MarathiWorld - HomeServices
About Us About Marathi World Suggest a site Feedback Contact Site Map

'वृक्षवेध' वेगळी गुप्तहेरकथा

vrukshaved वनस्पतींवर गाढ प्रेम करणारे शा.प्र.दीक्षित यांनी लिहिलेले 'वृक्षवेध' वाचण्यासाठी हाती घेताना वृक्षांसंबंधी काही नक्की माहिती देणारे पुस्तक असा समज होता, कारण आजवरची त्यांची पुस्तके (असे वृक्ष असे देव, वृक्षनारायण इ.) त्याच विषयावरची होती. पण पुस्तकाची सुरूवात होती ती एखाद्या कथा - कादंबरीप्रमाणे आणि लवकरच ती गुप्तहेर कथेप्रमाणे पकड घेऊ लागते. कथानायक अशोक हा खाजगी गुप्तहेर साग वृक्षाच्या लागवडीत फसवणूक करून फरारी होणा-या गुन्हेगाराचा केवळ रूद्राक्षाचा उपयोग डाऊझिंगसाठी करून भारतात बसल्या जागेवरून वेध घेऊन जिनिव्हातील अचूक ठिकाण सापडून देतो. पुढे वृक्षाच्या ठायी असलेल्या अंतद्रिय शक्तीचा उपयोग करून चंगप्पासारख्या चंदनचोराला नेस्तनाबूत करतो. हातातील प्रत्येक केस सोडवताना तो आणि त्याची कार्यक्षम पत्नी कम सरकारी (जाई) वनस्पतींच्या विविध गुणांचा फायदा घेतात. हे सर्व वाचत असताना वृक्षांच्या अदभूत शक्तीची तपशीलवार माहिती वाचकाला होत जाते. ही माहिती मिळत असताना कधी लांबलचक निवेदने रसभंग करीत असली तरी मिळणारी माहिती महत्वाची ठरते. किंबहूना कथानकातील उपकथानके गुंफताना वाचकाला वनस्पतीबद्दलची तपशीलवार माहिती पुरवायची हे धोरण ठेवूनच लेखकाने प्रसंगाची गुंफण केलेली जाणवते. ओघवत्या कथानकातून अदभूत निसर्गाचे ज्ञान वाचकांपर्यंत पोहचवण्याचे लेखकाचे कसब छान आहे.
कथानकातील संदर्भावरून ते पुढील शतकाच्या सुरूवातीस घडत असावे हे जाणवते. अगदी अलीकडे होऊन गेलेल्या व्यक्तीऐवजी काल्पनिक नावे का वापरली हे समजत नाही. सर्वत्र लागेबांधे असलेला चंदनचोर सांकेतिक पध्दतीने पकडला जाणार नाही. हे गर्भितपणे सूचित करताना लेखकाने त्यासाठी अपारंपारिक पध्दतीचा वापर सुचविला आहे. पण चंगप्पाच्या हत्येचा सर्वोच्च बिंदू हवा तेवढा थरारक वाटला नाही. वनस्पतीच्याच सहाय्याने वनस्पती हत्यारांचा शोध म्हणजे काटयानेच काटा काढण्याचा प्रकार आहे.

- दिगंबर गाडगीळ

पुस्तक :- 'वृक्षवेध' वेगळी गुप्तहेरकथा
देणगी मुल्य :- ७०/-
लेखक :- श्री. शा.प्र.दिक्षित
प्रकाशक - मानसन्मान प्रकाशन

पुस्तक खरेदीसाठी येथे क्लिक करा