बॄहन्महाराष्ट्र मंडळ अधिवेशन मुख्यपान

 

अटलांटा झाली अलंकापुरी


अटलांटा - दि. २ जुलै २००५ तिकडे महाराष्ट्रात माऊलींची पालखी आळंदीहून पंढरपूरकडे निघाली आहे तर इथे अटलांटाची अलंकापुरी पुण्यभूमी झाली आहे. बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या रौप्य महोत्सवी अधिवेशनाचे ठिकाण जॉर्जिया इंटरनॅशनल कन्व्हेशन सेंटरच्या भिंती ज्ञानेश्वर माऊलींच्या ओवींनी भक्तमय झाल्या आहेत.

मोगरा फुलला 
फुले वेचिता बहरी 
कळियांसी आला... 
इवलेसे रोप लावियले द्वारी, 
तयाचा वेलू गेला गगनावरी 
मनचिये गुंती गुंफियला शेला, 
बाप रखुमादेवीवरी विठ्ठला आर्पिला...

तद्वत माऊलींचे पसायदान आणि ज्ञानेश्वरी मधल्या अनेक ओव्यांनी इथलं वातावरण मराठीमय झालं आहे. माधुरी जोशी यांनी बनविलेली संत ज्ञानेश्वरची पर्णकुटी इथले प्रमुख आकर्षण बनले आहे. मुख्य सभागृहात अतिभव्य असा २०० फूट लांब रुंद महाराष्ट्राचा नकाशा तयार केला असून जन्मस्थळांनूसार प्रत्येक जिल्ह्यातील एका सुपुत्रांचं छायाचित्र त्या जिल्ह्याच्या जागेत लावलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांपासून, म. फुले, साने गुरूजी, पुल. देशपांडे, स्वातंत्र्यवीर सावरकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, वि. वा. शिरवाडकर (कुसुमाग्रज) यांची छायाचित्रे लावली आहेत.

प्रवेशद्वारात गणपती, सरस्वती, लक्ष्मी यांची पुजा मांडलेली आहे. उद्यापासून ३ दिवस भरगच्च सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवाणी असून संगिता मयूर यांनी दिगदर्शित केलेली आणि विनिता चंद्रा यांच्या वेशभूषेने सजलेला 'साज संस्कृतीचा' हा नृत्यांचा कार्यक्रम हे उद्याचे खास आकर्षण आहे.

सुनिल गावसकर आणि रघुनाथ माशेलकर हे दोन महाराष्ट्र भूषण आणि मुख्यमंत्र्यांचा ताफा यासह इतर अनेक मान्यवर हजेरी लावणार आहेत.

अटलांटा विमानतळावर आज दिवसभरात २००० हून अधिक मराठी माणसं उतरली. विमानतळाबाहेर उभ्या असलेल्या हॉटेल्सच्या शटल बसेस मराठी माणसांनी ओसंडून वाहत होत्या.

पहिल्या पिढीतले अस्सल मराठी संवाद इथं ऐकू येत होते तर दुसऱ्या पिढीतले बच्चे कंपनी मात्र आपल्या अमेरिकन इंग्रजीचाच वारंवार आधार घेताना दिसत होते. महाराष्ट्रातून आलेल्या मराठी माणसाला या अमेरिकेतल्या नव्या युगाच्या मराठी बच्चे कंपनीबरोबर संवाद साधायला नक्कीच थोडं अवघडल्यासारख होतं.

मोहिन भडकमकर ह्यूस्टन टेक्सास मध्ये जनमलेल्या १६ वर्षाचा युवक याच्याशी गप्पा मारल्या, त्याने ५ वर्षाचा असताना अधिवेशन पाहिलं होतं. आज ९ वर्षांनी पुन्हा या ठिकाणी मॉम ऍन्ड डॅड बरोबर आलाय. प्रश्न मराठीत विचारला तरी उत्तर इंग्रजीतच येणार ही इथल्या नव्या मराठी पिढीची सध्याची स्थिती आहे. एक मात्र खरयं निदान ३ दिवसापुरते का होईना इथलं वातावरण मराठीमय झालयं हे नक्की! आणि मराठी माणसाला मायदेशाची ओढ अजूनही तितकीच आहे हे लगेच जाणवतं.

अजून एक वैशिष्टय म्हणजे अशा अधिवेशनाला पुर्वी पुणे-मुंबई पट्टयातले मराठीजण यायचे आज मात्र विदर्भ, मराठवाडयाशी ऋणाणूबंध असलेली मंडळीही भेटली.

वृत्तांत व छायाचित्र


भागवत सोनवणे

Share
 
Joomla SEO powered by JoomSEF

 
सेवासुविधा