सणवार मुख्यपान

 

नागपंचमी (श्रावण शुदध पंचमी)

 

नागपंचमी (श्रावण शुदध पंचमी)

भारतात नाग-साप यांना देव मानले जाते. काही नाग मानवाला उपकारक तर काही विषरी नाग-साप अपकारक मानले जातात. कदाचित त्यांच्याबाबत असलेल्या भितीपोटी ही कल्पना आली असावी. नागाची पूजा करण्यासाठी नागपंचमी या सणाची निर्मिती झाली आहे.या सणामागची पौराणिक कथा अशी की यमुना नदीच्या डोहात कालिया नावाचा महाविषारी, दुष्ट सर्प होता. त्याच्या साध्या फुत्काराने सुध्दा सर्व काही भस्मसात होई. श्रीकृष्णाने कालिया नागाला ठार मारले व गोकुळातील लोकांचे रक्षण केले तो दिवस म्हणजे श्रावण शुदध पंचमी (नागपंचमी).

तेव्हापासून लोक नागाची पूजा करुन नागाला लाह्या, दूध वाहतात. नागदेवतेने प्रसन्न होऊन आपल्याला त्रास देऊ नये ही यामागची इच्छा असते. या दिवशी नागदेवतेबरोबर श्रीकृष्णाची सुध्दा पूजा करतात. अंगणात रांगोळीच्या ठिपक्यांचे नाग काढतात. पाटावर चंदनाने पाच फण्यांचा नाग काढतात. नवनागांची नावे घेऊन यथासांग पूजा करतात. नवनागांची नावे पुढीलप्रमाणे आहेत.

१) अनंत २) वासुकी ३) शेष ४) पद्मनाभ ५) तक्षक ६) कालीया ७) शंखापाल ८) कंषल ९) धृतराष्ट्र

नाग व साप यांना देव मानल्यामुळे या दिवशी तवा चुलीवर ठेवणे, विळीने चिरणे, तळणे इत्यादी निषिध्द मानले आहे. कारण वरील क्रीया करताना अनावधानाने साप किंवा नाग यांना इजा पोरण्याची शक्यता असते असे मानले जाते.
नागपंचमीच्या आदल्या दिवशी स्त्रीया हातावर मेंदी काढतात व नवीन बांगडया भरतात. खेडेगावातून झाडाला दोर बांधून मुली झोके घेण्याचा खेळ खेळतात.

या दिवशी गारूडी लोक शहरात नाग घेऊन रस्त्याने हिंडतात व त्यांना घरी बोलावून लोक त्याची पूजा करतात. या दिवशी पुरणाची किंवा साखर-खोब-याची दिंडे बनवतात.

महाराष्ट्रातील बत्तीसशिराळा या गावाला प्रचंड मोठी जत्रा भरते. आसपासच्या खेडयातूनच नव्हे तर परदेशी पाहुणे सुध्दा तिथे येतात. हजारो गारुडी साप-नाग घेऊन येतात. कितीही विषारी नाग-साप असले तरी या दिवशी ते कुणाला दंश करीत नाहीत अशी लोकांची श्रध्दा आहे.

-------------------------------------------------------------------------------------

नारळी पौर्णिमा ( श्रावण शुध्द पौर्णिमा)

समुद्राकाठी रहाणा-या प्रामुख्याने कोळी लोकांचा हा महत्त्वाचा सण आहे. पावसाळयात समुद्र खवळलेला असतो. बोटी, जहाजे वगैरैची ये-जा या काळात बंद असते. जलदेवतेचा कोप होऊ नये, जहाजे, नौका सुरक्षित रहाव्यात, समुद्र शांत व्हावा व बोटी वगैरे चालू व्हाव्यात, या दृष्टीने लोक जलदेवतेची पूजा करतात. पूजेसाठी समुद्राला नारळ अर्पण करण्याची प्रथा आहे. म्हणून या सणाला नारळी पौर्णिमा असे म्हणतात. समुद्राला नारळ अर्पण करताना ताम्रनाणी नारळास बांधून नारळ समुद्रात सोडतात. या दिवसापासून मच्छिमार लोक आपल्या होडया घेऊन मच्छिमारीसाठी समुद्रात जायला सुरुवात करतात.

-------------------------------------------------------------------------------------

राखी पौर्णिमा (श्रावण शुध्द पौर्णिमा)

हाच दिवस राखीपौर्णिमा म्हणून साजरा केला जातो. या दिवशी बहिणी आपल्या भावाला राखी बांधतात. भावाने आपले रक्षण करावे असा या राखी बांधण्यामध्ये हेतू असतो. व्रतबंध झालेले ब्राह्मण लोक या दिवशी नवीन यज्ञोपवीत धारण करतात. याच दिवशी लोक श्रावणी करतात. या दिवशीचे मुख्य पक्वान्न म्हणजे नारळीभात. तसेच नारळाच्या/ खोब-याच्या वडया, नारळाची बर्फी, नारळाच्या करंज्या वगैरे पदार्थ करून हा सण साजरा करतात.

-------------------------------------------------------------------------------------

गोकुळ अष्टमी (श्रावण वद्य अष्टमी)

राम, कृष्ण, विष्णू व शंकर ही भारतीयांची आराध्य दैवते आहेत. श्रीकृष्ण तर त्याच्या गोकुळातील बाललीला, यमुनेवरील रासलीला आणि भगवतगीतेतील उपदेशांमुळे सर्वांचे आवडते दैवत झाला आहे. त्या श्रीकृष्णाच्यासाठी हा सण साजरा केला जातो. भगवान श्रीकृष्णाने धर्माचे रक्षण करण्याकरिता ज्या दिवशी पृथ्वीवर जन्म घेतला तो दिवस म्हणजे गोकुळ अष्टमी होय.

या सणामागील पौराणिक कथा अशी की श्रीकृष्णाचा मामा कंस. कंसाने प्रजेला खूप छळले. श्रीकृष्णाच्या आई-वडिलांना त्याने तुरुंगात ठेवले कारण त्यांना होणा-या मुलांपैकी एकजण कंसाचा वध करणार अशी आकाशवाणी झालेली होती. कृष्णाने कंसाचा वध करून आपल्या आई-वडिलांना बंदिवासातून मुक्त केले. ही कथा सर्वज्ञात आहेच. पुढे याच श्रीकृष्णाने कौरव-पांडव युध्दात पांडवांची बाजू घेऊन कौरवांचा पराभव केला. या गोष्टीचे स्मरण व्हावे म्हणून भारतात सर्व ठिकाणी गोकुळ अष्टमी हा सण उत्साहात साजरा केला जातो. ज्यांच्या घरी हा सण साजरा केला जातो ते सर्वजण ह्या दिवशी उपवास करतात. रात्री बारा वाजता श्रीकृष्णाचा जन्म साजरा करतात, काल्याचे कीर्तन करतात व सुंठवडा प्रसाद म्हणून वाटतात. ह्या दिवशी पाळणा फुलापानांनी सजवून तयार करतात. बळीराम, श्रीकृष्ण यांच्या मूर्ती तयार करून त्या पाळण्यात निजवतात. त्यास तोडे, साखळया असे दागिने घालतात. त्यांची पूजा करतात.

दुस-या दिवशी पारणे करतात. दहीहंडी फोडण्याचा सार्वजनिक कार्यक्रम चौकाचौकातून करतात. दहीहंडी म्हणजे मातीचे एक मडके असते. त्यात ज्वारीच्या लाह्या, पोहे, खोबरे, दही, साखर वगैरे पदार्थ कालवून घालतात व ही हंडी २०-२५ फूट उंचावर बांधून ठेवतात. मुले एका वर्तुळाकारात उभी रहातात व त्यांच्या खांद्यावर दुसरी मुले असे करीत उतरंड करून दहीहंडी फोडतात. आतील पदार्थ प्रसाद म्हणून सर्वांना वाटतात. दहीहंडी फोडण्यासाठी हजारो रुपयांची बक्षिसे लावलेली असतात.

गोकुळअष्टमीच्या दिवशी पूजा करीत असताना एखाद्या सवाष्ण स्त्रीने स्वतःला मूल होण्यासाठी पूजेतला बाळकृष्ण जर चोरून नेला तर तो शुभ समजला जातो. तो चोरलेला बाळकृष्ण वाजत-गाजत घरी नेतात. यथासांग पूजाअर्चा करतात. आपले कार्य सिध्दीस गेल्यावर तोच बाळकृष्ण पुन्हा वाजत गाजत आणून ज्या ठिकाणाहून चोरून नेला असेल तिथेच परत नेऊन ठेवतात. हा उत्सव श्रावण वद्य प्रतिपदेपासून गोकुळअष्टमीपर्यंत म्हणजे श्रावण वद्य अष्टमी पर्यंत असतो.

Share
 
Joomla SEO powered by JoomSEF