली.

१९५७ नंतर पुन्हा २००४ सालामध्ये हे साहित्य संमेलन औरंगाबाद येथे भरत असल्याचा आनंद शिवसेनेचे खासदार चंद्राकांत खैरे यांनी व्यक्त केला. मराठीची अस्मिता अधोरेखित करणारा हा चिरस्मरणीय क्षण आहे, असे ते म्हणाले. प्रा. रा. ग. जाधव यांचे विशेष आभार खैरे यांनी मानले. या जागी रामदासस्वामींचे वास्तव्य होते. ज्ञानेश्वरांचा जन्म ह्याच परिसरातला आहे. संत एकनाथ महाराजही इथले आहेत. शिव-इतिहासाचे अखेर, संभाजी महाराजांचे चार महिने झालेले हाल देखील याच गावाने पाहिले आहेत. हे नगर 'संभाजीनगर' म्हटले जावे, याचा खासदार चंद्रकांत खैरे यांनी पुनरूच्चार केला. आदर्श प्रायमरी स्कूलने निसर्गकन्या बहिणाबाई चौधरी यांचा स्मरण देखावा रंगविला. हिरवी नऊवार, कपाळावर आडवी कुंकुम चिरी, जाते दळताना 'माझी माय सरसोती माले शिकवते बोली' असे गाणारी बहिणाबाई 'पाहायला' मिळाली. कवयित्री शांता शेळके, विनोदी लेखक पु. ल. देशपांडे, कवी बा. भ. बोरकर, कवी यशवंत, ग. दि. माडगूळकर, ग. ल. ठोकळ, संत तुकडोजी महाराज, भा. रा. तांबे. श्री. म. माटे, साने गुरूजी, वसंत कानेटकर, न. चिं. केळकर, वि. स. खांडेकर, ना. सी. फडके, दुर्गा भागवत, हरि नारायण आपटे इ. पुण्यश्र्लोक साहित्यिकांची उठावदार रेखाचित्रे निरनिराळया शाळांच्या पथकांनी हिरीरीने मिरवला.

मुकूल मंदिर या शाळेच्या चालत्या-फिरत्या बँड व लेझिम पथकाबरोबर १२ बलुतेदारांचा पेहेराव केलेले विद्यार्थी होते. 'मी शिंपी आहे, माझी माहिती तुम्हाला 'धग' कादंबरीत मिळेल.' असे प्रत्येक विध्दार्थी साळी, कोष्टी, लोहार, सुतार यांच्याबद्दल सांगत होता. ठिगळांची कफनी व खराटयासहित सजीव झालेले संत गाडगे महाराज (अमर हायस्कूल), श्री सरस्वती भुवन शाळेचे वाघ्या-मुरळी पथक, मराठा हायस्कूलबरोबर विजय गायके होते. शरदेचा भुत्या असतो त्याप्रमाणे जांभळा पितांबर, डोक्यावर जल-कुंभ, उजव्या हाती बुध्द, डाव्या हातात डॉ. आंबेडकरांची प्रतिकृती घेऊन विविध नृत्याच्या पोझ त्यांनी घेतल्या. विद्यार्थींनी एकनाथांचे भारूड सादर करून या शारदेच्या भुत्याला साथ केली. संत जनाबाईच्या जीवनांतील ठळक प्रसंग, कोलंबिया अवकाश यानाची प्रतिकृती, शालेय विद्यार्थ्यांनी कल्पना चावला, किरण बेदी यांची केलेली वेशभूषा, उर्दू हायस्कूलचा देखील उत्साहाने सहभाग, भांगडा ते गुजराथी नृत्य... औरंगाबादमधील व पर्यायाने मराठी संस्कृतीच्या प्रवाहामध्ये मिसळलेल्या बहुरंगी धारणा व प्रवाहांचे मनोवेधक दर्शन ग्रंथदिंडीमध्ये झाले. मा. खा. श्री. शरद पवार हे प्रस्तुत संमेलनाचे उद्धाटक आहेत. संकटे, दैन्य 'बाद' व साहित्याचे 'रंग' घेऊन 'औरंगाबाद' सज्ज झाले आहे.

Share
 
Joomla SEO powered by JoomSEF

 
सेवासुविधा