बॄहन्महाराष्ट्र मंडळ अधिवेशन मुख्यपान

 

बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या अधिवेशनासाठी अटलांटा सज्ज


अटलांटा - दि. १ जुलै २००५ अमेरिकेतल्या मराठी माणसाचा सांस्कृतिक उत्सव अशी ख्याती असलेल्या बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या रौप्य महोत्सवी अधिवेशनासाठी 'अटलांटा पुरी' सज्ज झाली.

आज भल्या सकाळी सहा वाजता मुख्यमंत्री श्री. विलासराव देशमुख उद्योगमंत्री श्री. अशोकराव चव्हाण आणि त्यांच्या शिष्टमंडळातील प्रतिनिधींचे आज इथे आगमन झाले.

त्यांच्या स्वागतासाठी बृहन्महाराष्ट्र मंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीनिवास ठाणेदार सहसंयोजक श्री. राजन वेडक आणि उद्योजक परिषदेचे समन्वयक श्री. बाळ कुटे विमानतळावर उपस्थित होते.

सियॅटल इथल्या बोईंग विमान कंपनी आणि मायक्रोसॉफ्टच्या उच्चाधिका-यांबरोबरच्या व्यस्त दिवसानंतर रात्रीचा प्रवास करून आलेल्या मुख्यमंत्र्यांनी विमानतळावर बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या प्रतिनिधींबरोबर मोठया उत्साहाने संवाद साधला. दरम्यान जॉर्जिया इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटरच्या संकुलात १०० हून अधिक कार्यकर्ते अंतर्गत सजावटीवर शेवटचा हात फिरविण्यात व्यस्त होते. तर महिला कार्यकर्त्यांनी भोजनगृहाच्या सजावटीसाठी ताबा घेतला आहे. भोजनगृहाच्या सजावटीची संकल्पना (थीम) 'मराठी साडी' ही असून विविधरंगी पैठण्या आणि शालू यांचा उपयोग करून हॉल सजवला आहे. प्रत्येक दालनाला महाराष्ट्रातल्या शहरांची नावे देण्यात आली आहेत.

निमंत्रितांपैकी ज्येष्ठ समाजसेवक डॉ. अनिल अवचट. आंतरराष्ट्रीय किर्तीचे शास्त्रज्ञ डॉ. रघूनाथ माशेलकर यांचे आज आगमन झाले. उद्या संध्याकाळपर्यंत २७०० प्रतिनिधी अटलांटामध्ये एकत्र येणार असून महाराष्ट्रातील नामवंत कलावंतांचे चमू दाखल होत आहेत.

संजय मोने यांच्या 'हम तो तेरे आशिक है' या अस्सल मराठी नाटकाचे कलाकारही आज इथे पोहोचले. नाटकाची तांत्रिक बाजू सांभाळणा-या कर्मचा-यांना अमेरिकेचा व्हिसा नाकारला तरी हे नाटक तितकंच यशस्वी करण्याचा चंग संयोजकांनी बांधला आहे. अनेक पत्रकार, काही कलावंत यांना वेळेत व्हिसा मिळण्यात अडचणी आल्यातरी एकूणच अधिवेशन यशस्वी करण्यासाठी यजमान अटलांटाच महाराष्ट्र मंडळ सज्ज झालं आहे.

वृत्तांत व छायाचित्र


भागवत सोनवणे

Share
 
Joomla SEO powered by JoomSEF

 
सेवासुविधा