बॄहन्महाराष्ट्र मंडळ अधिवेशन मुख्यपान

 

अधिवेशन झाले पण पुढे काय?....


बृहन्महाराष्ट्र मंडळाचे रौप्य महोत्सवी अधिवेशन १ जुलै ते ४ जुलैला अमेरिकेतल्या अटलांटा इथे संपन्न झालं. अधिवेशनासाठी जमलेले अमेरिका, कॅनडा आणि काही प्रमाणात युरोपातून आलेले रसिक आपल्या सोबत गोड आठवणी घेऊन परतले. अधिवेशन सर्व तऱ्हेने यशस्वी झाल्याचं चित्र होतं कुणाचीही कार्यक्रमांच्या दर्जाबद्दल, भोजन व्यवस्थेबद्दल काही तक्रार नव्हती. याचं श्रेय नक्कीच गेली दोन वर्षे 'घरदार, कुटूंब यांची थोडीफार ओढताण झाली तर चालेले पण अधिवेशन हे संस्मरणीय व्हायला पाहिजे' या एकाच ध्येयाने झपाटलेल्या बृहन्महाराष्ट्र मंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीनिवास ठाणेदार आणि यजमान अटलांटा महाराष्ट्र मंडळाकडे जाते.

अधिवेशन झालं; दिग्गज हजेरी लावून गेले; पण पुढे काय? बृहन्महाराष्ट्र मंडळाची पुढची दिशा काय याबद्दल डॉ. श्रीनिवास ठाणेदार यांच्याशी संवाद साधला भागवत सोनवणे यांनी.

बृहन्महाराष्ट्र मंडळाने २५ वर्षे साजरी केलीत. रौप्य महोत्सवी वर्षात आपण अध्यक्षपदाची धुरा सांभाळली. काय वाटते मागे वळून पाहताना?
ठाणेदार - अधिवेशन अतिशय चांगल्या रितिने पार पाडल्याचं समाधान नक्कीच आहे.
यंदाचं अधिवेशन सर्वार्थाने वेगळं आणि संस्मरणीय असं झालं. महत्त्वाचं म्हणजे ह्यावेळी अधिवेशन अटलांटा सारख्या अमेरिकेच्या दक्षिणेकडल्या शहरात झालं आपली मराठी माणसं वेस्ट कोस्ट (कॅलिफोर्निया) आणि इस्ट कोस्ट (न्यूयार्क - न्यूजर्सी) वगैरे भागात मोठया प्रमाणावर राहतात. अनेकांना एकतर दूरवरचं ड्रायव्हींग करावं लागलं; किंवा विमानाने प्रवास. एवढं प्रचंड अंतर असून रसिकांचा जो प्रतिसाद मिळाला तो अप्रतिमच म्हणावा लागेल. २००० लोक येतील असा अंदाज असताना प्रत्यक्षात सुमारे ३००० लोक अधिवेशनास उपस्थित होते.

या अधिवेशनानंतर पुढे काय? पुढच्या अधिवेशनाची वाट बघणार का आपल्या काही खास योजना पण आहेत.?
ठाणेदार - बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या व्यासपीठावरून निव्वळ कलात्मक कार्यक्रम अथवा मनोरंजन न करता सर्वांना घेऊन पुढे कसं जाता जाईल याचा आम्ही नीट विचार केलाय.

अमेरिकेतल्या मराठी माणसानं वेगवेगळी शिखरे पदाक्रांत केली आहेत. मराठी माणूस वैद्यकीय, औषधनिर्माण, अर्थकारण पायाभूत सूविधा या क्षेत्रातील उदयोगांबरोबरच फॉरच्यून ५०० कंपन्यांमधून उच्च अधिकारी पदावर काम करत आहेत. अमेरिकेत आलेल्या पहिल्या पिढीला आता निवृत्तीचे वेध लागले आहेत. अशा निवृत्तांच्या ज्ञानाचा महाराष्ट्राला काही उपयोग होईल का? यासाठी आम्ही वेगवेगळया दिशांनी विचार करत आहोत. निवृत्तांची 'नॉलेज बँक' बनवून त्याचा नव्या पिढीला उपयोग करून घेता येईल.

भारतातल्या उद्योजकांच्या अनुभवांचा परदेशस्थ उद्योजक काही फायदा घेऊ शकता काय? तशा काही योजना?
ठाणेदार - सध्या तरी असं व्यासपीठ उपलब्ध नाही पण मराठा चेंबर्स ऑफ कॉमर्स सारख्या संस्थांशी संवाद सुरू करण्याचा मनोदय आहे.

अधिवेशनासाठी मिलियन डॉलर्स (सुमारे पाच कोटी ) खर्च येतो; तितकाच खर्च येणाऱ्या प्रतिनिधीच्या खिशातून जातो. तर आपणास हा करोडो रूपयांचा ''खुर्दा'' उधळला जातोय असे वाटत नाही काय? विशेषत: महाराष्ट्रात दरवर्षी विविध कारणांनी शेतकरी वर्ग होरपळून निघत असतांना? 
ठाणेदार - अधिवेशनासाठी मोठा खर्च येतो हे मान्य आहे, पण इथली मंडळी हे अधिवेशन म्हणजे दिवाळी-दसरा या सणांसारखाच मानतात. लोकांच्या भेटीगाठी होतात. 'स्नेहबंधन' सारख्या उपक्रमातून मूला-मूलींची लग्न जूळतात; ते ही जोडे न झिजवता... करं तर विमानाचे टायर न झिझवता असं म्हणायला पाहिजे. माणूस महाराष्ट्रात असो किंवा परदेशात उत्सव म्हटल्यावर खर्च होणारच. पण आम्हाला देखील आमच्या सामाजिक जबाबदारीचं भान आहेच की! महाराष्ट्र फाऊंडेशनच्या माध्यमातून १४ मिलियन डॉलर (सुमारे ७० कोटी ) रूपये जमवलेत त्याचा उपयोग आम्ही महाराष्ट्रात काही स्वयंसेवी संस्थासाठी मदत देण्यासाठी करणार आहोत.

मनोरंजनात्मक कार्यक्रमांसाठी महाराष्ट्रातून कलावंत आणण्याचा अट्टाहास कशासाठी? अमेरिकेतल्या मराठी माणसाच्या कलागुणांना जास्त वाव का देत नाहीत? 
ठाणेदार - यंदा आम्ही हा प्रयत्न जरूर केलेला आहे. अधिवेशनातले ७०% कार्यक्रम हे स्थानिक कलावंतानी सादर केले होते, आणि मला सांगण्यास आनंद वाटतो की, अमेरिकेतले मराठी कलावंतही महाराष्ट्रातल्या कलावंताच्या तोडीचे आहेत. 
तरी सुध्दा महाराष्ट्रातल्या कलावंतांनाही संधी देऊन त्यांची कला अमेरिकेतल्या माणसाला बघता यावी हा उद्देश आहे.

मराठी माणसांच स्नेह संमेलन असं म्हणता, या मराठी माणसांच्या मुलांना एक वाक्यही धड मराठीत बोलता येत नाही, तेव्हा तुम्हाला पुढच्या पिढीत हा मराठी बाणा नसेल असं नाही वाटत काय? 
ठाणेदार - नाही मला तसं वाटत नाही. यशवंतराव चव्हाणांनी 'मराठी कोण?' याची एक व्याख्या सांगितली होती. मराठी म्हणजे जगाच्या पाठीवर कुठंही राहणारा आणि कुठलीही भाषा बोलणारा, पण ज्याचं महाराष्ट्रावर आणि मराठी भाषेवर प्रेम आहे, तो मराठी माणूस या अर्थानं आम्ही आमच्या नव्या पिढीला देखील मराठीतच मानतो. त्यांच्या मनात महाराष्ट्राची संस्कृती, परंपरा, भाषा याबद्दल प्रेम वाटावं म्हणूनच या अधिवेशनांच प्रयोजन असतं.

आपल्या अध्यक्षपदाच्या कारकीर्दीत आपण काय मिळवलं?
ठाणेदार - एकाच शब्दात सांगायचं तर मी खूप 'एन्जॉय' केलंय. अतिशय वेगळा असा अनुभव होता. कंपनी चालविणे आणि सामाजिक उपक्रमांत कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देणे यात मूलभूत फरक आहे. कारण दूसऱ्या प्रकारात कुणालाही Incentive मिळत नाही. निर्भेळ आनंदाच्या शोधात मात्र प्रत्येकजण असतो. त्यातूनच अनेक लोकांच्या ओळखी होतात. राजकारण, कला, साहित्य या क्षेत्रातल्या मोठया लोकांना जवळून बघता आलं. त्यांच्याकडे खूप काही शिकण्यासारखं होतं.

बृहन्महाराष्ट्र मंडळाची एकंदरीत प्रतिमा तितकीशी उत्साह वर्धक नाही. इथ बरीच 'संगीत मानापमान' चालतात त्याबद्दल आपलं काय मत आहे?
ठाणेदार - काही प्रमाणात हे सर्वच ठिकाणी हे होणार. चार माणसं जमली की मतभेद हे होणारच, मात्र मतभेद होणार नाही याची आम्ही काळजी घेतो. गेल्या अधिवेशनाच्यावेळी महाराष्ट्रात सरकारने सरकारने दिलेल्या मदतीवर टिका झाली. मात्र नंतर आम्ही (२५ लाख) सरकारचे सव्याज परत केले. त्यामुळे आमची प्रतिमा पुन्हा उंचावली.

तुमचा महाराष्ट्र रायगडवरून सुरू होतो आणि सदाशिव पेठेतून सिहंगडावर संपतो असा सुर इथं ऐकायला मिळायला, तुम्हाला काय वाटतं?
ठाणेदार - पुण्या-मुंबईचीच मंडळी इथं मोठया प्रमाणावर आहे, त्यामूळे असे वाटण्याची शक्यता आहे, पण मी सांगु इच्छितो की विदर्भ, मराठवाडा, खानदेश हा ही आमचाच देश आहे. या भागातली मंडळी आता अमेरिकेत वाढू लागली की ती ही आमच्यात सामील होतील.

अमेरिकेतल्या मराठी साहित्यीकांसाठी काही योजना आहेत काय? 
ठाणेदार - होय, या वर्षापासून आम्ही अमेरिकेतल्या लेखकांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांचा गुणगौरव करत आहोत. यंदा विदयुल्लेखा अकलूजकर यांचा सन्मान आम्ही केला.अमेरिकेत अनेक नामांकित मराठी लेखक आहेत. विदया हर्डीकर, कुंदा जोशी, निलिमा कुलकर्णी, अनुराधा गानु, शोभा चित्रे, दिलीप चित्रे, अनंत गद्रे, अरूण जतकर, अशी कितीतरी नावं सांगता येईल. या सर्वांना आम्ही प्रोत्साहन देणार आहोत. तसेच यांची पुस्तके दर्जेदार प्रकाशनातून छापून येतील याकडेही आम्ही लक्ष देणार आहोत.

मराठी माणूस (विशेषत: बृहन्महाराष्ट्र मंडळातला) राजकारणात मागे पडतो त्यासाठी आपण काय करणार आहात? 
ठाणेदार - परक्या देशात राजकारणातल्या भानगडीत पडायला बृहन्महाराष्ट्रीय माणूस कचरतो तरीही सध्या कुमार बर्वे हे मेरिलॅडच्या स्टेट असेब्लीमध्ये विरोधी पक्षनेते आहेत. स्वाती दांडेकर या आयोका मधल्या 'स्टेट सिनेटर' यांना आम्ही यंदा अधिवेशनाला मुद्दाम बोलावून लोकांशी ओळख करून दिली. त्यांच्याकडे बघून आपणही राजकारणात उडी घ्यावी असे इथल्या मराठी लोकांना वाटावं हा उद्देश होता. त्यामुळे निश्चितच आर्थिक उद्दिष्टये साध्य होतील.

शेवटी एकच म्हणावसं वाटतं महाराष्ट्र ही आमची जन्मभूमी आहे पण अमेरिका कर्मभूमी आहे. अमेरिकेच्या कॅबिनेटमध्ये मराठी आवाज दूमदूमला पाहिजे आणि तो दिवस दूर नाही याची मला पुर्ण खात्री आहे!

मुलाखत आणि शब्दांकन
भागवत सोनवणे

Share
 
Joomla SEO powered by JoomSEF

 
सेवासुविधा