नवीन काय वाचाल? मुख्यपान

 

मानसिक आजार – पालकांसाठी एक उपयुक्त मार्गदर्शिका

Mental Illness Book श्री. अमृत बक्षी यांनी लिहिलेल्या Mental illness and Care-giving challenges, concerns and complications या मूळ इंग्रजी पुस्तकाचा मराठी अनुवाद - "मानसिक आजार-पालकांसाठी मार्गदर्शिका" - कल्याणी गाडगीळ, न्युझीलंड यांनी केला आहे. या पुस्तकाचे प्रकाशन सुप्रसिद्ध मनोविकारतज्ञ डॉ. हमीद दाभोलकर आणि जेष्ठ पत्रकार श्री. विजय बाविस्कर यांच्या हस्ते ‘सा’ च्या रेऊ सभागृहात संपन्न होत आहे. या पुस्तकाचे लेखक श्री.अमृत बक्षी हे स्वत: मानसिक आजार असलेल्या मुलीचे रिचाचे वडील आहेत. पुस्तकाच्या सुरुवातीलाच श्री. बक्षी एक पालक म्हणून त्यांचा आजपर्यंतचा प्रवास सांगताना दुखाने लिहितात -" तिच्या आजाराबाबतचे आमचे संपूर्ण अज्ञान, बेपर्वाइने वागणारे मानसोपचार तज्ञ, त्यांची अनैतिक वागणूक व समाजामध्ये तिच्या आजारासंबंधी असलेली लांछनाची भावना या सर्वच गोष्टीमुळे रिचाचा आजार बळावत गेला". एक पालक म्हणून भोगाव्या लागलेल्या अशा अनेक गोष्टी इतर पालकांच्या वाट्याला येऊ नयेत आणि योग्य वेळी त्यांना आधार व मार्गदर्शन मिळावे या प्रेरणेतूनच श्री बक्षी यांनी हे पुस्तक लिहिले आहे. भारतात मानसिक आजार आणि रुग्णाच्या आजाराच्या वेगवेगळ्या टप्प्यात मार्गदर्शक होईल अशी माहिती भारतीय भाषांमध्ये अन्यत्र अत्यंत त्रोटक स्वरुपात आहे. हे पुस्तक पालक व कुटुंबियांना माहिती देणारे मराठीतील पहिले पुस्तक ठरेल असे वाटते.

 

या पुस्तकात पालकांच्या दृष्टीने महत्वाचे असे अनेक विषय हाताळले आहेत. परंतु सोयीसाठी या पुस्तकाचे चार विभाग पाडलेले आहेत. पहिल्या भागामध्ये परिचय अर्थात निरनिराळ्या मानसिक आजारांचे स्वरूप,लक्षणे,उपचार, ते देताना येणारे अडथळे आणि उपचारांचे साइड इफेक्ट्स इ. मूलभूत गोष्टींविषयी माहिती दिलेली आहे. रुग्णाची काळजी घेताना पालकांना अनेक प्रश्न भेडसावतात. दुसऱ्या विभागात असे अनेक प्रश्न प्रश्नोत्तर स्वरुपात घेतले आहेत. पर्यायी उपचार कितपत उपयुक्त आहेत, रुग्ण हिंसक झाला तर काय करावे, आजारातून रिकव्हरी म्हणजे काय आणि ती कशी टिकवून ठेवावी इ. महत्वाचे विषय प्रश्नोत्तर रूपाने घेतले आहेत. विद्युत उपचार, नकळत केलेले औषधोपचार, सक्तीने केलेले औषधोपचार असे विवाद्य मुद्दे देखील दोन्ही बाजूचे युक्तिवाद (arguments) काय आहेत याचा विचार करून संयमाने हाताळले आहेत. तिसरा विभाग सक्षमीकरणा संबंधी आहे. रुग्णाचे हक्क, मानसिक आरोग्याबाबतचे कायदे, अपंगत्वाचा दाखला असे विविध विषय या भागामध्ये हाताळले आहेत. चौथ्या विभागामध्ये मानसिक आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या सेवाभावी संस्था, या क्षेत्रात दीर्घकाळ काम करणाऱ्या व्यक्ती आणि पालक, महाराष्ट्रातील मनोविकार आणि मानसोपचारतज्ज्ञ यांची नावे आणि संपर्क क्रमांक दिलेले आहेत. अधिक माहिती मिळवून पालकांना रुग्णाला आणखीन चांगल्या प्रकारे मदत करता येईल हा उद्देश या सक्षमीकरण विभागाचा आहे. या चार विभागांमुळे पुस्तकाची उपयुक्तता आणखीनच वाढली आहे. हे पुस्तक पालक आणि कुटुंबियांसाठी माहितीचे केवळ साधन न राहता त्यांना सक्षम करण्यातला एक महत्वाचा टप्पा गाठेल असा विश्वास वाटतो. हे पुस्तक पालकांप्रमाणेच मानसशास्त्राचे विद्यार्थी, मनोविकार तज्ञ, मानसोपचार तज्ञ, सामाजिक कार्यकर्ते या क्षेत्रात काम करू इच्छिणाऱ्या सेवाभावी संस्था आणि त्यांचे कार्यकर्ते अशा सर्वांनाच उपयुक्त आणि संग्रही ठेवण्यासारखे असे आहे. या पुस्तिकेच्या अनुवादिका कल्याणी गाडगीळ यांनी मराठीत अनेक पुस्तके लिहिली आहेत अथवा भाषांतरित केलेली आहेत. स्किझोफ्रेनिया-एक नवी जाणीव या त्यांनी भाषांतरित केलेल्या “सा” च्या पुस्तकाला लोकांकडून मोठा प्रतिसाद मिळाला आहे. कल्याणी गाडगीळ या विषयाशी चांगल्याच परिचित असल्यामुळे त्यांना स्फुरलेल्या एका कवितेने मी शेवट करतो. हे पुस्तक पालकांना कुठे घेऊन जाऊ शकेल हीच भावना या ओळीत व्यक्त केलेल्या आहेत. व्याधी मनाच्या लहान मोठ्या, आदि न कळत, न कळे पार, साहणे मुळी सोपे नाही, नाही होणे वड-आधार दुस्तर, काळा घाट हा जरी, प्रकाश निश्चित करता पार, मार्गदर्शना सिद्ध हाती हे, पुस्तकरूपी अनुभवसार - १ समजुनी घेऊ आजार आपण, जाणू औषधी अन् उपचार, मुक्तपणाने बोलू यावर, कलंक टाकू पुसुनी पार, पालक सगळे गुंफू हाता, मदतीसाठी करू करार पाल्य आपुले इतरांसम हो, पूल आशेचा अपरंपार - २

 

पुस्तक - मानसिक आजार – पालकांसाठी एक उपयुक्त मार्गदर्शिका
लेखक - अनिल वर्तक

Share
 
Joomla SEO powered by JoomSEF

 
सेवासुविधा