नवीन काय वाचाल? मुख्यपान

 

वनातील वृक्षवेली

वनस्पतिशास्त्र हया विषयात वन - उपवनामधील वनस्पती ओळखता येणं या कलेला अनन्य साधारण महत्व आहे. पुस्तक वाचून घोकून परीक्षा देणा-या या विषयाच्या विद्यार्थ्यांचा प्रात्याक्षिकाच्या परीक्षेत या महत्वाच्या कलेत प्रावीण्य न मिळवल्यामुळे शुन्यावर त्रिफळा उडतो. प्रत्यक्ष वनस्पती ओळख (Field Botany) होण्यासाठी वनस्पतीशास्त्रात फ्लोरा (Flora) नावाचे ग्रंथ अतिशय शास्त्रशुध्दरीत्या लिहिलेले असतात आणि या प्रकारच्या जवळजवळ सर्व पुस्तकांमध्ये वनस्पतीचं चित्र औषधालाही नसतं असं का याचं उत्तर वनस्पती शास्त्रज्ञांशिवाय कदाचित ब्रम्हदेव देऊ शकेल की काय कोण जाणे?

श्री.शा.प्र. दीक्षितांनी Field Botany मधली ही त्रुटी मोठया हुशारीनं टिपली. फील्ड बॉटनीतला व्यासंग दीक्षितांनी वनाधिकारी झाल्यानंतर जोपासला. पण वनस्पतीशास्त्रात स्नातक नसलेल्या या वनाधिका-यानं एकापेक्षा एक सरस आणि उपयुक्त पुस्तकं लिहिली आहेत. सांप्रत पुस्तक हे आतापर्यंतच्या लिहिलेल्या पुस्तकांच्या वास्तुवर त्यांनी चढवलेला कळस आहे. हा कळस चढवण्याची कारागिरी करताना दीक्षितांना पंडित सोनावणीसारख्या चित्रकर्मीच्या समर्पक, मार्मिक आणि शास्त्रशुध्द अशा चित्रांचा मोठाच हातभार लागलेला आहे. पंडित सोनवणींनी आपल्या समर्थ कुंचल्यानं हे पुस्तक साकारलं आहे. वनस्पतीची ओळख सुरू करण्यापूर्वी लेखकानं पानं, फुलं, फळं यांचा प्रकार, ठेवण, आकार इत्यादींच्या सहाय्यानं वनस्पती कशा वर्गीकृत कराव्यात याची माहिती वजा एक जंत्रीच दिली आहे. ही कला आत्मसात करण्यासाठी या माहितीचा मोठाच उपयोग होतो. वनप्रेमींना उद्देशून हे पुस्तक लिहिलेले असले तरी आजकालच्या जमान्यात निसर्गप्रेम हे अत्यावश्यक आहे. हे अगदी शिशुंपासून शिक्षणात बिंबवले जात आहे. या पुढची पिढी ही नि:शय निसर्गप्रेमींच राहील आणि वनस्पतीची ओळख ही निसर्गप्रेमींसाठी पायाभूत गरज आहे. निसर्गप्रेमींनी संग्रही ठेवलंच पाहिजे, असं हे पुस्तक आहे. अर्थातच प्रत्येक व्यक्तीच्या (किंवा कुटुंबाच्या ) संग्रही हे पुस्तक पर्यावरण प्रेम टिकवून ठेवण्यासाठी असणं हे जरूरीचं आहे.

शब्दांकन - श्रीकांत थत्ते
पुस्तक - वनांतील वृक्षवेली
देणगी मुल्य - ८०/-
लेखक - श्री. शा.प्र.दिक्षित
प्रकाशक - काँटिनेंटल प्रकाशन, पुणे

Share
 
Joomla SEO powered by JoomSEF

 
सेवासुविधा