सणवार मुख्यपान

मंगळागौर ( श्रावण महिन्यांतील प्रत्येक मंगळवारी)

मंगळागौर ( श्रावण महिन्यांतील प्रत्येक मंगळवारी)

मंगळागौरीची पूजा म्हणजे उमा-शंकराची पूजा. पतीपत्नीमधील आत्यंतिक प्रेम व निष्ठेचा आदर्श म्हणून या दांपत्याकडे पाहिले जाते. त्यांची कृपादृष्टी संपादन करण्यासाठी किंवा आदर्शाचे स्मरण करण्याच्या हेतूने ही पूजा करतात. लग्न झाल्यावर पहिली पाच वर्षे श्रावण महिन्यातील प्रत्येक मंगळवारी स्त्रिया मंगळागौरीची पूजा करतात.

नवविवाहित स्त्रिया या दिवशी न्हाऊन, सोवळे नेसून पूजेला बसतात. पूजा झाल्यावर सर्वजणी एकत्र बसून मंगळागौरीची कहाणी वाचतात. मंगळागौर पूजलेल्या मुलींनी शक्यतो मुक्याने जेवायचे असते. जेवणानंतर तुळशीचे पान खातात.

या पूजेकरिता अन्नपूर्णा देवीची मूर्ती, रोजचे पूजेचे साहित्य, बुक्का, अक्षता, पाच खारका, पाच सुपा-या, पाच बदाम, पाच खोब-याच्या वाटया, सोळा प्रकारची पत्री (पाने), दोन वस्त्र, आठ वाती, कापूर, गुलाल, बेल, फुले, दुर्वा, सोळा काडवाती, तुळशीची पाने, केळी किंवा पेरूचा नैवेद्य, पंचामृत, दुधाचा नैवेद्य, जानवे, सोळा विडयाची पाने, गणपतीसाठी सुपारी, अत्तर, शक्य असल्यास केवडयाचे कणीस, एक नारळ, कापड, हळद-कुंकू इ.साहित्याची गरज असते.

ज्यांच्या घरी मंगळागौरीची पूजा असेल त्यांच्या घरी संध्याकाळी बायकांना हळदीकुंकवासाठी बोलावतात. हळद-कुंकू, विडयाची पाने, सुपारी व हातावर साखर देतात. सवाष्णींची गव्हाने ओटी भरतात. रात्रीसाठी पोळया, मटकीची उसळ, वाटली डाळ, करंज्या, चकल्या, लाडू वगैरे फराळाचे जिन्नस करतात व सर्वांना जेवायला बोलवतात. रात्री पुन्हा मंगळागौरीची आरती करतात.

रात्रभर मंगळागौर जागवतात. त्यावेळी उखाणे, फुगडया, झिम्मा, भेंडया असे खेळ खेळतात. सकाळी उठल्यावर स्नान करून दहीभाताचा नैवेद्य दाखवितात व पुन्हा मंगळागौरीची आरती म्हणतात. नंतर मंगळागौरीवर अक्षता टाकून तिला हलवल्यासारखे करतात. यानंतर विहीर, तळे, नदी यांपैकी कोठेही पाण्यात तिचे विसर्जन करतात.

या दिवशी मुख्यतः पुरणपोळी करतात इतर स्वयंपाक सणाप्रमाणे करतात.

मंगळागौरीचे उद्यापन करावयाचे असल्यास त्यासोबत कोणाचीतरी मंगळागौर करावी लागते. त्या मंगळागौरीबरोबर आपल्या व्रताचे उद्यापन करतात. उद्यापनाचे वेळी आदल्या दिवशी म्हणजे सोमवारी भटजींना बोलावतात. तांब्याच्या तांब्यात पाणी, अक्षता, आंब्याचा डहाळा ठेवून कलशाची पूजा करतात. मंगळवारी पुण्याहवाचन ठेवण्याकरिता होमहवनासाठी भटजींना बोलावतात. ज्या ठिकाणी होमहवन करतात त्याच ठिकाणी द्यायचे वाण ठेवतात. हे वाण आई-वडिलांना द्यायचे असते. आई-वडील जर नसतील तर भाऊ-भावजय यांना हे वाण देऊन उद्यापन करतात.

काजळ, दोन हिरव्या बांगडया, गळेसरी वगैरे सौभाग्यवाण, तांब्याच्या तपेल्यांत सोन्याचा लहानसा नाग घालून त्याला दादरा बांधून व लाडू असे वाण देण्याची प्रथा आहे. वडिलांना उपरणे, शर्ट, धोतर, टोपी देतात. आईला मणी-मंगळसूत्र व जोडवी देतात. मंगळागौरीच्या मुलींना खण किंवा कापड देतात. जिने मंगळागौरीचे उद्यापन केलेले असते तिला मणी-मंगळसूत्र, जोडवी, साडी, खण देतात.

बैल पोळा (श्रावण वद्य अमावास्या)

भारत हा शेतीप्रधान देश आहे. पारंपारिक पध्दतीने शेतीसाठी बैलाची अनमोल मदत घेतली जाते. बैल वर्षभर शेतात राबत असतो. त्याच्या कष्टामुळे धनधान्य मिळते. त्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी व त्याने केलेल्या कष्टाचे स्मरण व्हावे म्हणून वर्षातून एक दिवस बैलपोळा साजरा केला जातो. सर्वसाधारणपणे हा सण शेतकरी साजरा करतात. या दिवशी शेतकरी बैलांना अंघोळ घालून सजवतात. शिंगाना बेगड लावतात. पाठीवर झूल घालून सजवतात. बैलांना वाजत गाजत मारूतीच्या दर्शनाला नेतात. त्या दिवशी बैलांना पूर्ण विश्रांती देतात. संध्याकाळी बैल वाजत गाजत आले की त्यांची पूजा करतात व त्यांना पुरणपोळी खायला देतात.

ज्यांचा शेती हा व्यवसाय नाही ते लोक या दिवशी मातीच्या बैलाच्या मूर्ती विकत आणून पाटावर गहू पसरून त्यावर बैल मांडून त्यांची पूजा करतात. जेवणात पुरणपोळी हे प्रमुख पक्वान्न केले जाते.

पिठोरी अमावास्या (श्रावण वद्य अमावास्या)

या सणामागची पौराणिक कथा अशी आहे की विदेहा नावाच्या स्त्रीला दर श्रावण अमावास्येला मुले होत व ती लगेच मृत्युमुखी पडत. या कारणासाठी पतीने तिला घराबाहेर हाकलून दिले. तेव्हा तिने कठोर तपश्चर्या केली. चौसष्ट देवतांनी तिला दर्शन दिले. पुढे ती पुन्हा घरी आली. विदेहावर प्रसन्न झालेल्या देवतांच्या कृपेमुळे तिला दीर्घायुषी असे आठ पुत्र झाले. अशा प्रकारे संतति रक्षणासाठी चौसष्ट देवतांच्या पूजनाबरोबरच स्त्रीला स्वतःच्या सामर्थ्याची व मर्यादाशीलतेची जाणीव पिठेरी अमावास्या करून देते.म्हणून ही अमावास्या महत्त्वाची आहे.

या दिवशी मुलाबाळांच्या वंशवृध्दीकरिता पूजा करतात. या दिवशी सवाष्ण ब्राम्हण ही जेवावयास घालतात. पुरणावरणाचा महानैवेद्य दाखवतात.

हरतालिका ( भाद्रपद शुध्द तृतीया)

हरतालिका हे व्रत पार्वतीने शंकर आपल्याला पती म्हणून मिळावा यासाठी केले होते असे मानले जाते. तेव्हांपासून आपल्याला जोडीदार मनासारखा व चांगला मिळावा म्हणून कुमारिकांनी हे व्रत करावे असा प्रघात आहे आणि लग्नानंतर मनासारखा जोडीदार मिळाला म्हणून आणि जन्मोजन्मी असाच जोडीदार मिळावा म्हणून नंतरही स्त्रिया हे व्रत करतात. मंगळागौरीच्या पूजेप्रमाणेच हिरव्या बांगडया २, कंगवा, आरसा, कुंकू, करंडा इ. साहित्य आणून, शंकराची प्रतिमा म्हणून वाळूची पिंड करून पूजा करतात. सात प्रकारची प्रत्येकी सात सात पाने गोळा करून ती शंकराला वहातात. त्यापैकी मुख्य पान म्हणजे रूईचे व बेलाचे पान. ही दोन्ही पाने ह्या पूजेत आवश्यकच आहेत.

पूजा झाल्यावर हरतालिकेची आरती म्हणतात व कहाणी वाचतात. त्यादिवशी बायका कंदमुळाशिवाय काहीही खात नाहीत. दिवसभर पाणीसुध्दा पित नाहीत. रात्री बारा वाजता रूईच्या पानावर मध घालून चाटतात. दुसरे दिवशी आंघोळ करून हरतालिकेची आरती करून उपवास सोडतात. हरतालिकेच्या दिवशी बायका एकत्र येऊन रात्री बारा वाजेपर्यंत जागरण करतात खेळ, फुगडया, गाण्याच्या भेंडया खेळतात. या दिवशी स्त्रिया इतर स्त्रियांना सौभाग्यवाणे देतात. दुस-या दिवशी उत्तरपूजा करतात.

Share
 
Joomla SEO powered by JoomSEF