बॄहन्महाराष्ट्र मंडळ अधिवेशन मुख्यपान

 

'डॉ. तुम्ही सुध्दा' ने बृहन्महाराष्ट्र मंडळी हेलावली


अटलांटा - ता. ३ जुलै अधिवेशनाचा दुसरा दिवस हा भरगच्च सांस्कृतिक कार्यक्रमांनी भरलेला होता. उभ्या उभ्या कॉमेडी, इराकच्या युध्द कथा, गाण्याच्या मैफिली, भरतनाट्म, कथकली नृत्य यांनी अनेक रसिकजणांच मनोरंजन केलं. मात्र आजचा दिवस गाजविला तो ब्ल्युमिंग्टन इलिनॉयच्या मराठी मंडळातील नवोदित कलावंतानी. खरं तर ही सगळी कलाकार सॉफ्टवेअर इंजिनियर्स... परंतु व्यावसायिक रंगभूमीवरील मुरलेल्या कलाकारांच्या तोडीचा अभिनय सादर करून अमेरिकेतल्या तमाम नाटय प्रेमींना 'डॉ. तुम्ही सुध्दा' या नाटकाने प्रभावित केले.

शैलेश जोशी यांनी म्हटलेल्या नांदीलाच प्रेक्षकांनी टाळयांचा कडकडाट केला. उत्तरोत्तर प्रत्येक ब्लॅक आऊटला टाळयां वाढतच गेल्या. अतिशय गंभीर विषय असलेल्या या नाटकाला रसिक प्रेक्षकांनी तुडुंब गर्दी केली होती. दीपा जोशी यांनी केलेल्या रत्ना पवारच्या भूमिकेने तर कित्येकदा रसिकांचे मन हेलावून टाकले जात होते.

नाटक संपल्यावर प्रेक्षकांनी रंगमंचाकडे धाव घेऊन या सॉफ्टवेअर इंजिनियर्स असलेल्या कलाकारांची पाठ थोपटली. त्यामध्ये खा. प्रकाश परांजपे आणि खा. शिवाजीराव आढळराव पाटील यांनी खासकरून कलाकारांची स्वत: होऊन ओळख करून घेतली.

१२०० मैल गाडीने प्रवास करून आलेल्या या नवोदित कलाकारांना अगदी शेवटच्या क्षणी संधी दिली होती. त्या संधीचं त्यांनी सोनं केलं. 'हम तो तेरे आशिक है' या नाटकातील कलाकारांना अमेरिकेचा व्हिसा न मिळाल्यास 'डॉ. तुम्ही सुध्दाचा' पर्यायी विचार होणार होता.. मात्र 'आशिकच्या' कलाकारांना व्हिसा मिळाल्याने या नवोदित कलाकारांना ३ अंकी नाटकातील काही प्रसंग ऐन वेळी वगळून मर्यादित सुविधांमध्ये हे नाटक सादर करावं लागलं.

रंगमंचावर 'नम्रता नर्सिंग होम' या खूर्चीवर ठेवलेल्या एका फलकामुळे नाटकातील हॉस्पिटलचे चित्र उभे केले. उरलेले काम कलाकारांनी अतिशय कसदार अभिनय सादर करून केले.

गौतम करंदीकर यांनी दिग्दर्शित केलेल्या या नाटकाचे कलाकार होते नचिकेत सरदेसाई, गौरी करंदीकर, अनुराधा गोरे, दीपा जोशी, राहूल शिंदे, शेलैश जोशी, वासुदेव कारुळकर, शिल्पा अडवे, सुनील मुंडले. नेपथ्य रचना होती अरविंद माळी, सचिन अडवे, संदीप गोरे यांची तत्पुर्वी सांस्कृतिक कार्यक्रमाचं उद्धाटन क्रिकेटवीर लिटल मास्टर सुनिल गावसकर यांच्या हस्ते झालं. सौ. विजु भाडकमकर यांनी सुत्रसंचलन करताना अनेक ठिकाणी मराठीचे, महाराष्ट्राचे, आण् मराठी भूमीत जन्मलेल्या राष्ट्रपुरुषांचे संदर्भ देत वातावरण निर्मिती केली. व्यासपीठावर डॉ. अनिल अवचट, डॉ. रघुनाथ माशेलकर, मुख्यमंत्री विलासराव देशमुख, सुनिल गावसकर, डॉ. श्रीनिवास ठाणेदार आणि डॉ. अजय हौदे उपस्थित होते.

अधिवेशनाच्या निमित्ताने इथे एक प्रदर्शनही भरलयं. त्यामध्ये मोठया प्रमाणावर मराठी पुस्तके, मराठी संगीताच्या ध्वनी फिती, चित्रपटाच्या फिती यांची खरेदी करण्यासाठी रसिकांची झूंबड उडाली होती. 
महाराष्ट्रातून नावाजलेल्या मराठी पुस्तक प्रकाशकांनी इथं स्टाल्स उभारले आहेत. महाराष्ट्रात 'इमले' घ्या असं म्हणायला ही अनेक बांधकाम व्यावसायिकांनी इथं गर्दी केली आहे.

मात्र लोकांची लक्ष वेधून घेतं ते गणपतीच्या मूर्तीं छोटसं दुकानं. गणपतीच्या मूर्ती ही ब-यापैकी दुर्मिळ गोष्टींपैकी एक असल्याने आज दिवसभरात अनेकांनी गणपतीची मूर्ती खरेदी केल्या.

साडया आणि दागिण्याच्या स्टॉल्स जवळ महिला मंडळ रेंगाळताना दिसत होतं. त्यामुळे त्याच्या बरोबर असणारी पुरुष मंडळी थोडी तणावग्रस्तही जाणवत होती, लवकरात लवकर पुढल्या विनामुल्य माहिती देत असलेल्या दालनांकडे वळत होती.

वृत्तांत व छायाचित्र


भागवत सोनवणे

Share
 
Joomla SEO powered by JoomSEF

 
सेवासुविधा