साहित्य सम्मेलन मुख्यपान

 

९ वे कोकण मराठी साहित्य सम्मेलन, ठाणे


अध्यक्षांचे भाषण

९ वे कोकण मराठी साहित्य सम्मेलन, ठाणे
अध्यक्षीय भाषण - पद्मश्री श्री. माधवराव गडकरी
सम्मेलनाचे उद्धाटक, माजी न्यायमूर्ती, राजाभाऊ गवांदे
स्वागताध्यक्ष, सतीश प्रधान
संस्था स्थापन करणारे, ती उभी करणारे, तिचे अध्यक्ष मधू मंगेश कर्णिक
संस्थेचे इतर कार्यकर्ते आणि मित्र हो,

दि.२४ मार्च १९९१ रोजी ज्या कोकण मराठी साहित्य परिषदेची स्थापना माझ्याच हस्ते रत्नागिरी येथे झाली, तिच्या नवव्या अधिवेशनाचे अध्यक्षपद १४ वर्षांनी स्वीकारताना एक वेगळाच आनंद होत आहे. त्यात योगायोग असा की, ज्या ठाणे गावात मी वयाच्या चौथ्या वर्षी मुंबईहून आलो आणि नंतरच्या २४ वर्षांत माझ्या पुढील कारकिर्दीचे सर्व पहिले धडे गिरवले, त्या माझ्या प्रिय ठाणे शहरातच हा मान तुम्ही मला दिलात त्याबद्दल मी कृतज्ञ आहे.

कोमसापचे कर्तुम-कर्तुम अध्यक्ष मधू मंगेश कर्णिक यांची ही करामत आहे हे तुम्ही जाणताच. कर्णिक आणि मी तसे आयुष्यातील सहप्रवासी आहोत. १९५८ मध्ये मालवण येथे कवी अनिलांच्या अध्यक्षतेखाली भरलेल्या मराठी साहित्य संमेलनात ते मला प्रथम दिसले, पण ओळख झाली नाही. पुढे १९६७  मध्ये ते गोव्यात भेटले. तेव्हापासून आमचे हातात हात आहेत. त्यांचं करूळ गाव आम्ही आमचंच मानत आलो आहोत. मालगुंडच्या केशवसुत स्मारकाचं अधिष्ठान आमच्या मैत्रीला लाभलेलं आहे.

ते जुनं ठाणं, तेव्हाचे मान्यवर लेखक, दमणगंगेपासून कारवारपर्यंत पसरलेल्या कोकणची केलेली भ्रमंती; हे सारं आज हे भाषण करताना माझ्यासमोर आहे. परंतु ते सर्व सांगण्यासाठी लागणारी शक्ती कमी पडण्याची शक्यता आहे. कारण सध्या वयाचं ७७ वं वर्ष चालू आहे. तरी हे भाषण करताना मी कमी पडलो, तर आपण सांभाळून घ्याल अशी मी आशा करतो.

त्या वेळच्या ठाण्यात गडकरी रंगायतन नव्हतं; पण समोर गोरेपान, उत्तम आवाजात आणि आवेशात कविता म्हणणारे वसंत वैद्य राहत होते. नौपाडयाला पी. सावळाराम होते. पुढे नी. गो. पंडितराव नावाचा एक मराठी भाषेचा आणि साहित्याचा विजयरथ ठाण्यात आला. त्यांनी आमच्या साहित्यप्रेमाला अभिमानाचं कोंदण घातलं. उंबरगावजवळच्या शिरगावमध्ये १९५४ साली संयुक्त महाराष्ट्र परिषद झाली, तिचे झेंडे आम्ही ठाण्यावरुन नेले होते. ते गाव आता गुजरातेत गेलं आहे. तेथील कार्यकर्त्यांना आज या व्यासपीठावरून मी अभिवादन करतो. तुम्हांला आम्ही विसरलो नाही, इतकंच त्यांना सांगावंसं वाटतं. तेच कारवारचं. महाजन कमिशन नेमलं तेव्हा बेळगाव कारवार गाठलं. येथील आमचे मराठी बांधव महाराष्ट्राशी एकरूप होण्यासाठी आजही झुंजत आहेत. 'आम्ही तुमच्याबरोबर सदैव राहू' असा दिलासा आपण त्यांना दिला पाहिजे.

१९६२ पासून माझं कोकणातील फिरणं वाढलं. केशवसुतांच्या जन्मशताब्दीला त्यांच्या जन्मतारखेबद्दल वाद झाला. ती आपली रीत शिवछत्रपती काळापासूनची आहे. १५ मार्च १९६६ ही तारीख प्रथम जाहीर झाली होती. त्या तारखेला अनंत काणेकरांना घेऊन आम्ही मालगुंड गाठलं. नंतर दुसरी सरकारी तारीख प्रसिध्द झाली. तिल्लोरी कुणबी समाजाची शैक्षणिक समस्या समजून घेण्यासाठी लांज्याला मुक्काम करून वाडयावाडयांवर पायी फिरलो. कोकणचं सौंदर्य आणि दारिद्य्र दोन्ही पाहिलं. कोकणचे पूर आणि जोडरस्ते हे पत्रकार म्हणून हाताळले. मुंबईतील कंपनीत शिपाई होण्यापलीकडे आकांक्षा न बाळगणारा आणि मुंबईच्या गिरण्यांत राबणारा कोकणवासी आज राहिलेला नाही. कोकणचा सामान्य माणूस आज सर्व क्षेत्रांत आघाडीवर आहे.

गोव्यातील माझ्या दहा वर्षांच्या वास्तव्यानी मी कोकणच्या अधिक जवळ गेलो. सावंतवाडीचे कवी वसंत सावंत, आणि लेखक विद्याधर भागवत भेटले. दोघेही आज आपल्यात नाहीत. शेवटी तुम्ही कसं जगता यापेक्षा कुणाच्या सहवासात जगता हे महत्त्वाचं आहे. आपलं अर्ध आयुष्य हे मित्रच घडवतात. दिल्लीत कवी अनिल भेटले. 'अजुनि रुसून आहे' या त्यांच्या कवितेचा एक घुंगूर अजून कानात वाजतो आहे. गोव्यात बाकी बा.भ. बोरकरांनी तर आम्हांला काव्योत्सवात बुडवलं. 'तमाच्या तळाशी दिवे लागले' ही ओळ जितेंद्र अभिषेकींच्या गळयातून ऐकतो, तेव्हा पणजीच्या पाटो पुलाजवळ राहणारे शंकर रामाणी समोरून चालत येत आहेत असं वाटतं. मुंबईत मंगेश पाडगांवकरांपासून अरुण म्हात्रे, अशोक नायगावकरांपर्यंत सर्वांच्याच कवितांचा अखंड सहवास लाभला. या सर्वांवर कळस चढला तो कुसुमाग्रजांच्या भेटीनी, सहवासानी. कविता ही मनावर कायमचा संस्कार करते याचा अनुभव कुसुमाग्रजांनी जास्त दिला. गद्यलेखन तुमच्या विचाराला वळण देतं, पण कविता तुमच्या भावभावानांचं विश्व पूर्ण फुलविते. तुम्ही माणूस बनता.

नवे कवी, नवे लेखक
ज्यांनी आम्हांला घडवलं, आमची जीवनं फुलवली त्यांपैकी अनेक जण काळाच्या पडद्याआड गेले. त्यांचं साहित्य अमर आहे, त्याचबरोबर त्यांची जागा घेणारे नवे कवी, नवे लेखक समोर दिसत आहेत ही समाधानाची गोष्ट. व. पु. काळेंच्या थाटात आज 'सावर रे' म्हणून साद घालणारे ठाण्याचे प्रवीण दवणे 'फॉर्मात' आहेत. त्यांच्या जोडीला अशोक बागवे, प्रज्ञा लोखंडे आदी कवी आपली शब्दवीणा झंकारत आहेत. निरंजन उजगरेंसारखा एक झगमगता तारा दुर्दैवाने नुकताच आणि अचानक निखळून पडला. त्याचे स्मरण करताना तो बहुभाषी कवी आज या संमेलनात वावरतो आहे असं आपण समजू या. गोंविद मुसळे ठाण्यात आहेत. अशोक चिटणीस आणि त्यांच्या पत्नी सौ. शुभा चिटणीस यांचं जीवनच साहित्यानी व्यापलेलं आहे. त्यात शुभा चिटणिसांची यशस्वी स्त्रीयांवरील तशीच यशवंत पुरुषांवरील लेखमाला ग्रंथरूपानी घरोघर जात आहे. अशोक चिटणीस यांनी मनोहर जोशींचं, तर अरंविद ताटके यांनी आचार्य अत्रे यांचं चरित्र लिहून वाड्मयात महत्त्वाची भर घातली आहे. वि. शं. चौगुले हे आज मराठीतील आघाडीचे समीक्षक आहेत. शेवटी ललित लेखनाला एक वेगळं महत्त्व आहे. महेश केळुस्करांची कविता त्यामुळेच आकर्षित करते. सुरेश फणसे यांची 'प्रभावती' ही कादंबरी असंच लक्ष वेधून घेते. या शर्यतीत आज आघाडीवर आहे ती ऊर्मिला पवार. ही लक्ष्मणाची ऊर्मिला नाही, हरिश्चंद्राची ऊर्मिला आहे. ती मनस्वी स्वभावाची आहे. 'आयदान' या तशा कादंबरीमय आत्मचरित्राला अमेरिकेच्या प्रतिष्ठानचाही पुरस्कार मिळाला. त्याबद्दल त्यांचं मन:पूर्वक अभिनंदन. कोकणातील अनवाणी लेखकाला व्यासपीठ मिळवून देण्यासाठी ह्या कोमसापची स्थापना मधू मंगेशांनी केली. त्याचं दृश्य फलित म्हणजे हे सर्व लेखक-लेखिका आहेत.

हे सर्व समाधानाचं चित्र उभं करताना या लेखकांच्या साहित्याला पडलेल्या मर्यादाही जाणवतात. साहित्याचे दोन निकष शेवटी महत्त्वाचे ठरतात. त्या पुस्तकाचं दुस-यांदा वाचन करावं असं वाचकाला वाटलं पाहिजे हा पहिला निकष, आणि त्याचा केंद्रंबिदू शेवटी सामान्य माणूस हवा, हा दुसरा निकष. विश्वव्यापकता वगैरे सर्व नंतर येतं. पुन्हा जे लिहायचं ते शुध्द हवंच. सुदैवाने या ठाण्यातच माझ्या बालमित्राचा एक मुलगा चि. अरुण फडके हा शुध्दलेखन क्षेत्रात अपूर्व असे काम करत आहे. या क्षेत्रात असं काम करणारे अरुण फडके हे सबंध महाराष्ट्रात एकमेव आहेत. 'शुध्दलेखन तुमच्या खिशात' असं एक लहानसं पुस्तक त्यांनी प्रसिध्द केलं आहे. आज हे पुस्तक पाचव्या आवत्तीत उपलब्ध आहे. सर्व लेखक-कवींनी खरोखरच ते नेहमी आपल्या खिशात ठेवावं असं आहे. आमचे दुसरे पत्रकार मित्र 'सन्मित्र'कार स. पां. जोशी हेही निर्भेळ मराठीसाठी सतत कष्ट घेत होते. त्यांचीही आठवण येते. आवश्यक तेथे इंग्रजी शब्द वापरला तर समजू शकते, परंतु नव्या पिढीसाठी म्हणून पाच शब्दांच्या इंग्रजी वाक्यात फक्त एक शब्द मराठी असलेले वाक्य देवनागरी लिपीत लिहिले म्हणजे मराठी लेखन होत नाही, याचे भान वर्तमानपत्रांनीही ठेवले पाहिजे.

फडके, खांडेकर, साने गुरुजी, गो. नी. दांडेकर, रणजित देसाई यांच्या तोडीचे लेखक आज नाहीत. पैशाचं पीक बरं आलं. पण गुणवत्ता आणि विषयव्याप्ती यांत मराठी साहित्य कमी पडत आहे. एके काळी मामा वरेरकरांची 'धावता धोटा' ही कादंबरी वाचून मी अस्वस्थ झालो होतो. आज मुंबईतील मोठया गिरण्या बंद झाल्या. कामगार कोकणात परतले. तेथे टॉवर्स बांधण्यासाठी जुन्या इमारती आपोआप जळू लागल्या. मधू मंगेशांच्या 'संधिकाल' या नव्या कादंबरीतील भिकोबाचा वंशज या स्थिंतीत काय करतो, हे नव्या कादंबरीत यायला हवे. एका टॉवरमधील फ्लॅटमध्ये मी नुकताच गेलो होतो. तेथे एका गिरणीकामगाराचा नातू राहतो आहे असं चित्र मनात आलं. त्याचा आजोबा त्याच्याकडे येतो. आपली गिरणी याच जागेवर होती हे त्याला आठवतं. सकाळी डबा घेऊन बदली कामगारांच्या रांगेत आपण उभे राहत होतो, ते दिवसही आठवतात. तो एकदम उठतो आणि चालू लागतो. 'परत गावाकडे' असं त्या कादंबरीचं नाव कदाचित होऊ शकेल.

एकीकडे ही स्थिती तर दुसरीकडे आजची गंभीर समाजस्थिती क्रांतीचा नांगर खांद्यावर घेऊन येताना मला दिसते आहे. जाती तर नष्ट होत नाहीत. उलट निवडणुकांनी पोटजाती पुढे आणल्या. यासाठी साहित्यिकांनी तरी जाती पाळू नयेत, असं प्रतिपादन 'आगरकर पुरस्कार' स्वीकारताना मी केलं. मी स्वत: जात मानत नाही. मॉरिशसमध्ये ज्योतिबांना आणि आंबेडकरांना हवी असलेली समता मी पाहिली. परंतु आमचे सर्व लेखक आणि कवी हे काही मानावयास तयार नाहीत. जागतिकीकरणाच्या वरवंटयाखाली सध्या लहान माणूस चिरडला जात आहे, त्यात संकुचित विचारही चिरडले जातील, तर मला आनंद होईल.

सवर्ण आणि दलित लेखक यांच्यातील दरी तरी आता नष्ट व्हायला हवी. यापुढे तरी बेरजेचं साहित्यकारण करू या. दिडीच्या पालखीत आणखी काय असावं हे सांगा, पण काय नसावं हे सांगण्याचा अट्टहास नको. शेवटी साहित्याच्या पालखीतूनच संस्कृती आपल्या विविध रूपांनी मिरवते. ते बहरुंंगी, संपन्न चित्र समोर ठेवू या. ज्ञानेश्वर आणि तुकाराम यांना पर्याय नाहीत. शेवटी संतसाहित्याने मराठी संस्कृतीला वैचारिक बैठक दिली हे मान्य करायलाच हवं.

मराठी भाषेचा प्रश्र
एक नवा श्रीमंत वर्ग आज समाजात निर्माण झाला आहे. त्यांना भुलविणारी दुकानं प्रचंड आकार घेत आहेत. यात पुस्तकं नाहीत. मराठी पुस्तकांची दुकानं पूर्वी गावोगाव होती, ती केव्हाच नष्ट झाली. पुस्तकांच्या प्रतींची संख्या ५००९ वर आली आहे. ग्रंथजत्रा आहेत, संमेलनांमधील ग्रंथजत्रांमध्ये बरी विक्री होते म्हणून प्रकाशक अजून जिवंत आहेत. एकूण, तुम्ही वाचकांच्या दाराशी जा, तर पुस्तकं घेतली जातात, हे 'ग्रंथाली'नी दाखवलं. अशा परिस्थीतीत मराठी भाषेला भवितव्य नाही, मराठी वाचक संपला ही ओरड कितपत खरी मानायची ? आपल्या देशात अशिक्षित, निरक्षर यांची लोकशाही आहे आणि तिला स्वैरभैरतेचं कोंदण मिळाल्यामुळे प्रत्येक विषयावर मतभेद, दोन बाजू असं चाललं आहे. मराठीच्या भवितव्याबद्दल आम्ही आवाज उठविला तर 'उगाच ओरडू नका, अशी परिस्थीती नाही' असं बोलणारे शहरातच निघतात. ज्यांची मुलं परदेशात गेली आहेत त्यांचे पालक ही ओरड जास्त करतात. असं नाशिक सम्मेलनाचे अध्यक्ष नुकतंच म्हणाले, तेही खरं नाही. परदेशात कोण जातं ? ज्या जातीच्या तरुणांना आज या देशाच्या राजकारणात, समाजकारणात स्थान नाही ते जातात, हे सत्यही विचारात घ्यायला हवं. शैक्षणिक विषमता या समस्येच्या बुडाशी आहे, हे आधी विचारात घ्या. मुंबईसारख्या शहरात मराठी जितकी संकटात आहे, तितकी ती ग्रामीण भागात नाही, हेही खरं आहे. पूर्वीचे श्रेष्ठ लेखक, पत्रकार हे ग्रामीण भागांतूनच आले, तसे पुढेही आणखी येतील. परंतु त्यासाठी ग्रामीण भागातील मराठीच्या शिक्षणाचा दर्जा उत्तम ठेवावयास हवा. तसा तो आज नाही. शिक्षकी पेशातूनही ज्ञानींची हकालपट्टी झाली आहे. उत्तम शिक्षकच यापुढे मराठी तारतील हे निखळ सत्य जातभेद विसरून स्वीकारलें तरच मराठी वाचेल; नाहीतर मराठी टिकेल, पण त्यात लेखक, पत्रकार अगदी कमी असतील. पाठयपुस्तकं तयार करतानासुध्दा जातीचा विचार करून लेख निवडले जातात. हे खरं संकट आहे. गेल्या चार वर्षांत मुंबईतील मराठी माध्यमाच्या शाळांतील ७०० तुकडया बंद झाल्या. मराठी माध्यमाच्या शाळा शहरात टिकणारच नाहीत. त्या टिकविण्याचा प्रयत्न करणा-यांचं मी अभिनंदन करतो, परंतु हे काम सोपं नाही. नोक-या कोणत्या क्षेत्रात, कोणत्या भाषेत आहेत हा निकष ठरतो. नवी पिढी संगणक वापरू लागली आहे. तिला हातानी लिहायचंच नाही. मग वसईजवळच्या तर्खड गावचे तर्खडकर यांचं व्याकरण आम्ही शिकलो हे कोणत्या तोंडानी सांगणार? हा सर्व धुमाकूळ अगस्तीच्या हातांनी, साहित्यिकांनीच रोखावयास हवा. थंडपणे बसून 'आमचं हे काम नाही' असं मानू नये. येत्या २५ वर्षांत मराठी लेखकांची आणि कवींची नवी पिढी निर्माण व्हायला हवी. सामाजिक परिवर्तनाचा जयजयकार करणारे नवे कुसुमाग्रज आम्हांला हवेत, तसेच तर्क आणि बुध्दी यांच्या निकषांवर धर्म, अंधश्रध्दा, बुवाबाजी यांची झाडाझडती घेणारे लक्ष्मणशास्त्री जोशीही हवेत. मी निराशावादी नाही. सूर्य पुन्हापुन्हा उगवतो, तसा कुणीतरी सह्याद्रीच्या शिखरावर प्रकट होईल याची मला खात्री आहे.

वाचन एक उपाय
सर्व थरांतील लोकांनी आपल्याला आवडेल ते वाचन चालू ठेवणं हा या समस्येवरचा पाहिला उपाय आहे. 'पुस्तक हे मस्तक आहे', 'वाचाल तर वाचाल' असं अनेक मोठे लेखक म्हणाले. 'वाचन हा लेखकांसाठी रियाज आहे' असं आचार्य अत्रे यांनी सांगितलं. प्राध्यापकी मराठीपेक्षा सोपं मराठी कसं लिहायचं याचा आदर्श आचार्य अत्रे यांनी घालून दिला. सोपं पण चांगलं मराठी लिहिणं हे अधिक कठीण आहे. आणि त्यामधून लेखकाची शैली जन्माला येते.

'बापू मुसळधार हंसला' असं श्री. ना. पेंडसे सहजपणे लिहितात. 'मी या कोकणच्या मातीचे देणे लागतो' अशी श्री.नां.ची श्रध्दा आहे. त्यामुळेच त्यांचा बापू कसा कोकणातील पावसासारखा मुसळधार हसतो. 'आपल्या सदसद्विवेकबुध्दीला जराही डुलकी घेऊ न देणारे' असं एका थोर संपादकाचं वर्णन रवींद्र पिंगे करतात आणि 'स्टाइल इज दी मॅन' ही उक्ती खरी ठरवतात.

’अनंत मरणे झेलूनी घ्यावी इथल्या जगण्यासाठी,
इथल्या पिंपळपानावरती सारे विश्व तरावे'

ह्या पाडगांवकरांच्या कवितेतील ओळी वाचताना मानवी जीवनाची क्षणभंगुरता आणि चिरंतनता मनाला स्पर्श करून जातात असं वाटतं. कथाकादंब-यांचे दिवस सध्या मावळले आहेत. लोकं चरित्रं, आत्मचरित्रं अधिक वाचतात. पाकशास्त्र, वेशभूषा आदी स्त्रीविषयक पुस्तकांची बरीच चलती आहे. पुरुषांना त्याचं वैमनस्य वाटण्याचं कारण नाही. चांगले पदार्थ खाऊन चांगली पुस्तकं लिहिता येत नाहीत, इतके फारतर ते म्हणू शकतील. खरा प्रश्र दूरदर्शनच्या प्रभावाचा आहे. दूरदर्शन शाप की वरदान असा प्रश्र पडावा अशी स्थिती आज आहे. मराठी कार्यक्रम अधिक व्हावेत, मालिका पुष्कळ व्हाव्यात असं एके काळी वाटे. आज ते झालं आहे. मराठी भाषेच्या प्रसाराला दूरदर्शननी मोठा हातभार लावला आहे, त्यात 'ई'टीव्हीचं प्रसारण हैद्राबादवरुन होत असल्यामुळे कर्नाटक, गोवा आदी राज्यांतही मराठी कार्यक्रम मोठया प्रमाणात प्रसारित होत आहेत. गोव्यातील मराठीचं उच्चाटन होऊ नये यासाठी तेथे जवळजवळ दहा वर्षं आम्ही लढा दिला. नभोवाणीवर मराठीचे कार्यक्रम शक्यतो न करण्याचा तेथे प्रयत्न होई म्हणून मोर्चा काढला. आता घरोघरी मुंबईचे मराठी कार्यक्रम दूरदर्शनवरून परस्पर प्रसारित होत आहेत. अवकाशातून येणारे कार्यक्रम आज कोणी रोखू शकत नाही. मराठी भाषा सतत कानावरून जाते. नवेनवे शब्द ऐकले जातात. ही जमेची बाजू. पण सकाळपासून रात्रीपर्यंत घरातील दूरदर्शन चालू राहत असल्यामुळे वाचनाचा दिवाच विझण्याची वेळ आली आहे. एकेका तासाने बातम्या ह्या अगदीच अनावश्यक ठरल्या आहेत. पुन्हा इतकी अकाली प्रसिध्दी आज उपलब्ध झाली आहे की, त्यामुळे कलेचं रूपांतर बाजारात व्हावं. मराठी नाटकानी तर प्रहसनाचं रूप घेतलं आहे. अभिजातता कोनाडयात फेकली गेली आहे. जाहिरातबाजीच्या या युगात एका कवीनी वर्णन केल्याप्रमाणे सुंदर वस्त्राखाली कचरा विकला जातो आहे.

न्यूयॉर्कपासून टोकियापर्यंतचे टीव्ही कार्यक्रम मी पाहिले आहेत. बक्षिसांची रेलचेल हा त्यांचा प्राण. चार दिवस सासूबाईचे संपता संपत नाहीत. हे सर्व अती झालं आहे. वाचकांची अभिरुची पूर्ण बिघडवून टाकणारे हे कार्यक्रमही रोखले पाहिजेत. गवत खूप पिकतं आहे, केशराची शेतं कुठेच दिसत नाहीत. या स्थितीत आपण कुठे चाललो आहोत हे लक्षात घेऊन आपण भानावर आलो तर बरं होईल. वाचन हे बहुभाषी असावं. लेखनही बहुभाषी असावयास हरकत नाही, पण उत्तम इंग्रजीत पुस्तकं लिहिणारे, केवळ लेख लिहिणारे नव्हेत, मराठी लेखक आज कुठे आहेत? तेही नाहीत. दिलीप चित्रेसारखं एखादं नाव अशा वेळी आठवतं. एकूण, या जागतिकीकरणाच्या युगात भाषांचाही विचार जागतिक पातळीवर करताना आपली मातृभाषा ही श्रेष्ठ आहे, तिच्याऐवजी काही नाही, तिच्याबरोबर इंग्रजी, हिदी, फ्रेंच; हा विचार रुजवायला हवा. साहित्याचे नोबेल मिळवणारे टागोर हे आजपर्यंतचे एकमेव भारतीय लेखक. परंतु त्यांनीही मूळ 'गीतांजली' लिहिली ती बंगालीत, त्यांच्या मातृभाषेत, त्याचं इंग्रजी रूपांतर झालं, ते जगभर गेलं. मातृभाषेकडून परकीय भाषेकडे अशीच आपली चाल असायला हवी. गोव्याच्या आठव्या संमेलनाचे अध्यक्ष डॉ. वि. बा. प्रभूदेसाई यांनी बोली भाषांच्या सहभागाचा चांगला विचार मांडला. वसईच्या कवयित्री सिसिलिया कार्व्हालो यांनी वाडवल बोलींचा अभ्यास करून हेच प्रतिपादन केलं. एकूण, मराठीतील सर्व बोलींचे शब्द सामावून घेऊन मराठी भाषा जास्तीत जास्त समृध्द करावयास हवी. 'अमृतातेही पैजा जिंके' असं ज्ञानेश्वरांनी उगाच म्हटलं नाही! स्वभाषा, स्वदेश यांचं प्रेम अखंड राहो, अशी अपेक्षा व्यक्त करून माझं हे भाषण संपवतो.

जय हिद! जय महाराष्ट्र!

Share
 
Joomla SEO powered by JoomSEF

 
सेवासुविधा