मराठी कोश वाड्मय

भौगोलिक शब्दकोश

भूगोल या विषयातील मूळ इंग्रजी शब्दांचे व कल्पनांचे मराठी व हिंदी प्रतिशब्द यात दिलेले आहेत. हा कोश त्रिभाषिक आहे. (इंग्रजी, हिंदी व मराठी या तीन भाषांत).

प्रकाशक – ह. अ. भावे, वरदा प्रकाशन प्रा. लि., ३९७/१ ‘वरदा’, सेनापती बापट रोड, पुणे ४११०१६ फोन – ५६५५६५४, ५६५१८७७

प्रमुख संपादक – र.भा. नाईक

एकूण खंड – एक

पृष्ठ संख्या – २५३

किंमत – रु. १८०

मिळण्याचे ठिकाण – वरदा प्रकाशन प्रा. लि., ३९७/१ ‘वरदा’, सेनापती बापट रोड, पुणे ४११०१६. फोन – ५६५५६५४, ५६५१८७७

ग्रामकोश

मराठीतील एक अपूर्व स्वरूपाचा परंतु फारसा कुणाला माहिती नसलेला कोश म्हणजे ‘ग्रामकोश’. महाराष्ट्रातील सर्व गावांचा कोश करण्याचे काम टिळक महाराष्ट्र विद्यापीठाने हाती घेतले होते. ते काम करण्याची जबाबदारी न.गं.आपटे यांच्याकडे सोपविली गेली. पहिल्या खंडाचे नाव महाराष्ट्र राज्य, मानचित्र संग्रह (जिल्हे व तालुके) असे आहे. या खंडात गावांची नावे, त्यांचे जिल्ह्याचे क्रमांक आणि तालुक्याचे क्रमांक अशी यादी दिलेली आहे. दुस-या खंडाचे नाव महाराष्ट्र राज्य, ग्राम-सूची (आकारविल्हे) असे आहे. दुस-या खंडात तालुक्याचे नकाशे दिलेले आहेत.

हा कोश पाहिल्यावर महाराष्ट्रात वडगाव हे गावाचे नाव सर्वात जास्त ठिकाणांना आहे, असे तुम्हाला आढळेल. नुसत्या पुणे जिल्ह्यात चोवीस वडगावे आहेत. त्यांचे वेगळेपण कळावे म्हणून वडगाव मावळ, वडगाव धायरी , वडगाव शेरी, वडगाव पाटोळे असे म्हणतात. हाच प्रकार लोणी, पिंपरी, खेड वगैरे गावांबाबत सापडतो. पंढरपूर हे गाव तुम्हाला माहिती असेल, पण औरंगाबाद जिल्ह्यातही पंढरपूर असल्याचे फारच थोडयांना माहिती असेल. सासवडजवळ सिंगापूर नावाचे गाव आहे. मात्र या कोशात तुम्हाला नवी नावे सापडत नाहीत. श्रीरामपूर, श्रीपूर, प्रवरानगर, शिवाजीनगर ही नावे सापडणार नाहीत. बेलापूर, बोरगाव, लोणी, भांबुर्डा ही आधीची नावे सापडतील. आता जिल्हे वाढले आहेत, तालुके बदलले आहेत. त्यामुळे या कोशाची सुधारित आवृत्ती काढण्याची गरज आहे.

ग्रामकोशात प्रत्येक गावाचे नाव सापडते, मात्र त्यांची माहिती मिळत नाही. गावांची माहिती देणारा कोश करण्याची गरज आहे.

प्रकाशक – टिळक महाराष्ट्र विद्यापीठ,विद्यापीठ भवन, गुलटेकडी, पुणे ४११०३७ , फोन ४२६४६९९

प्रमुख संपादक – न.गं.आपटे

एकूण खंड – २

पृष्ठ संख्या – पहिला खंड – १२अ२८८, दुसरा खंड – १२अ३२०.

किंमत – रु. ६० पहिला खंड , रु. ५० दुसरा खंड

मिळण्याचे ठिकाण – सध्या उपलब्ध नाही पण चौकशी येथे करावी – टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, विद्यापीठ भवन, गुलटेकडी, पुणे – ४११०३७, फोन -४२६४६९९

लोकसाहित्य शब्दकोश

मराठी ही तुमची-आमची मातृभाषा आहे, त्यामुळे आपल्याला सर्वांना मराठी येते असे आपण म्हणतो. पण आपल्याला खरोखरीच मातृभाषा येते का, असा विचार करून पहा. कारण आपण आईकडून भाषा शिकतो. आपली आई ती भाषा तिच्या आईकडून शिकलेली असणार, तिची आई तिच्या आईकडून, अशा प्रकाराने आईची आई, तिची आई, तिची आई, तिची आई असे करत आपण मराठी भाषा सुरू झाली तिथपर्यंत गेलो तर ‘त्या आईची’ भाषा आपण नक्कीच वापरत नाही. ‘आईपंरपरेने’ आलेले शब्द मात्र आपल्या कानावरून गेलेले असतात. त्यांचा अर्थ माहिती नसला तरी ते शब्द पिढया न् पिढया पुढे सरकत राहिलेले असतात.

उदा. बाळाला तीट लावताना आई ‘अडगुलं मडगुलं, सोन्याच कडगुलं, रुप्याचा वाळा, तान्ह्या बाळा, तीट लावू’ असे म्हणते. पण ‘अडगुलं’, ‘मडगुलं’ आणि ‘कडगुलं’ या शब्दांचा अर्थ आपल्याला माहिती नसतो.खरे म्हणजे हेच आपल्या मातृभाषेतील अस्सल शब्द आहेत. आपण विसरलेल्या अशा ब-याच शब्दांचे अर्थ सांगणारा ‘लोकसाहित्य शब्दकोश’ पाहिल्यावर मात्र या शब्दांचे अर्थ मिळू शकतात. डॉ.सरोजीनी बाबर यांनी महाराष्ट्रातील खेडयापाडयांत हिंडून प्रचंड प्रमाणात लोकगीते, लोकसाहित्य गोळा केले आहे. स्वत: संपादित केलेल्या किंवा इतरांच्या पुस्तकांतील शब्दांचे अर्थ सांगणारा हा कोश आहे.

नाकातून रक्त आले की खेडयातील मुले ‘घोणा फुटला’ असे म्हणतात. हा कोश वापरला तर ‘घोणा’ याचा अर्थ नाक हे तर समजेलच, शिवाय ‘गांजली द्रौपदी गांजली कोणा कोणा पायी पांडवांनी खाली घातल्या घोणा’ अशा ओळीही मिळतील. ‘शिंग वाजतं शिंगनापुरी कर्ना वाजतो कोल्हापुरी’ या ओळी पाहिल्या तर शिंग आणि कर्णा ही वेगवेगळी वाद्ये असल्याचे लक्षात येईल.

‘हारा बाई हरकुलं ‘ यांतील ‘हारा’ शब्द पाहिला तर छोटीशी टोपली घेऊन बोरे गोळा करण्यासाठी निघालेल्या आणि मित्रमंडळींना गोळा करणा-या मुलांचे चित्र डोळयापुढे उभे राहील. अनेक गावांत ‘लेंडीनाला’, ‘लेंडी ओहोळ’ असे लहानसे नाले असतात. हा कोश पाहिल्यावर ‘लेंडीं’ म्हणजे नाला किंवा ओहोळ हा अर्थ कळेल. सह्याद्री पर्वत किंवा पिवळया पीतांबरसारखाच हा प्रकार आहे. मराठमोळा या शब्दासारखाच बामनमोळा असाही शब्द मराठीत असल्याचा शोध लागेल. साडयांमध्ये ‘बादला’ म्हणून प्रकार असतो किंवा ‘बादली’ फेटा हा शब्द वाचण्यात येतो. त्याचा अर्थ समजेल आणि त्याचा पाण्याच्या ‘बादलीशी’ संबंध नाही हे कळेल. लोकगीतातील आणि कहाण्यांतील न कळणारे शब्द घेऊन लोकसाहित्याचा शब्दकोश पाहण्यात फारच मजा येते.

प्रकाशक – महाराष्ट्र राज्य लोकसाहित्य समितीच्या वतीने महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागातर्फे प्रकाशित.

प्रमुख संपादक – डॉ. सरोजिनी बाबर

एकूण खंड – एक

पृष्ठ संख्या – ३९१

मिळण्याचे ठिकाण – महाराष्ट्र लोकसाहित्य समिती, सेंट्रल बिल्डिग,पुणे रेल्वे स्टेशनजवळ, पुणे ४११००१.