दागदागिने मुख्यपान

 

बाहुभूषणे

केवळ हाताचा विचार केला तरी त्यात आपण तीन ठिकाणी दागिने घालू शकतो. दंडात, मनगटावर आणि बोटांवर. आजच्या जमान्यात हे सारे दागिने फार मोजक्या संख्येनेच दिसतात. परंतु पूर्वी म्हणजे पेशवाईच्या अखेरच्या काळात दंडावरच्या किंवा मनगटावरच्या दागिन्यांचे दहा - पंधरा तरी वेगवेगळे प्रकार वापरात असत. त्यांची नावेच केवळ जुन्या कागदपत्रांमधून आढळतात. स्त्रियांच्या वापरातले आजचे दंडावरचे दागिने असे आहेत.


 

 

 
 

दंडावरचे दागिने

वाकी
सुशिक्षित-नागर त्याचप्रमाणे ग्रामीण अशा सर्वच भागातल्या स्त्रियांमध्ये अत्यंत लोकप्रिय असणारा हा दंडावरचा दागिना आहे. नागर उच्चवर्णीय स्त्रियांच्या वाकी सोन्याच्या, नाजूक घडणीच्या अशा असतात. तर ग्रामीण समाजात ठोसर व चांदीच्या वाकी आढळतात. सोन्याच्या वाकीमध्ये चटईच्या वाकी व रूद्रगाठीच्या वाकी असे दोन प्रकार महिलांचे विशेष आवडते आहेत.

नागबंद

हाही एक वाकीचाच प्रकार म्हणायला हवा. वेटोळे घालून बसलेली व फणा उभारलेली अशी सोन्याच्या नागकृतीच्या रचनेची वाकी 'नाग' अथवा 'नागबंद' अशा नावाने ओळखली जाते.नागोत्र

गोल गोल वेटोळयांची भरपूर रूंदी लाभलेल्या या गोलाकार वाकीला नागोत्र असे नाव आहे. ग्रामीण व नागर ह्या दोन्ही भागात हा अलंकार सारखाच लोकप्रिय आहे. शहरी भागात हे नागोत्र सुवर्णाचं आणि नाजूक कलाकुसरीचं असतं. ग्रामीण भागात ते ठसठशीत व चांदीचं आढळतं आणि नागोत्तर ह्या नावाने ओळखलं जातं.

बाजूबंद

हाही सुरेख घडणीचा, सुवर्णाचा रत्नजडित असा दंडावरचा अलंकार आहे. तथापि हा बहुतकरून शहरी भागातच दिसून येतो. तर याच्या उलट तोळेबंद हा दागिना खेडेगावातून प्राधान्यानं वापरात असतो.

तोळेबंद
चटईच्या वाकीसारखीच जडणघडण असणारा हा भक्कम असा चांदीचा अलंकार ग्रामीण भागात विशेष लोकप्रिय आहे.

वेळा
हाही चांगला जाडजूड आणि विशेष कलाकुसरीचा चांदीचा अलंकार तोळेबंदासारखाच ग्रामीण भागात विशेष लोकप्रिय आहे. आदिवासी स्त्रियांमध्येही या अलंकाराचा पुष्कळच प्रसार झालेला दिसतो. दंडावरचे प्रामुख्याने दिसणारे अलंकार एवढेच आहेत.

Share
 
Joomla SEO powered by JoomSEF