दागदागिने मुख्यपान

 

शिरोभूषणे

केसांत मोती निरनिराळी पदके वापरून केशरचना करण्याची पध्दत आजही आहे. पुर्वी वेणी घातलेल्या केसांत नगाचा वापर केला जाई. या नगात गोंडे फुलांचा संच असून नाग, केवडा, चंद्र, सूर्य, स्वस्तिक या चित्रांची पदके असत. अंबाडा सजविण्यासाठी नगाचा वापर करत. भांगाच्या मध्यभागी, बिंदी, बोर, भांगसर, बिजवरा यांसारखी आभूषणे लावली जात.

आंबोडयातील फुले - ही अंबाडा तसेच वेणी सजवण्यासाठी वापरतात. ही सतराव्या शतकापासून प्रचलित आहेत.

वेणी - ही कोकणपट्टीत जास्त प्रसिध्द आहे.

आंबोडयातील फुले गुलाबफुल वेणी
 

 

 

कर्णभूषणे

कर्णभूषण घालणे हे हिंदू संस्कृतीचे लक्षण मानले जाते. कान टोचल्यामुळे आपली प्रतिकारशक्ती वाढते असे काही लोकांचे म्हणणे आहे.

 

कुडी
 कुडी हे कर्णभूषण पेशवाई काळात खूप प्रसिध्द झाले. सोन्याचे किंवा मोत्याचे ६-७ मणी वापरून केलेल्या फुलासारखा आकाराच्या कर्णभूषणांना 'कुडी' म्हणतात. कुडया ह्या विवाहित स्त्रीच्या सौभाग्याचे लक्षण मानले जातात. कुडयांव्यतीरिक्त कर्णफुले, भोकर, झुबे, झुंबर, बाळी, वेल,सोन्याचे कान यांसारखे आभूषणेही कानात घातले जातात.

झुमके
याचे पारंपारिक नाव झुबे असे आहे. सतराव्या शतकाच्या आधीपासून हे प्रचलित आहेत. फक्त याच्या आकारात फरक असेल.

कान 
हे कर्णभुषण पूर्ण कानाच्या आकाराचे असते. हल्लीच्या काळात हे आभुषण फार प्रचलित आहे.

बाळी 
बाळीला फिरकी नसते. यात सोन्याची किंवा चांदीची तार वळवून कानात अडकवलेली असते. पुर्वी मुलांना नजर लागू नये म्हणून भीक मागितलेल्या पैशाने जी बाळी बनविली जाई त्यास भिकबाळी म्हणत.

वेल
हा मोत्याचा किंवा सोन्याचा सर असतो तो कानातून केसात अडकवितात. तसेच मोठमोठी व जड कर्णभूषणे घालून कानाची पाळी ओघळू नये म्हणून कानात साखळी अडकविण्याची पध्दत आहे. 

बुगडी
कानाच्या खालच्या पाळी बरोबरच कानाच्या वरच्या कडेच्या पाळीवर बुगडी घातली जाते. ही मोत्यापासून बनविलेली असते.

कुडकं
कानाच्या आतील बाजूच्या पाळीत कुडकं घालण्याची पध्दत आहे. काही जमातींमध्ये ४-५ ठिकाणी कानाच्या कडा टोचण्याची पध्दत आहे.

 
 

नाकातील आभूषणे

पारंपारिक महाराष्ट्रीयन दागिन्यांमध्ये अतिशय नावाजलेला हा प्रकार आहे. महाराष्ट्रीयन स्त्री ही नथीशिवय पूर्ण होऊ शकत नाही. नाकातील नथींची अनेक नावे आहेत जसे चमकी, लोलक, मोरणी, नथीची ही कल्पना जनावराच्या नाकात असणा-या वेसणीतून निर्माण झाली आहे. मराठा नथ ही भारदस्त, लांब तारेची असते यात लहान मोठे बरेच मणी असतात. ही नथ ओठावर रूळते. तर ब्राह्मणी नथ ही नाजुक, मोजक्या लाल हिरव्या पाचूंची, मोत्यांची असते. सरजाची नथ ही वेणी गुंफल्याप्रमाणे, नक्षीदार विणकाम केल्यासारखी व वजनाने जड असते. हल्लीच्या काळात बायका नथ न घालता नाजुक एकच खडा किंवा मोती असणा-या किंवा सोन्या-चांदीत नाजुक फुलाच्या आकाराच्या मोरण्या (मुरण्या) घालतात.

Share
 
Joomla SEO powered by JoomSEF