नवीन काय वाचाल? मुख्यपान

 

सृजन@broad

'सृजन@broad' हे आहे नुकत्याच प्रकाशित झालेल्या कवितांच्या पुस्तकाचे आगळेवेगळे नाव. या कविता म्हणजे विविध खंडातील अनेकविध देशांमध्ये स्थायिक झालेल्या मराठी भाषिकांच्या भावना आणि अनुभवांचे कलात्मक सृजन होय.

या पुस्तकाची मूळ संकल्पना डॉ. भूषण केळकर यांची. 'स्वदेश-आम्ही मराठी NRI' हे त्यांचे सध्या अत्यंत गाजत असलेले पुस्तक. केळकरांनी जगभर विखुरलेल्या मराठी भाषिकांना कविता पाठविण्याचे आव्हान केले. जगभरातून आलेल्या ३०० कवितां मधून ७५ सर्वोत्कृष्ट कवितांची निवड करण्याचे काम प्रख्यात कवयित्री डॉ. अरूणा ढेरे व तरूणाईच्या गळयातील ताईत कवी श्री. संदीप खरे यांनी केले. या काव्यसंग्रहात निवडलेल्या १५ देशातील ५५ कवी-कवयित्रींच्या असून त्यातील विषयांमध्ये विविधता असूनही सर्व कवितांना 'मराठीचा वास' आहे. हा काव्यसंग्रह काँटिनेन्टल प्रकाशन ने १२ एप्रिल २००८ रोजी सुप्रसिध्द कवि श्री. सुधीर मोघे यांच्या शुभहस्ते पुण्यात प्रकशित केला.

या पुस्तकाचे आणखी वैशिष्टय म्हणजे हे पुस्तक 'बहुमाध्यमी' आहे. छापील पुस्तकाबरोबरच निवडक कवितांची सी.डी. या पुस्तकामध्ये समाविष्ट केलेली आहे. या सी.डी. मध्ये कवितांचे अभिवाचन केले आहे डॉ. अरुणा ढेरे व श्री. संदीप खरे यांनी. या दृष्टीने हे बहुमाध्यमी कवितांचे पुस्तक आत्ता तरी मराठी भाषेत 'एकमेव' आहे. या सीडीला कार्पोरेट स्पॉन्सरशिप दिली आहे बांधकाम क्षेत्रातील अग्रगण्य व्यावसायिक 'परांजपे स्कीम्स'च्या श्री. शंशाक परांजपे व श्री. हेमंत छत्रे यांनी.

यातील कवितांच्या विषयामध्ये विविधता आहे. निसर्ग, प्रेम या कवितांच्या हुकुमी विषयांबरोबरच दूरदेशी राहून मायदेशाची वारंवार येणारी आठवण, घरच्या मायेची ओढ, ग्लोबलायझेशनचे चांगले वाईट परिणाम, परदेशात राहिल्यामुळे मराठी भाषेतील बारकावे टिपतांना मुलांची होणारी गंमत असे अनेकविध विषय या कवितांमधून अनुभवता येतात. सर्व कविता मराठीत असल्यातरी अहिराणी भाषेतली कविता, कॉम्प्यूटर क्षेत्रातले तसेच जेनेटेक इंजिनिअरींग मधले इग्रंजी शब्द वापरून केलेले मराठी अशी 'भाषांतर्गत' विविधताही या कवितांमध्ये आढळते. मुक्तछंद, फटका, ओवी यांसारख्या विविध छंदातल्या कविता, तसेच विशिष्ट ठेका धरून म्हणता येण्याजोग्या कविता असे या पुस्तकाचे अंतरंग बहुरंगी, बहुढंगी आहे.

कवितेच्या पुस्तकाची पहिली आवृत्ती प्रकाशनाच्या तारखेपासून महिन्याच्या आत संपल्यामुळे दुसरी आवृत्ती लगेच काढायला लागणे हे या पुस्तकाचे विक्रमी यश म्हटले पाहिजे.
पुस्तकाची किंमत १२५ रूपये असून प्रकाशकांचा पत्ता खाली दिलेला आहे.

प्रकाशक - देवयानी कुलकर्णी-अभ्यंकर,
काँटिनेन्टल प्रकाशन,
विजया नगर, पुणे - ४११०३०
फोन क्रमांक - २४३३७९८२
हा ई-मेल स्पँमबॉट्स पासुन् सुरक्षित आहे. हा बघण्यासाठि जावास्क्रिप्ट सक्रिय करा.

Share
 
Joomla SEO powered by JoomSEF

 
सेवासुविधा