लोकजीवन मुख्यपान

आदिवासी

आदिवासींची रंगपंचमी
महाराष्ट्रात होळीच्या पाचव्या दिवशी रंगपंचमी येते. आदिवासींमध्ये रंगपंचमीला विशेष महत्त्व आहे. खासकरून भिल्ल,  पावरा या जमाती रंगपंचमी मोठ्या प्रमाणात साजरी करतात. यादिवशी लोक एकमेकांना गुलाल तसेच रंग लाऊन गळाभेट घेतात. रंग उधळण्याच्या कार्यक्रमात अबाल वृद्ध सामील होतात. त्यानंतर गोट (बोकड कापणे) कार्यक्रमाला सुरुवात होते.

होळीची सांगता म्हणून प्रत्येक पावरा गावात गोट खाण्याचा कार्यक्रम केला जातो. यासाठी त्याचे नियोजन ८-१० दिवस आधी केले जाते. गोट खाण्याच्या कार्यक्रमाच्या दिवशी गावातील लोक नदीवर एकत्र जमतात.तेथे पुजारी विधिवत होळी मातेच्या नावाने व इतर देव-देवतांच्या नावाने पूजा करतात. नंतर मंत्र म्हणून तांब्यातील दारूचा एक-एक थेंब जमिनीवर टाकतात. गावाच्या भरभराटीसाठी आणि सुखशांतीसाठी देव-देवतांची प्रार्थना केली जाते. विधी झाल्यानंतर बोकडाचा बळी दिला जातो.  कापलेल्या बोकडाचे रक्त एका भांड्यात जमा केले जाते. त्यामध्ये मीठ, मिरची टाकून ते शिजविले जाते. त्यानंतर त्यात शिजविलेल्या मटणाचे तुकडे एकत्र करून गोट तयार केला जातो. गावक-यांनी आपल्या सोबत आणलेल्या भाकरी अथवा पोळी यांचा काला (बारीक-बारीक तुकडे) करून त्यामध्ये गोट टाकून त्यांचे मिश्रण तयार करून लाडू केले जातात. ते उपस्थितांना वाटले जातात. उरलेला गोट समान वाटला जातो. त्या दिवशी रात्री प्रसाद म्हणून त्याचे जेवण केले जाते.

गोट खाण्याच्या कार्यक्रमाचे आणखी एक वैशिष्टय म्हणजे होळीच्या नृत्यातील बुध्या, बाबा आणि काली हे आपल्या गावातील गोट खाण्याच्या  कार्यक्रमात सहभागी होतात. गावोगावी नाचगाणे करून मिळविलेल्या पैश्यातून बोकड आणला जातो. गावच्या समारंभासाठी बळी देण्यात येणा-या बोकडाबरोबर या बोकडाचाही बळी दिला जातो. त्यामुळे बुध्या, बाबा आणि काली यांना पण बरोबरीने हिस्सा दिला जातो. अशा प्रकारे आदिवासी जमातींमध्ये रंगपंचमी आणि  गोट खाण्याचा कार्यक्रम यांना विशेष महत्त्व असून तो त्यांच्या संस्कृतीचा एक भाग आहे. 

संदर्भ - सातपुडयातील भिल्ल 

Share
 
Joomla SEO powered by JoomSEF