साहित्यिक मुख्यपान

 

शिवाजी सावंत : (३१ ऑगस्ट १९४० - १८ सप्टेंबर २००२)


'मृत्युंजय'कार शिवाजी सावंत (वय ६२) यांचे बुधवारी सकाळी दि. १८ सप्टेंबर रोजी मडगाव येथे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी कुंदा, मुलगा अमिताभ व कन्या कादंबिनी धारप असा परिवार आहे. त्यांच्या आकस्मिक निधनामुळे साहित्य व कला क्षेत्राला मोठा धक्का बसला.

३१ ऑगस्ट १९४० रोजी कोल्हापूर जिल्ह्यात हिरण्यकेशी नदीच्या तीरावर असलेल्या आजरा या गावी जन्मलेल्या सावंत यांनी कॉमर्स पदविका व बीएच्या दुस-या वर्षांपर्यंत शिक्षण घेऊन कोल्हापूरच्या मुख्य राजाराम हायस्कूलमध्ये १९६२ ते १९७४ पर्यंत जवळपास वीस वर्षे शिक्षकी केली. नंतर त्यांनी परसेवेवर पुण्यात येऊन राज्य सरकारच्या शिक्षण खात्याच्या 'लोकशिक्षण' मसिकाचे संपादनही सहा वर्षे केले. त्यानंतर मात्र लेखन व्यवसाय हाच पूर्ण वेळचा व्यवसाय म्हणून स्वीकारला.

विपूल व कसदार लेखन करणा-या शिवाजी गोविंद सावंत यांची केवळ मराठीच नव्हे तर देशातल्या पाच भाषांतील वाचकांना कायम ओळख राहील ती मृत्युंजयकार म्हणून ! महाभारतातील कर्ण या पात्राचा वेगवेगळया अंगाने सहानुभूतीपूर्वक विचार करणा-या मृत्युंजय कादंबरीने सावंत हे नाव गेली साडेतीन तपे प्रत्येक घरात पोहोचवले. ही कादंबरी त्यांनी वयाच्या अवघ्या २५ व्या वर्षी लिहिली. कन्नड, मल्याळम, बंगाली, राजस्थानी, गुजराथी व हिंदी या भारतीय भाषांमध्ये रूपांतर झालेल्या या कादंबरीमुळे त्यांचे नाव सर्वत्र पोहोचले. या खेरीज इंग्रजीमध्येही ती प्रसिध्द झाली. या कादंबरीवर अधारित मराठी व हिंदी नाटकेही रंगमंचावर आली. 'छावा' ही संभाजी राजांचे जीवन रेखाटणारी कादंबरी, श्रीकृष्णाच्या चारित्रावर आधारित 'युगंधर' ही कादंबरी तसेच 'मोरावळा', 'असे मन असे नमुने' ही व्यक्तीचित्रे. पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील यांचे चरित्र व शेलका साज, कांचनकण यांसारखे ललितलेख असे भरपूर लिखाण त्यांनी केले.

त्यांच्या कसदार लेखनाला भारतीय ज्ञानपीठाचा 'मूतिर्देवी' पुरस्कार. 'पूनमचंद भुतोडिया' हा बंगाली पुरस्कार. राज्य सरकारचा 'साहित्य पुरस्कार'. 'न. चिं. केळकर पुरस्कार'. 'ललित पुरस्कार'. गुजराथी रूपांतराला 'साहित्य अकादमी पुरस्कार'. फाय फाऊंडेशन. आचार्य अत्रे प्रतिष्ठान यांचे पुरस्कार. 'कोल्हापूर भूषण' व पुणे विद्यापीठाचा 'जीवन गौरव' तसेच राज्य सरकारचा 'जीवन गौरव' हे सन्मान. कोथरूड साहित्य संमेलन. बडोदे मराठी साहित्य संमेलन व कामगार साहित्य सम्मेलनांचे अध्यक्षपद. भारत सरकारच्या मानव संसाघन खात्याची साहित्यिक शिष्यवृत्ती असे अनेक सन्मान त्यांना प्राप्त झाले.

Share
 
Joomla SEO powered by JoomSEF

 
सेवासुविधा