नवीन काय वाचाल? मुख्यपान

 

टिम टिम टिंबक टू

'टिम टिम टिंबक टू' हा एक सुंदर, रंगीत व आकर्षक बालकविता संग्रह आहे. या संग्रहात एकूण १९ कविता आहेत. प्रत्येक कवितेला सुंदर रंगीत चित्र आहे. मुख्य म्हणजे यातील प्रत्येक कविता लहान मुलांनाच नव्हे तर त्यांच्या पालकांनाही आक‍र्षित करणारी आहे.

सर्वच कविता साध्या सोप्या व सहज पाठ होणा-या तर आहेतच पण त्या कवितांमधुन मुलं आपोआप काहीतरी शिकत जातात. कवितांचे विषय मुलांच्या रोजच्या जीवनाशी निगडीत असणारे आहेत तर कधी मुलांना त्यांच्या बालविश्वात पडणारे प्रश्न ते कवितांमधून विचारतांना दिसतात.

''आई जरा इकडे ये , तू सुध्दा बघ ना
कपाटातली चिमणी किती खरीखुरी वाटते नं! " यासारखे किंवा
''आई माझी सावली सांग आई कशी दिसते ,
नाक डोळे तोंड तिला काहीच कसे नसते ?''

काही कवितांमधुन मुलं त्यांच्याही नकळत शिकत जातात.
''एक हरीण त्याचं पाडस दिसतय पहा किती गोंडस '' याप्रमाणे किंवा
''एक बोट हाताचे, तोडांवरती ठेवायचे डोळे मिटून गुपचूप देवासारखे बसायचे'' या बोटांच्या कवितेतून हातांच्या बोटांचा उपयोग कसा कसा करता येतो हे वयाच्या अनुभवांना लक्षात घेऊनच दाखवला आहे.

काही कवितांमधील अनुभव मुलांना स्वत:चे अनुभव वाटावे असे आहेत तर काही कवितांमधुन फॅण्ट्सीद्वारे मुलांच्या मनापर्यंत पोचण्याचा प्रयत्न केला आहे. 'असे कोणी करतात का?', 'गोडोबा', 'बाळकोबा', 'चिमणी', 'बागेतले मित्र', 'ढगांची शाळा' असे मुलांना आवडणारे व सहज समजणारे विषय यात आहेत.

पुस्तकातील कवितांचे विविध विषय, त्यातील सुंदर रंगीत चित्रं, गुळगुळीत आर्ट पेपर इ. तर आहेतच शिवाय मुलांना हौस वाटेल आणि काहीतरी स्वत: करायला ते प्रवृत्त व्हावेत म्हणून मुद्दाम काही चित्रं मुलांना रंगविण्यासाठी ठेवली आहेत. 'मनातली मज्जा'द्वारे कवयित्रीने मुलांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला आहे व त्यांच्याशी 'जयू मावशी'चे जवळकीचे नाते सुध्दा प्रस्थापित केले आहे. हे पुस्तक प्रत्येक घरासाठी संग्राहय तर आहेच परंतु आपल्या आजूबाजूच्या लहान मुलांना, आपल्या भाचे, पुतणे, नातवंड - पंतवंड, मुलं कोणालाही केव्हाही भेट द्यायला नक्कीच खूप औचित्यपूर्ण ठरेल.

प्रकाशक - जयश्री पाठक
टिम टिम टिंबक टू
किंमत रु.६५/-

Share
 
Joomla SEO powered by JoomSEF

 
सेवासुविधा