नवीन काय वाचाल? मुख्यपान

 

स्मित अंताक्षरी

मराठी शब्दकोशात 'ळ' अथवा 'ण' ने सुरू होणारे शब्द नसतात. कारण मराठी भाषेत तसे शब्द नाहीतच! अशा स्थितीत कवितेच्या अथवा गाण्याच्या 'भेंडया' खेळाणा-यांना या अक्षराने सुरू होणा-या गीतांची चणचण भासणे स्वाभाविकच आहे. अशी वेळ आली की 'ळ' ऐवजी 'ल' आणि 'ण' ऐवजी 'न' हे अक्षर घेऊन पुढे खेळ चालू ठेवला जातो. 'ण' ऐवजी 'न' च का बरं? असं आढळतं की, अनेक मराठी भाषिक, 'माणसे' ऐवजी 'मानूस', 'पाणी' ऐवजी 'पानी', 'गोणपाट' ऐवजी 'गोनपाट' असे शब्द वापरतात. मुळात संस्कृत भाषेत 'ळ' हा वर्ण नाही. मात्र संस्कृतच्या पूर्वीच्या, तिची माता असलेल्या वैदिक भाषेत तो आहे. हा 'ळ' उच्चारायला थोडा कठिण असल्याने वैदिकांनीच मृळीक ऐवजी मृडीक, मृळानी ऐवजी मृडानी असे शब्द वापरून 'ळ' चे स्थान 'ड' ला दिलेले आढळते. 'ळ' ऐवजी 'ड' वापरण्याची सवय आजही खानदेशी नागरिकांमध्ये आहे. त्यामुळेच जळगावचे जडगाव, नळावर ऐवजी नडावर असे उच्चार तिथे ऐकायला मिळतात.

'ळ'ने व 'ण'ने सुरू होणारे शब्दच भाषेत नसल्याने या अक्षरांनी सुरू होणारी गीते मिळत नाहीत हे ठीक. परंतु केवळ 'ळ' अथवा केवळ 'ण' हीच अक्षरे तेवढी प्रारंभी घेऊन गेय रचनाच करता येणार नाहीत कां? येतील! ह्या रचना करता येतील आणि मग कवितेच्या शेवटचे अक्षर 'ळ' किंवा 'ण' आले तरी त्यांच्याऐवजी 'ल' किंवा 'न' हे अक्षर घ्या असे म्हणण्याची वेळ येणार नाही, अशी एक 'गंमत' सौ. स्मिता आपटे यांनी इथे करून दाखविलेली आहे. ज्या शब्दांमध्ये 'ळ' हे अक्षर आहे असे काही शब्द घेऊन, त्या शब्दांचे सार्थ स्पष्टीकरण करणा-या रचना त्यांनी केल्या आहेत.

कवळ:- 'ळ' शेवटी अक्षर.
व मध्ये क तसाची पहिल्याने
घास मुखी घेताना
गावे प्रभूला शांत चित्ताने

हळद:- 'ळ' हे मध्ये अक्षर
द हे शेवटी ह तसाच पहिल्याने
रोजच सतेज कांती
निर्जंतुकता नित्य लेपनाने

शहाळ:- ळ हे अंती अक्षर
हा मध्ये श तसाच पहिल्याने
देवाची किमयाही
शेंडयावरती भरून पाण्याने

'ळ' च्या आणि 'ण', 'ट' वगैरेंच्याही अनेक रचना पुस्तकात वाचायला मिळतील. एका अर्थाने त्या साचेबंद आहेत. त्या सर्व आर्या वृत्तात रचलेल्या आहेत. पण असा साचा तयार करण्याची कल्पना सौ. स्मिता आपटे यांना सुचली हेच तर त्याचे इतर अनेकांपासून वेगळेपण! स्वत:लाच साक्षात्कार झाल्यावर, भेंडयांमध्ये उपयोगी पडाव्या या दृष्टीने अन्यही अक्षरांनी सुरू होणा-या व विशिष्ठ अक्षरांनी अंत साधणा-या रचना त्यांच्याकडून सहज घडत गेल्या आहेत. त्या सर्वांचा अंतर्भाव करून आर्या वृत्तातील गेय लघुपद्यांचा एक चांगला संग्रह त्यांनी आपल्याला दिला आहे. अशा अनेक अधिक रचना करण्याची स्फूर्ती वाचकांना देण्याचे सामर्थ्य या रचनांमध्ये आहे. सौ. आपटे यांच्या मनीचा हेतू अगदी स्पष्ट आहे. तो आहे भेंडयांच्या खेळातील विशेषत: 'ळ' आणि 'ण' ची अडचण दूर करणे आणि या खेळात एक विशेष मौज निर्माण करणे, तो नक्कीच साध्य होईल. शिवाय फुरसतीच्या वेळात, प्रवासात गंमत म्हणून का होईना, म्हणजेच मनोरंजनासाठी या रचना रसिकांना वाचनीय वाटतील यात शंकाच नाही. शेवटी असेच म्हणता येइल -
ळ चे भाग्य उदेले, त्यास मिळे हे प्रथम स्थान येथे
भेंडया खेळत असता, आजवरी जे दुर्लक्षित होते!
डॉ. म.बा.कुलकर्णी

स्मित अंताक्षरी
- सौ.स्मिता आपटे
किंमत - रु.६०/- मात्र

Share
 
Joomla SEO powered by JoomSEF

 
सेवासुविधा