नवीन काय वाचाल? मुख्यपान

 

'आत्मसन्मान'

'आत्मसन्मान' हा रमेश राठोड यांचा पहिलाच काव्यसंग्रह असूनही तो अव्वल व अस्सल अशा जिवनानुभूतीच्या उत्कट आविष्काराने मंडित झाल्याचे दिसते. जीवनसंघर्षाच्या तप्त भट्टीतून त्यांचे अनुभवविश्व साकार झाले आहे. त्यामुळे या काव्यविश्वात कुठेही कृत्रिमता किंवा बेगडी आविष्करण आढळत नाही.

१९६० च्या सुमारास दलित साहित्य चळवळ सुरू झाली. जनवादी, स्त्रीवादी, ग्रामीण व आदिवासी साहित्य प्रवाहांचा बोलबाला झाला. भटक्यांचे साहित्य पुढे आले.

भटक्या जमाती स्थिरावू लागल्या. साहित्याची जाण वाढली आणि वर्षानुवर्षे दडपलेला आवाज शब्दातून अभिव्यक्त झाला. 'गाडी लोहार' ही गावगाडयातील एक बलुतेदार असणारी जात असून या समूहाचे काही खास, जीवनानुभव आहेत. सुख-दु:खे आहेत. हाच जन्मसंदर्भ पचवून - भोगून रमेश राठोड यांची कविता खानदेशच्या काव्यप्रवाहात रूजू झालीय. ही कविता कवी राठोड यांची जेवढी आहे, तेवढीच त्यांच्या गाडीलोहार समाजाची पण आहे.

कवी राठोड म्हणतात -

भविष्यातल्या स्वप्नापेक्षा
वर्तमानातलं जगणंच
आम्हा सार्‍यांना आनंदीत करीत होतं
आणि खरं तर जगण्याचं
तेच बेणं होतं !

लोहार जात - व्यवसायाचे काही खास शब्द आहेत आणि खास अनुभव सुध्दा! करवत, खुटले, उप्या, रंधा ओढणे, शिलपे भरणे, धमेन, ऐरण इत्यादी शब्दांनी गाडीलोहाराचे दैनंदिन जीवन भरलेले आहे. याच जिवनानुभूतीच्या अस्सल खूणा कवी राठोड यांच्या काव्यविश्वात विखुरल्या आहेत.

'बापाने राम म्हटल्यावर' खचलेली आई कवी साक्षात उभी करतात. त्याउलट 'पंचक्रोशीत वाघ' असणारा बाप आणि अपमानीत होत असणारी आई, या विरोधी लयीतील चित्र प्रत्ययकारी आहे. सप्तसुरांच्या लयबध्द संगीतात गाणे गाणाराच 'तानसेन' असतो असे नव्हे तर वळणा-वळणाचं, उन्हं - पावसाचं जीवन जगणारा सामान्य माणूसही 'तानसेन' असतो! कारण तो हक्काच्या सुख दु:खाचे गाणेच गात असतो. कवी राठोड याच अर्थाने स्वत:ला 'तानसेन' मानतात.
त्यांच्या जीवन गाण्यातील बोल कधी 'बेताल' असेलही पण तोच बोल स्वत:सह इतरांनाही सावरणाराही होता. 'स्वप्नांना स्वर देत' आयुष्यचे गाणे गाणारा हा कवी ताल-लय-सूर सांभाळून 'तानसेन' होतो. जगण्याची जिद्द सिध्द करतो. जगण्याचा अर्थ शोधतो. आणि आत्मसन्मानाने जीवन गाणे गातो.

कवी रमेश राठोड यांच्या कवितेतील कल्पनाविलासाच्या जागा सौदर्यांने बहरल्याच्या अनेक साक्षी या काव्यविश्वात विखुरल्या आहेत.

नदीच्या दोन्ही किनार्‍यावर
हिरवळ मला खुणावत असते.
अन् पाण्याच्या प्रवाहातून मी
वर्तमानाला 'सोबती' केलेले असते.

बरं जमतं झाडांना
खंबीरपणे
स्वत:चा तोल सावरून
उन्हाला सावलीचे
दान देणे

'गाडी लोहार' या भटक्या जमातीच्या कौटुंबिक व समूह जीवनाचे उपेक्षित अनुभवविश्व, समर्पक सौदर्यवेधी कल्पना, उत्कट भावना विलास, सखोल जीवन, चितंन, सूक्ष्म आकलन अवलोकन आणि साधी, सरळ काव्यशैली या गुणांमुळे 'कवी रमेश राठोड' यांच्या आत्मसन्मानाची कविता ही खानदेशच्या उज्वल कविता प्रवाहात कलात्मक उंचीवर सन्मानित करणे अपरिहार्य आहे. खानदेशला फार मोठी व समृध्द काव्य परंपरा आहे. आता रमेश राठोड यांच्या 'आत्मसन्मानाच्या' कविता त्यात रुजू झाल्याने कवितेच्या प्रातांत-खर्‍या-खुर्‍या सांस्कृतिक संचिताची भर पडून ही कलावंतांची लोकशाही विकसित झाली आहे.

डॉ. श्रीपाल सबनीस, पुणे

पुस्तक - आत्मसन्मान
लेखक - प्रा. रमेश राठोड
प्रकाशक - सौ. रत्ना राठोड
किंमत - रु. १२०/-

Share
 
Joomla SEO powered by JoomSEF

 
सेवासुविधा