पारंपारिक गाणी मुख्यपान

भगवान श्रीकृष्ण स्तोत्र

साष्टांग नमन माझे देवकीनंदना, वसुदेवसुता श्रीकृष्णा ।
अनन्यभक्तीने प्रतिदिनी स्मरता, सकल मनकामना साधती ॥
प्रथम वंदितो ऋषीकेशा दयाळा, गळा वैजयंतीमाळा ।
दुसरे नमन माझे शंखचक्रपद्मगदाधारी श्रीहरीलक्ष्मीनारायणा ॥
तिसरे पुंडरीकाक्ष केशवा चवथे मुरलीधरा माधवा ।
पाचवे गोविंद गुणातीत वासुदेवा, सहावे सर्वेश्वर संकर्षणा ॥
सातवे विश्वमूर्ती अनिरूध्दा, आठवे पुरूषोत्तम प्रद्युम्ना ।
नववे योगेश्वर श्रीकृष्णा, दहावे धन्वन्तरी जनार्दना ॥
अकरावे अक्षर श्रीविष्णु, द्वादश पितांबरधारी अच्युता ।
द्वादश ही श्रीकृष्णाची नावे, भक्तिभावे प्रतिदिनी जे स्मरती ।
द्वारकाधीश रूक्मिणीपती श्रीकृष्ण त्यास भवसागरातून तारती ॥
तूच कर्ता, तूच करविता, तूच सर्वांचा आधार ।
अनन्यशरणागत भक्तांचा योगक्षेम चालविण्याचा तुझा निर्धार ॥
'सुदीप'ने श्रध्देने रचिलेले हे स्तोत्र संपूर्ण ।
सच्चिदानंद, भक्तवत्सल, तुलसीप्रिय श्रीकृष्ण माऊली 
तव चरणी अर्पण ॥

रचनाकार सुदीप दत्तात्रेय नेरूरकर

श्रीकृष्णाचा पाळणा

बाळा जो जो रे, कुळभूषणा, । श्रीनंदनंदना ॥ 
निद्रा करिं बाळा, मनमोहना । परमानंदा कृष्णा ॥बाळा धृ.॥ 
जन्मुनि मथुरेत, यदुकुळीं । आलासी वनमाळी ॥ 
पाळणा लांबविला, गोकुळीं । धन्य केले गौळी ॥ बाळा जो.॥ 
बंदीशाळेत, अवतरूनी । द्वारे मोकलुनी ॥ 
जनकशृंखला, तोडोनी । यमुना दुभंगोनी ॥ बाळा जो. ॥ 
मार्गी नेताना, श्रीकृष्णा । मेघनिवारणा ॥ 
शेष धावला, तत्क्षणा । उंचावूनी फणा ॥ बाळा जो. ॥ 
यत्नजडित, पालख । झळके अमोलिक ॥ 
वरती पहुडले, कुलतिलक । वैकुंठनायक ॥ बाळा जो. ॥ 
हालवी यशोदा, सुंदरी । धरूनी ज्ञानदोरी ॥ 
पुष्पें वर्षिली, सुरवरी । गर्जती जयजयकारीं ॥ बाळा जो. ॥ 
विश्वव्यापका, यदुराया । निद्रा करिं बा सखया ॥ 
तुजवरिं कुरवंडी, करूनियां । सांडिन मी निज काया ॥ बाळा जो.॥ 
गर्ग येऊनि, सत्वर । सांगे जन्मांतर ॥ 
कृष्ण परब्रह्म, साचार । आठवा अवतार ॥ बाळा जो. ॥ 
विश्वव्यापी हा, बाळक । दुष्ट-दैत्यांतक ॥ 
प्रेमळ भक्तांचा, पालक । श्रीलक्ष्मीनायक ॥ बाळा जो. ॥ 
विष पाजाया, पूतना । येतां घेईल प्राणा ॥ 
शकटासुरासी, उताणा । पाडिल लाथें जाणा ॥ बाळा जो. ॥ 
उखळाला बांधिता, मातेनें । रांगतां श्रीकृष्ण ॥ 
यमलार्जुनांचे, उध्दरण । दावानलप्राशन ॥ बाळा जो. ॥ 
गोधन राखितां, अवलीळा । काळीया मर्दीला ॥ 
गाई गोपाळां, रक्षून । केलें वनभोजन ॥ बाळा जो. ॥ 
कालिंदीतीरी, जगदीश । वज्रवनितांशी रास ... ॥ 
खेळुनी मारिले, कंसास । मुष्टिक चाणूरास ॥ बाळा जो.॥ 
ऐशी चरित्रे, अपार । दावुनि भूमीवर ॥ 
पांडव रक्षिल, सत्वर । ब्रह्मानंदी स्थिर ॥ बाळा जो.॥

Share
 
Joomla SEO powered by JoomSEF