वादन

पारंपारिक वाद्य

शास्त्रीय गायक

सनई

sanai आपल्या घरात कोणतेही मंगल कार्य असले की, आपण प्रथम ‘सनई’ लावतो. sanai‘सनई’ हे मंगल वाद्य म्हणून ओळखले जाते. ‘सनई’ हे वाद्य वेगवेगळ्या प्रांतात वेगवेगळ्या नावांनी प्रसिद्ध आहे. फार प्राचीन काळापासून हे वाद्य वाजवले जाते. उत्तरेकडे ‘शहनाई’ म्हणून हे वाद्य प्रचलित आहे. पूर्वी सनई हे वाद्य ‘सुनारी’ या नावांने ओळखले जाते होते; परंतु अलीकडे ते ‘सनई’ या नावाने ओळखले जाते.

सनई हे वाद्य वापरण्यास अत्यंत सोपे आहे. या वाद्यचा आकार लांबट नळीसारखा असतो. सागवान शिसव यांसारख्या टिकाऊ लाकडापासून सनई हे वाद्य बनवलेले असते. वरचा भाग तोंडाने वाजवायचा असतो. मधला भाग फुगीर व पोकळ आणि खालचा भाग निमुळता, गोलाकार व धोत्र्याच्या फुलासारखा असतो. सनई या वाद्याचे असे तीन भाग असतात. वरचा भाग तोंडात धरून त्यात फुंकर घालून हे वाद्य वाजवतात. या वाद्याला मध्यभागी ७ छिद्रे असतात. हे वाद्य वाजवताना या छिद्रांवर बोटांच्या मदतीने दबाव आणला असता सनईतून स्वर उमटतात. सनई हे वाद्य वाजवताना दोन क्रिया एकाच वेळी करावयाच्या असतात. तोंडाने सतत फुंकर घालणे व त्याचबरोबर हातांची बोटे वाद्यावर असलेल्या छिद्रांवर ठेवून ध्वनी उत्पन्न करतात. प्रदीर्घ श्वास व अचूक स्वरस्थानांवर हातांच्या बोटांची होणारी लयबद्ध हालचाल यांच्या मिलापामुळे ‘सनई’ चे स्वर सुमधुर उमटतात.

‘सनई’ ऐकतांना रसिकवर्ग धुंद होऊन जातो. तसेच ठुमरी, दादरा, लोकगीत, ख्याल, चित्रपटगीत यांतील गाण्यांत सनईचे सूर असतात. उद्घाटन सोहळा, स्वागत-समारंभ, लग्न, मुंज अशा विविध कार्यक्रमांच्या वेळी सनईचे सूर कानी पडतात, सनईच्या कर्णमधुर सुराने मन प्रसन्न, उत्साही होते सारे वातावरण आनंदी मंगलमय होऊन जाते. आपल्या दिवसाची सुरुवातही रेडिओ ऐकतांना सनई वादनानेच होते.

बीन

been भारतात दक्षिणेकडे जसे ‘रुद्रवीणा’तसें उत्तरेकडे ‘बीन’ होय. ‘बीन’ हा शब्द वीणा’ या शब्दाचा अपभ्रंश आहे असे म्हणता येईल. सुमारे तीन-चार इंच व्यासाची व तीन ते चार फूट लांबीची अशी पोकळ वेळूची सरळ दांडी ह्या वाद्यास लागते. ज्या ठिकाणी पेरी येतात त्या ठिकाणी असणारे डोळे काढून टाकून सर्व दांडी सारखी नितळ गोल करतात व आतून असणारी पोकळीपण चांगली साफ करुन घेतात. अशा प्रकारे तयार झालेल्या दांडीच्या दोन्ही शेवटास चार बोटे रुंदीच्या पितळी किंवा रुप्याच्या मायण्या बसवतात. सुमारे पंचवीस-तीस इंचापर्यंत भरेल अशा परीघाचे दोन गोल कडू भोपळे घेऊन त्यांचे देठ काढून टाकून तेथे वर सांगितलेली दांडी बसेल अशा खाचा प्रत्येक भोपळयास घेतात. सुमारे आठ इंच प्रत्येक शेवट बाहेर राहील अशा बेताने ती दांडी त्या भोपळयाच्या जोडीवर बसवितात. ह्याप्रमाणे बीनाचा बाह्य आकार तयार होतो.

तंबो-यास जशा अटी असतात तशा दोन हस्तीदंती अटी एका शेवटापासून सुमार सहा-सात इंच अंतर सोडून बसवितात. दुस-या शेवटास हस्तीदंती घोडी बसवितात. काहीवेळा ह्या घोडीचा आकार मोरासारखा केलेला दिसतो. घोडीखाली दिलेल्या लाकडी तुकडयालाच तारदान बसविलेले असते. दांडीच्या दोन्ही अंगांस अटीच्या वर एक अंगास तीन व दुस-या अंगास दोन तारा लावण्यासाठी ब-याच मोठया खुंटया बसवितात. वादकाच्या उजव्या हाताचा अंगठा वाद्याच्या ज्या कडेवर बसतो त्याच कडेला वर सांगितलेल्या दोन खुंटया येतात, त्याच कडेस अटीच्या थोडीशी खाली अशी एक खुंटी कडझिलीच्या तारेकरितां ठेवतात आणि त्याच कडेवर सुमारे दांडीच्या दोनतृतीयांशावर, घोडीकडे आणखी एक खुंटी चिकारीच्या तारेकरता लावतात. बाजाच्या चार तारा सा,प,सा,म अशा मिळवितात. अटीच्या जवळ, एका अंगास अटीखाली व दुस-या अंगास अटीच्यावर असणा-या कडझिलीच्या तारा षड्ज स्वरांत मिळवतात; चिकारीची तार दुपटीच्या षड्जांत ठेवतात, खर्ज व पंचम ह्या स्वरांच्या तारा पितळेच्या कच्च्या असतात. बाकीच्या सर्व तारा पोलादी पक्कया असतात. पुष्कळ वेळा कडझिलीच्या तारांपैक डाव्या हाताच्या बोटाने वाजणारी तार पितळेची लावतात.

दांडीवर वीस लाकडी पडदे मेणांत बसवलेले असतात. प्रत्येक पडद्यास खांच करुन त्यामध्ये पोलादाचा पातळ तुकडा पडद्याइतक्या लांबीचा बसवतात. ह्या तुकडयावर वाद्याच्या तारा दाबल्या जातात. ह्या पडद्याची उंची किंचित कमी होत गेलेली असते आणि घोडीकडे असलेल्या शेंवटच्या पडद्याची उंची सर्वांत कमी असते; अशी उंची कमी होत गेल्याने एका पडद्यावर तार दाबली असता ती त्या पडद्याच्या खालच्या पडद्यास लागत नाही. ह्या वीस पडद्यांमुळे ह्या वाद्यांत अडीच सप्तके पुरी होतात. उजव्या हाताची अनामिका / मधलें बोट व तर्जनी ह्यांत नखं घालून घोडीकडे असणारा भोपळा छातीशी ठेवून त्याच्या बाहेरुन उजव्या हाताचा अंगठा दांडीवर ठेवून तर्जनीने तारेवर आघात करतात; दुसरा भोपळा सहजच डाव्या खांद्यावर बसतो व डाव्या हाताची तर्जनी व मधले बोट ह्यांनी तार पडद्याशी दाबून किंवा ओढून हवा तसा स्वर काढला जातो. ह्या वाद्यांत ‘बाज’ची मध्यमाची तार, वाजवणा-याचा अंगठा ज्या कडेवर ठेवलेला असतो त्या कडेशी असते; व बाकीच्या सा,प,सा (खर्ज) ह्या अनुक्रमें दुस-या बाजूकडे येतात; व डाव्या हाताच्या करंगळीन वाजणारी कडझिलीची तार ही ह्या बाजूकडील अखेरची होय. दाबून किंवा ओढून ज्या चार तारांवर स्वर काढायचे असतात, त्या तारांपैकी मुख्य ‘बाज’ची जी मध्यमाची तार असते ती बाकीच्या तारांकडे खेंचली जाते हें लक्षात येईल. हे वाद्य सर्व वाद्यांचा राजा आहे असे मानतात. ज्याला प्रचारांत ‘जोड’ म्हणतात ते रागदारीचे काम ह्या वाद्यांत इतके उठावदार व मोहक निघते की त्याचे वर्णन शब्दांनी होणे अशक्य आहे.