भाषांच्या विश्वात

हल्ली विद्यार्जनाच्या कक्षा अधिक रुंदावल्या आहेत. प्रत्येक शाखेच्या ग्रॅज्यूएशन किंवा पोस्टगॅज्यूएशनसाठी अमेरिका, युरोप, रशिया, सिंगापूर सारख्या अनेक देशांत मुबलक संधी उपलब्ध आहेत. त्यासाठी विद्यार्थी स्थलांतर करतांना दिसतात. नवा देश, नवीन संस्कृतीत इंग्रजीचा वापर असला तर ठीक नाहीतर परकी भाषेत सा-यांबरोबर जुळवून घेतांना विद्यार्थांची अगदी दमछाक होते. त्यासाठी आजकाल अगदी दहावी पासूनच तयारी सुरु असते. दहावी मध्ये कित्येक विद्यार्थी हिंदी किंवा संस्कृत ऐवजी फ्रेंच किंवा जर्मन भाषा परिक्षेसाठी निवडतात. हल्ली अनेक विद्यापीठे किंवा प्रायव्हेट क्लासेस मधूनही परदेशी भाषा शिकविल्या जातात.इंटरनेटवरही ह्या विषयी आपल्याला माहिती देणा-या अनेक साईट्स आहेत. परकीय भाषांमध्ये अमेरिकन इंग्लिश, युरोपीयन इंग्लिश, स्पॅनिश, जर्मन, फ्रेंच, इटालियन, रशियन, पोर्तूगीज, जॅपनीज, चायनिज आणि अरेबिक शिकण्याकडे भारतीयांचा कल दिसून येतो.

कुठल्याही भाषेतले शब्द शिकण्यासाठी दोन पध्दती आहेत. परंतु त्यावर प्रत्येक संशोधकाचे वेगवेगळे मत आहे. पहिल्या पध्दतीत प्रत्येक अक्षर आणि त्याचे उच्चार (फोनोग्राम्स) शिकणे आणि मग त्याची जोडणी करणे. दुस-या पध्दतीत संपूर्ण शब्दच शिकणे ह्यामध्ये प्रत्येक शब्दाचा उच्चार (फोनोग्राम्स) अपेक्षित नसतो. ह्या दोन्ही पध्दतींना अनुसरुन पुढे भाषा शिकण्यासाठी फोनोग्राम्स (किंवा फोनिक्स) आणि फ्लॅशकार्डचा वापर केला जातो. समजा इंग्रजीत cat शिकवायचे असेल तर फोनोग्राम्स नुसार क, ऍ, ट अशी फोड करुन शिकवावा लागतो. शब्दांबरोबरच त्याच्या उच्चारांनाही खूप महत्त्व आहे. भारतीय लोक cat म्हणतील पण अमेरिकन किंवा युरोपीन त्यामध्ये ‘क’ बरोबर ‘ख’ चा सूक्ष्म उच्चार जोडून ‘खॅट’ म्हणतील. फुलाला इंग्रजीत आपण सरळसरळ ‘फ्लॉवर’ (‘र’ वर जोर देत) म्हणतो तर परदेशी उच्चार आहे ‘फ्लार’. भाषा शिकण्याची प्राथमिक माहिती आपल्याला www.internationalparentingassociation.org ह्या साईटवर वाचायला मिळते.www.abroadlanguages.com ह्या साईटवर परदेशी भाषा शिकण्यासाठी माहितीपूर्ण कारणे दिलेली आहेत. फ्रेंच भाषा का शिकायची ? ह्याची कारणे देतांना साईट म्हणते जगभरात अधिक बोलल्या जाणा-या भाषांमध्ये फ्रेंच भाषेचा अकरावा नंबर आहे. फ्रेंच भाषा ही जगातल्या तेहतीस देशांची अधिकृत भाषा आहे. फ्रेंच ७ कोटी लोकांची मातृभाषा आहे. जगभरातली २० कोटी लोक फ्रेंच भाषा बोलू, लिहू आणि वाचू शकतात. जगभरातल्या पोस्ट खात्याचीही फ्रेंच ही अधिकृत भाषा आहे. फ्रेंच भाषा शिकल्यास कुठल्या संधी उपलब्ध आहेत हेही साईट सांगते. आंतराष्ट्रीय व्यावसायिकांसाठी, आंतरराष्ट्रीय संस्था, पर्यटन, फ्रेंच संशोधन संस्था, फ्रेंच शिक्षक, ट्रान्सलेटर आणि दुभाषिक. अश्या त-हेने प्रत्येक भाषेची वैशिष्टये, त्यांचे फायदे आणि संधी आपल्याला साईटवर वाचायला मिळतात. काही साईट्सवर मोफत ऑनलाईन कोर्सेसपण आहेत. प्रत्येक स्वराचे उच्चार आधी इंग्रजीत सांगितले जातात आणि मग आपण शिकत असलेल्या भाषेत त्याचा अनुवाद केला जातो. हा अनुवाद मल्टीमिडीयाच्या सहाय्याने ऐकण्यासाठी सोय आहे. त्यामुळे भाषा शिकतांना त्यातील उच्चारांचे बारकावे आपल्याला समजायला सोपे होतात. http://www.word2word.com/coursead.html ह्या साईटवर आपल्याला भारतीय तसेच परदेशी मिळून ८५ भाषा शिकायला मिळतात. ह्या मध्ये अगदी ‘उझबेग’ पासून ‘युक्रेनियन’ सारख्या विविध भाषांचा उल्लेख आहे. www.foreignlanguagehome.com साईटवरही जगभरातल्या शाळेतल्या विविध शिक्षकांनी एकत्र येऊन ऑनलाईन रिसोर्सेस उपलब्ध करुन दिले आहेत. ह्या मध्ये विविध शाळा, शिक्षक व खाजगी संस्था सहभागी होऊ शकतात.तुम्हाला जी भाषा शिकायची त्या भाषेविषयी सर्च केल्यास त्यासंबंधी अनेक साईट्स आपल्याला सापडतात. समजा फ्रेंच भाषा शिकायची असल्यास त्यासंबंधी फ्रेंच डिक्शनरी, व्याकरण, शब्दसंपदा, शब्दोच्चार, सातत्याने आढळणा-या चुका, त्या भाषेसंबंधीत वर्तमानपत्रे, बातम्या, रेडिओ, ब्लॉग्स, भाषांतरे आपल्याला सहजपणे सापडतात. त्यासाठी http://french.about.com/ ही साईट उपयुक्त आहे. अश्याच पध्दतीने जर्मन भाषेसाठीही www.deutsch-lernen.com ही जर्मनमध्येच नाव असणारी साईट अत्यंत माहितीपूर्ण आहे. ह्या साईटवर भाषेविषयी धडे, अभ्यासासाठी टीप्स, जोक्स, सुविचार तर आपल्याला वाचता येतातच, त्याचबरोबर जर्मन मित्रांशी आपण मैत्रीही करु शकतो. नव्याने शिकणा-यांसाठी दहा धडे तयार केले आहेत. प्रत्येक धडयामध्ये व्याकरणावर भर देण्यात आला आहे. जर्मन भाषेबरोबरच जर्मन, ऑस्ट्रीया आणि व्हिएन्ना देशाची संस्कृतीही आपल्याला वाचता येते, अभ्यासता येते.

“निहोंगो ओ नारौ” म्हणजेच www.learn-japanese.info साईटवर चला जपानी भाषा शिकूया. ह्या साईटवरुन जॅपनीज भाषा शिकण्याची श्रीगणेशा करता येते. बालवाडीतल्या मुलांसारखे रंग, आकार, अवयव, प्राणी, पक्षी ह्यांच्या नावाची ओळख जॅपनीज मध्ये ही साईट करुन देते. त्यानंतर इंग्रजी ते जॅपनीज छोटया छोटया वाक्यरचना आपल्याला करता येतात. उदाहरणार्थ “वाताशी नो रिसू देसू” म्हणजेच ”ती मांजर आहे” किंवा “टोरा देसू” म्हणजे “तो पक्षी आहे” अश्या त-हेने टप्याटप्याने शिकत जॅपनीज व्याकरण, शब्दसंपदा, वाक्यरचना, वाचन, गाणी ऐकण्याची सोय ह्या साईटवर उपलब्ध आहे.

प्रत्येक मूल जन्मतः मातृभाषा कानावर पडल्यामुळे आपोआप बोलायला शिकते. सुरुवातीला छोटया वाक्यांत बोलणारे मूल एक-दोन वर्षात सफाईदारपणे बोलायला शिकते. संशोधकांच्या मते लहान वयात मूलाला अनेक भाषां सहजपणे शिकता येतात. काही वर्षात त्यावर प्रभूत्वही मिळवता येते. स्वतःहून परकी भाषा शिकण्यापेक्षा बरेचदा गरजेनुसार व परिस्थितीनुसार परप्रांतीय किंवा परदेशीय भाषा आत्मसात केली जाते. http://www.eduguide.org/Parents/ArticleDisplay/tabid/102/id/367/Why-Learn-Another-Language-Knowing-Other-Languages-Brings-Opportunities.aspx ह्या लिंकवर परकीय भाषा का शिकावी ह्याची कारणे अत्यंत वाचनीय आहे.

सर्वप्रथम ते म्हणतात जग हे विविध भाषांनी समृध्द आहे. आपल्या मनाची कवाडे उघडल्यास आपल्याला लक्षात येते की विविध भाषेतली अगणित पुस्तके, वर्तमानपत्रे, गाणी, दूरदर्शन, चित्रपट, वेबसाईट ह्या माध्यमांचा उपयोग आपण आपले ज्ञान वाढवण्यासाठी उपयोग करु शकतो. आपल्या मातृभाषेव्यतिरिक्त अन्य भाषा शिकल्यास आपले ‘ऍनालिटीकल स्कील्स’ वाढतात. त्यामुळे गणित, शास्त्र, संगणक ह्यासाठी त्याचा उपयोग होतो. पर्यायाने SATs, ACTs, GREs, MCATs, and LSATs सारख्या स्पर्धा परिक्षांचे ‘स्कोर’ वाढविण्यास त्याचा उपयोग होतो. निरिक्षणांती सिध्द झाले आहे की दोन पेक्षा जास्त भाषा माहिती असलेल्या मुलांचे मार्क तुलनेने अधिक असतात. इतर भाषा शिकण्याचा व्यसायिक फायदा म्हणजे विविध क्षेत्रातील ‘ग्लोबल संधी’. आज सर्व जग जवळ आल्यामुळे वेगवेगळ्या देशांत आपला विस्तार वाढविण्यासाठी मोठया कंपन्या उत्सूक आहेत. अश्या वेळेला जॅपनीज किंवा फ्रेंच येत असलेल्या पदाधिका-याला अनेक संधी चालून येतील ह्यात शंकाच नाही. शिक्षक, परिचारिका, गायक, तंत्रज्ञ इत्यादी इतर क्षेत्रातल्या लोकांनाही इंग्रजी व्यतिरिक्त परदेशीय भाषा येत असेल तर त्यांना तुलनेने परदेशात जाण्यासाठी अनेक संधी उपलब्ध होऊ शकतात. अनेक लोकांबरोबर त्यांना मिसळता येते. ह्याचा फायदा त्यांना त्यांच्या कामात आणि आपले क्षितीज विस्तारण्यातही होतो. मोठया कंपन्यांच्या व्यवस्थापकांना अशी लोक नवीन व्यावसायिक संधी मिळवून देण्यासाठी हवी असतात.

वरील सर्व कारणे समजावून घेतल्या आपल्या मनात विचार येऊ शकतो. भाषांच्या ह्या महासागरात नेमके काय व कधी शिकायचे ? ह्याला उत्तर देतांना साईट म्हणते की शिकण्याला कुठलेही वयाचे बंधन नाही. आपले शिक्षण, त्यानंतरच्या संधी, व्यवसाय, आवड, परिसर बघून प्रत्येकाने नवीन भाषा शिकावी. सुरुवातीला शिकतांना, त्या भाषेच्या लोकांशी संवाद साधतांना त्यामध्ये प्रभूत्व नसेलही पण काही हरकत नाही कारण आपला मुख्य उद्देश भाषेद्वारा त्यांची संस्कृती समजावून घेण्याचा आहे. नवीन भाषा शिकणे म्हणजे नुसतेच त्या भाषेचे व्याकरण किंवा काही शब्द शिकणे नव्हे तर त्या भाषेचा लहेजा, विविध स्वर, आवाज, भावना, दृष्टीकोन समजावून घेणे. त्या भाषेच्या संस्कृतीत स्वतःला सामावून घेऊन त्यांचा समाज आतून बाहेर समजावून घेणे. नवीन भाषेतले वाचन, लोकांशी संवाद, चित्रपट पाहणे ह्यामुळे आपल्याला निखळ आनंद मिळवता येतो. इतर भाषा शिकलेल्या माणसांसाठी अनेक कवाडे उघडतात. अनेक संस्कृती आणि विविध व्यक्तींशी संपर्क आल्यामुळे त्यांचे स्वतःचे जग विस्तारते. त्याचा उपयोग त्यांच्या कामात आणि आजूबाजूच्या लोकांनाही लाभ होतो. अशी माणसे अधिक जबाबदार नागरीक होतात. तुम्ही कुठलीही नवीन भाषा शिकलांत की तुमचा जगाकडे बघण्याचा दृष्टिकोण आणि जगाचा तुमच्याकडे बघण्याच्या दृष्टिकोणात फरक पडेल हे निश्चित. म्हणूनच म्हणतात :

“Language shapes the way we think, and determines what we can think about.”

– भाग्यश्री केंगे