संस्कृती मुख्यपान
 
पारंपारिक रांगोळ्या प्रांतीय रांगोळ्या

पुविडल - केरळ

पुव म्हणजे फूल. इडल म्हणजे रचना. पुविडल म्हणजे फुलांची रचना. पुविडलची सुरुवात सुमारे दोन हजार वर्षांपूर्वीची असावी. याची रचना प्रामुख्याने ओणमच्या उत्सवात करतात. या पुष्परचना गोलाकार, कमलपत्राकार, षट्कोनी इत्यादि प्रकारच्या असतात. प्रथम बोटांनी आकृती रेखाटून मग तिच्यावर तुळस किंवा फुलांचेच उंच कमळ करतात.

 
 

मांडणा - राजस्थान

राजस्थान व मध्य प्रदेशात दसरा, दिवाळी, राखीपुनव वगैरे प्रमुख सणांच्या वेळी घराची भिंत सारवून तिच्यावर जे कणे काढतात, त्यांना मांडणा म्हणतात. राजस्थानातली खास पांढरी खडी घेऊन त्यात पाणी मिसळून मांडणा काढला जातो. या मांडण्यात त्रिकोण, चौकोन, षट्कोन, अष्टकोन, स्वस्तिक, कमळ, वेल, फूल अशा आकृती व चित्रे काढतात. कधीकधी तांदुळाच्या पिठात थोडी हळद कालवून त्या रंगाचा किंवा गेरूच्या रंगाचा उपयोग करतात. भिंतीवर लहान-मोठे चौकोन सारवून त्यात आकृती भरतात. कित्येकदा कणा आखून रंगाचे ठिपके जोडून आकृती बनवितात. कोणत्या प्रसंगी कोणती आकृती किंवा रेखाचित्र काढायची ते परंपरेने ठरलेले असते. यात सूर्य, चंद्र, गौरी, नाग इत्यादी चित्रे असतात.

 
 

अलिपना किंवा अल्पना - बंगाल

लाकडी पाट, चौरंग किंवा जमीन यावर जी चित्रे व नक्षी काढतात त्या कलाप्रकाराला अलिपना म्हणतात. अलिपना अंगणात किंवा घरातल्या जमिनीवर काढायची असल्यास ती तांदुळाच्या कोरडया पिठाने काढतात व भिंतीवर काढायची असल्यास तेच पीठ पाणी घालून पातळ करून त्याच्या रेघांनी काढतात. क्वचित प्रसंगी इतर रंग व पदार्थ वापरतात. अलिपना हाताने काढतात. कुंचला वापरत नाहीत. विशिष्ट व्रतांच्या विशिष्ट अलिपना असतात. ताराव्रताची अलिपना सर्वांत लोकप्रिय आहे. यामध्ये वरच्या बाजूला सूर्यबिंब खाली शिवलिंगे व पार्वती, सर्वांत खाली चंद्र, सूर्य, चंद्राच्यामध्ये सोळा तारका व ब्रम्हांड. त्यातच भक्ताचे आसन -पृथ्वी अशी रचना असते. माद्यमंडळ व्रताच्या अलिपनेतच फक्त विविध रंग वापरतात. मासा हे समृद्दीचे प्रतीक मानतात. ते सर्व अलिपनांत आढळते.

 
 

मुग्गु - आंध्रप्रदेश

या प्रकारात रांगोळीला मुग्गुलू असेही म्हणतात. ही रांगोळी काढण्यासाठी तांदुळाचा उपयोग करतात. तांदूळ पाच-सहा तास भिजत घालतात. नंतर ते अगदी बारीक वाटून त्यात जरूरीनुसार पाणी घालतात. त्या द्रवात कापडाची चिंधी बुडवतात. ती पाच बोटांत धरून हलकेच दाबली की द्रवाचे थेंब खाली पडतात. अशा रीतीने ठिपके काढून त्याभोवती रेषा काढून मुग्गुच्या आकृत्या तयार करतात. देवासमोर, दारात, भिंतीजवळ चारही कडांनी जमिनीवर, भिंतीवर मुग्गु काढण्याची पध्दत आहे. काही वेळा चुन्याची व कावेची पूडही रांगोळीसाठी वापरतात. सात वारांच्या सात विशिष्ट आकृत्या ठरलेल्या आहेत.

 
 

कोलम - तमिळनाडू

ही रांगोळी काढताना तांदुळाचे पीठ वापरतात. काही विशेष प्रसंगी तांदुळाच्या पिठाची पेस्ट रांगोळी काढण्यासाठी वापरतात. ही रांगोळी पिठात भिजवलेले कापड बोटात धरून काढतात. तांदूळ हे किडामुंगीपासून सर्वांचे सहज मिळणारे अन्न आहे. त्यामुळे ते पवित्र मानले जाते. कोलमवरून घरात आले म्हणजे सर्वांचे पाय रोगजंतूंपासून मुक्त होतात, अशी समजूत आहे. अंगण व पूजेच्या जागी ही रांगोळी काढतात. लक्ष्मीच्या वरदानाच्या अपेक्षेने ही रांगोळी काढतात.

 
 

चौकपूरना- मध्यप्रदेश

अंगणाचा एखादा भाग चौकोनात सारवून त्यात वेलपत्ती व आकृत्या काढून चौकोन पूर्ण करणे म्हणजे चौकपूर्णा. ही रांगोळी ठिपक्यांची असते. ठिपके विशिष्ट पध्दतीने रेघांनी जोडायचे व विविध आकृत्या तयार करायच्या. त्यासाठी रंग किंवा खडूचे चूर्ण पाण्यात भिजवून वापरतात. बारीक काडीला कापूस लावून त्या कुंचल्याने चौक भरतात. क्वचित पीठ व गुलालही वापरतात. हिरव्या रंगासाठी हिरवी पाने वाटून उपयोगात आणतात.

Share
 
Joomla SEO powered by JoomSEF