चिंतामण विनायक जोशी : ( १९ जानेवारी १८९२ – २१ नोव्हेंबर १९६३ )

cvjoshiसुप्रसिध्द मराठी विनोदी लेखक. जन्म पुणे येथे. ‘सुधारक’ या पत्राचे संपादक वि. रा. जोशी हे त्यांचे वडील. पुण्याच्या नूतन मराठी विद्यालयात प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण. फर्ग्युसन कॉलेजातून बी.ए. (१९१३), एम्.ए. (१९१६) झाले. पाली भाषेचा विशेष व्यांसग.

आरंभी चार वर्षे सरकारी शिक्षणखात्यात माध्यमिक शिक्षक. पुढे १९२० पासून बदोद्यात नोकरीच्या निमित्ताने वास्तव्य. प्रथम आठ वर्षे बडोदा कॉलेजात पाली, इंग्रजी आणि मराठी या भाषांचे प्राध्यापक. १९२८ पासून बडोदा सरकारचे दप्तरदार. १९४९ मध्ये निवृत. बडोद्याच्या वास्तव्यात गुजराती भाषेशी त्यांचा उत्तम परिचय झाला. तेथील ‘सहविचारिणी सभे’ च्या व निवृत्तीनंतर पुण्यास आल्यावर मराठी साहित्य परिषदेच्या कार्यात सहभाग. बडोद्याच्या ‘सहविचारिणी सभे’ च्या विद्यमाने निघणा-या ‘सहविचार’ ह्या नियतकालिकाचे एक संपादक. ‘अ मॅन्युअल ऑफ पाली सध्दम्मप्पकासिनि’ (संपादन), ‘पाली कंकॉर्डन्स’ (कोश), ‘जातकांतील निवडक गोष्टी… (१९३०)’, ‘शाक्यमुनि गौतम’ (१९३५), ‘बुध्दसंप्रदाय व शिकवण’ (१९६३) , ही त्यांची ग्रंथनिर्मिती त्यांच्या पालीच्या व्यासंगाची द्योतक आहे; पण याहीपेक्षा चाळीसांवर पुस्तके लिहून त्यांनी मराठी विनोदाच्या क्षेत्रात जी कामगिरी बजावली ती विशेष महत्त्वाची होय.

विनोदी लेखनाची प्रेरणा त्यांना कोल्हटकर-गडक-यांच्या कोटित्वयुक्त लेखनातून मिळाली व त्याचा ठसा आपणास त्यांच्या प्रारंभीच्या ‘एरंडाचे गु-हाळ… (१९३२)’ मधील लेखन व ‘चिमणरावांचे च-हाट… (१९३३)’, मधील विवाहविषयक लेख यांवर स्पष्ट दिसतो. या मराठी लेखकांबरोबरच मार्क ट्वेन, डब्ल्यू. डब्ल्यू. जेकब्स, जेरोम के जेरोम, हर्बर्ट जेकिन्स, स्टीफन लीकॉक यांच्या विनोदी लेखनाचे संस्कार त्यांच्यावर झाले.

पूर्वीच्या विनोदकरांप्रमाणे त्यांनीही चिमणराव व गुंडयाभाऊ अशी मानसपुत्रांची जोडगोळी जन्मास घातली आणि तिला विविध लोकव्यवहारांतून फिरवून आणले. पण त्यांच्या चित्रणात अतिशयोक्तीपेक्षा स्वभावोक्तीवर आणि समाजसुधारणेच्या मंडनापेक्षा मानवी स्वभावातील साध्यासुध्या विसंगतींच्या दर्शनावर भर राहिला. त्यांची निवेदनशैलीही मर्मभेदक कोटित्वापेक्षा मार्मिक व स्वभाविक संवादानी नटलेली आहे. त्यामुळ त्यांचे लेखन निबंधरूप होण्या ऐवजी त्याला ललित कथेचा घाट प्राप्त झाला व त्यातून मध्यमवर्गीयांचे एक अस्सल व स्वयंपूर्ण विश्व साकार झाले. वर उल्लेखिलेल्या पुस्तकांशिवाय वायफळाचा मळा’ (१९३६), आणखी चिमणराव (१९४४), ओसारवाडीचे देव (१९४६), गुंडयाभाऊ (१९४७), रहाटगाडगं (१९५५), हास्यचिंतामणी (१९६१), बोरीबाभळी (१९६२), हे त्यांचे विनोदी लेखसंग्रह प्रसिध्द आहेत. ‘चिमराव स्टेट गेस्ट’ ह्या त्यांच्या एका कथेवरुन काढण्यात आलेला ‘सरकारी पाहुण’ हा चित्रपट महाराष्ट्रात विलक्षण गाजला होता.

शिवाजी सावंत : (३१ ऑगस्ट १९४० – १८ सप्टेंबर २००२)

Shivaji Sawant ‘मृत्युंजय’कार शिवाजी सावंत (वय ६२) यांचे बुधवारी सकाळी दि. १८ सप्टेंबर रोजी मडगाव येथे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी कुंदा, मुलगा अमिताभ व कन्या कादंबिनी धारप असा परिवार आहे. त्यांच्या आकस्मिक निधनामुळे साहित्य व कला क्षेत्राला मोठा धक्का बसला.

३१ ऑगस्ट १९४० रोजी कोल्हापूर जिल्ह्यात हिरण्यकेशी नदीच्या तीरावर असलेल्या आजरा या गावी जन्मलेल्या सावंत यांनी कॉमर्स पदविका व बीएच्या दुस-या वर्षांपर्यंत शिक्षण घेऊन कोल्हापूरच्या मुख्य राजाराम हायस्कूलमध्ये १९६२ ते १९७४ पर्यंत जवळपास वीस वर्षे शिक्षकी केली. नंतर त्यांनी परसेवेवर पुण्यात येऊन राज्य सरकारच्या शिक्षण खात्याच्या ‘लोकशिक्षण’ मसिकाचे संपादनही सहा वर्षे केले. त्यानंतर मात्र लेखन व्यवसाय हाच पूर्ण वेळचा व्यवसाय म्हणून स्वीकारला.

विपूल व कसदार लेखन करणा-या शिवाजी गोविंद सावंत यांची केवळ मराठीच नव्हे तर देशातल्या पाच भाषांतील वाचकांना कायम ओळख राहील ती मृत्युंजयकार म्हणून ! महाभारतातील कर्ण या पात्राचा वेगवेगळया अंगाने सहानुभूतीपूर्वक विचार करणा-या मृत्युंजय कादंबरीने सावंत हे नाव गेली साडेतीन तपे प्रत्येक घरात पोहोचवले. ही कादंबरी त्यांनी वयाच्या अवघ्या २५ व्या वर्षी लिहिली. कन्नड, मल्याळम, बंगाली, राजस्थानी, गुजराथी व हिंदी या भारतीय भाषांमध्ये रूपांतर झालेल्या या कादंबरीमुळे त्यांचे नाव सर्वत्र पोहोचले. या खेरीज इंग्रजीमध्येही ती प्रसिध्द झाली. या कादंबरीवर अधारित मराठी व हिंदी नाटकेही रंगमंचावर आली. ‘छावा’ ही संभाजी राजांचे जीवन रेखाटणारी कादंबरी, श्रीकृष्णाच्या चारित्रावर आधारित ‘युगंधर’ ही कादंबरी तसेच ‘मोरावळा’, ‘असे मन असे नमुने’ ही व्यक्तीचित्रे. पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील यांचे चरित्र व शेलका साज, कांचनकण यांसारखे ललितलेख असे भरपूर लिखाण त्यांनी केले.

त्यांच्या कसदार लेखनाला भारतीय ज्ञानपीठाचा ‘मूतिर्देवी’ पुरस्कार. ‘पूनमचंद भुतोडिया’ हा बंगाली पुरस्कार. राज्य सरकारचा ‘साहित्य पुरस्कार’. ‘न. चिं. केळकर पुरस्कार’. ‘ललित पुरस्कार’. गुजराथी रूपांतराला ‘साहित्य अकादमी पुरस्कार’. फाय फाऊंडेशन. आचार्य अत्रे प्रतिष्ठान यांचे पुरस्कार. ‘कोल्हापूर भूषण’ व पुणे विद्यापीठाचा ‘जीवन गौरव’ तसेच राज्य सरकारचा ‘जीवन गौरव’ हे सन्मान. कोथरूड साहित्य संमेलन. बडोदे मराठी साहित्य संमेलन व कामगार साहित्य सम्मेलनांचे अध्यक्षपद. भारत सरकारच्या मानव संसाघन खात्याची साहित्यिक शिष्यवृत्ती असे अनेक सन्मान त्यांना प्राप्त झाले.