साहित्यिक मुख्यपान

 

वसंत बापट (२५ जुलै १९२२ - १७ सप्टेंबर २००२ )


प्रा. बापट यांचा जन्म २५ जुलै १९२२ रोजी सातारा जिल्ह्यातील क-हाड येथे झाला. तर महाविद्यालयीन शिक्षण पुण्याच्या स. प. महाविद्यालयात झाले (१९४८). त्यानंतर मुंबईतील 'नॅशनल कॉलेज' आणि 'रामनारायण रुईया कॉलेज' ह्या महाविद्यालयांतून मराठी आणि संस्कृत ह्या विषयांचे प्राध्यापक होते. १९७४ पासून मुंबई विद्यापीठातील गुरुदेव टागोर अध्यासनाचे प्राध्यापक होते. साहित्य अकादमीचे सदस्य होते. प्रा. बापट हे स्वातंत्र्य चळवळीतही सहभागी झाले होते. १९४२ च्या 'चले जाव' चळवळीत त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती, ऑगस्ट १९४३ ते जानेवारी १९४५ पर्यंत ते तुरूंगात होते. १९४७ ते १९८२ पर्यंत ते मुंबई विद्यापीठात प्राध्यापक होते. १९८३ ते १९८८ पर्यंत ते सा. 'साधना'चे संपादक होते. राष्ट्रसेवा दलाशी ते संलग्न होते. १९७२ साली मुंबईत भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.

लहानपणापासून बापटांवर राष्ट्र सेवा दलाचे आणि साने गुरुजींच्या सहवासाचे संस्कार झाले. 'बिजली' (१९५२) ह्या त्यांच्या पहिल्या काव्यसंग्रहावर ह्या संस्कारांचा प्रभाव स्पष्टपणे जाणवतो. 'अकरावी दिशा' (१९६२),'सकीना' (१९७२), आणि 'मानसी' (१९७७), हे त्याचे बिजलीनंतरचे काव्यसंग्रहातून त्यांच्या अनुभवांचे क्षेत्रही उत्त्तरोत्तर अधिकाधिक विस्तारत गेल्याचे दिसते. संस्कृत, बंगाली आणि इंग्रजी कवितेचा प्रभावही ह्या कवितेवर दिसून येतो. सामाजिक विषमता आणि अन्याय ह्यांच्या तीव्र जाणिवे बरोबरच यौवनाचा अभिजात डौल, निसर्गाच्या विभ्रम-विलांसाहून खटयाळ शृंगार व्यक्तविण्याची प्रवृत्ती, लावणीसारख्या जुन्या काव्यप्रकाराचे पुनरुज्जीवन करण्याचा रसिक प्रयत्न ह्यांच्या प्रत्यय त्यांच्या बिजलीनंतरच्या कवितेत येतो. त्यांच्या कवितेचे परिपक्व रुप मानसीमध्ये विशेषत्वाने जाणवते. ह्या काव्यसंग्रहातील त्यांची कविता मितभाषी; परंतु आशयदृष्टया अधिक गहन अशी आहे.

जनजागृति करणे हेही कवितेचे एक महत्त्वाचे कार्य आहे, असे बापट मानत असल्यामुळे राष्ट्रीय संकटाच्या, दु:खाच्या वा देशातील विविध जन-आंदोलनांच्या प्रसंगी त्यांनी आपली संवेदनशील प्रतिक्रिया आपल्या कवितेतून व्यक्तविली आहे. 'उत्तुंग आमुची उत्तर सीमा इंच इंच लढवू' ही त्यांची गाजलेली कविता किंवा त्यांनी रचिलेला 'संयुक्त महाराष्ट्राचा पोवाडा' हि त्याची काही उल्लेखानीय उदाहरणे होत. 'गांधींची जीवनयात्रा' (१९४८), 'नव्या युगाचे पोवाडे' (भाग १ ते ३), 'सैन्य चालले पुढे' (१९६५), ह्या त्यांच्या रचनाही या संदर्भात निर्देशनीय आहेत.

संस्कृतातील अभिजातता आणि नादवती शब्दकळा; बंगालीतील, विशेषत: गुरुदेव टागोरांच्या कवितेतील-मानवतावाद आणि इंग्रजी कवितेतील स्वच्छंदवादी प्रवृत्ती ह्यांचे ठळक संस्कार बापटांच्या कवितेत झालेले दिसतात. बापटांची अस्सल रसिकता आणि अतींद्रिय प्रतिमासृष्टी हेही त्यांच्या कवितेचे विशेष लक्षणीय पैलू होत. बारा गावचे पाणी (१९६७) हा बापटांचा प्रवासवर्णनपर ग्रंथ. बापटांच्या रसिक मनाने भारताचा निसर्ग, चालिरीती, लोककला, देशानिक प्रगतीच्या दिशेने होत असलेली त्याची वाटचाल ह्यांचे जे दर्शन घडले, त्याचे प्रत्ययकारी चित्रण हया ग्रंथात त्यांनी केले आहे.

त्यांच्या एका काव्यसंग्रहाला साहित्य पुरस्कार मिळाला आहे. 'बिजली', 'सेतू', 'अकरावी दिशा', 'सकिना', 'मानसी', 'शिंग फुंकिले रणी', 'शूर मर्दावा पोवाडा', 'तेजसी', 'राजसी', 'प्रवासाच्या कविता', प्रसिध्द आहेत. 'बारा गावचं पाणी ' हे प्रवासचित्र, 'जिंकुनि मरणाला' हे व्यक्तिदर्शन, 'तोलनिक साहित्याभ्यास' ही समीक्षा, तर 'विसाजीपंताची बखर' ही राजकीय उपहास प्रसिध्द आहेत. वसंत बापट, मंगेश पाडगावकर आणि विंदा करंदीकर यांच्या संयुक्त काव्यदर्शनाचे अर्ध शतकाहून अधिक काळ देशभरात कार्यक्रम झाले. १९६९ मध्ये त्यांनी युगोस्लोव्हियातील आंतरराष्ट्रीय कविसंमेलनात भारताचे अधिकृत प्रतिनिधी म्हणून सहभाग घेतला. १९७७ आणि १९९३ मध्ये आखाती देशात त्यांच्या काव्यदर्शनाचे कार्यक्रम झाले. सामाजिक, वाङमयीन आणि सांस्कृतिक क्षेत्रातील अनेक विषयांवर महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेर त्यांची व्याख्याने झाली. साहित्य अकादमीच्या कार्यकारिणीवर ते १० वर्षे होते. याशिवाय इंडियन इन्स्टिटयूट ऑफ मास कम्युनिकेशन्स दिल्ली या संस्थेचे ते अनेक वर्षे सदस्य होते.

'चंगामंगा', 'अबडक तबडक', 'आम्ही', 'गरगर गिरकी', 'फिरकी', 'फुलराणीच्या कविता', 'परीच्या राज्यात' या त्यांनी लिहीलेल्या बालकविता. सेतु ह्या काव्यसंग्रहास व लहान मुलांसाठी त्यांनी लिहिलेल्या बाल-गोविंद (१९६५) ह्या नाटकास महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार लाभला. साहित्याभ्यास (१९८१) हा त्यांचा अगदी अलिकडील ग्रंथ. संगीत, अभिनय, लोककला. ह्यांची उत्तम जाण बापटांच्या ठायी आहे. राष्ट्रसेवा दलातर्फे त्यांनी सादर केलेल्या 'महाराष्ट्र दर्शन', 'भारत दर्शन' ह्यांसारख्या यशस्वी कार्यक्रमातून तिचा प्रत्यय येतो.

Share
 
Joomla SEO powered by JoomSEF

 
सेवासुविधा