सणवार मुख्यपान

 

श्री गणेश चतुर्थी (भाद्रपद शुध्द चतुर्थी)

 

श्री गणेश चतुर्थी (भाद्रपद शुध्द चतुर्थी)

महाराष्ट्रातील सर्वात मोठा व आगळावेगळा सण म्हणजे गणपती. या उत्सवाचे स्वरूप सार्वजनिक झाल्यापासून तर हा उत्सव महाराष्ट्रभर अत्यंत धामधुमीने साजरा केला जातो. हा उत्सव दहा दिवसांचा असतो. गणपती ही ज्ञानाची देवता. गजानन हा विघ्नहर्ता मानतात. त्यामुळे कोणत्याही शुभकार्याच्या सुरुवातीला गणपतीची पूजा करण्याचा प्रघात आहे. कोकणातील हा सर्वात महत्त्वाचा सण असल्यामुळे जगाच्या पाठीवर असलेला कोणताही कोकणी माणूस या उत्सवासाठी आपल्या गावी जाण्यास उत्सुक असतो. त्यामुळे कोकणात जाण्यासाठी खास बसेसची सोय केली जाते.

या सणाला शाडूच्या मातीच्या केलेल्या एकापेक्षा एक सरस अशा गणपतीच्या मूर्ती बाजारात येतात. त्यापैकी एक घरी आणली जाते. गणपती आणावयास जातेवेळी लोक बरोबर ताम्हण, रूमाल घेऊन जातात. गणपती आणतांना झाकून आणतात व गणपतीचे तोंड आपल्याकडे येईल असे पहातात. गणपती आणतेवेळी गणपतीपुढें काही नाणी व गोविंद विडा ठेवून गणपती घरी आणावा अशी पुष्कळ ठिकाणी पध्दत आहे. गणपती घरी आणल्यानंतर घराच्या दाराबाहेर गणपतीला तांदूळ व पाणी यांनी ओवाळून ते बाहेर टाकून देतात. नंतर गणपती आणणा-या व्यक्तिच्या पायावर गरम पाणी घालतात. गणपतीला व गणपती आणणा-या व्यक्तिला कुंकू लावतात, पाच सवाष्णीं गणपतीला औक्षण करतात. पाटावर तांदूळ पसरून त्यावर गणपती ठेवून गणपतीची स्थापना करतात. गणपती अथर्वशीर्षाची सहस्त्रावर्तने करतात. यथासांग पूजा व आरती करून सकाळचा कार्यक्रम संपवितात.

रोज सकाळी व सायंकाळी पूजा-आरती करून, केळे-पेरू वगैरे खिरापत संध्याकाळी आरतीचे वेळी देतात. गणपतीच्या पूजेकरिता नारळ, एकवीस मण्यांचे वस्त्र, फुले-पत्री, शमी, दुर्वा, जानवे, गूळ-खोब-याचा नैवेद्य, केवडयाचे कणीस इ. साहित्य लागते. गणपतीची स्थापना करण्यापूर्वी सुपारीच्या गणपतीची स्थापना करून त्याची पूजा करण्यात येते.

या दिवशी मुख्यतः नारळ व गूळ यांच्या सारणाचे, तांदुळाच्या उकडीचे मोदक करतात.

सार्वजनिक गणपती उत्सवामधे गणेशाच्या भव्य मूर्ती चौकाचौकातून बसवितात व त्याची भव्य आरास करतात. लोक रात्रीच्या वेळी हे देखावे पहाण्यासाठी रस्तोरस्ती हिंडतात. संगीत, नृत्य, पाककला स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, नाटके वगैरे करमणुकीचे कार्यक्रम आखले जातात.

सार्वजनिक गणपतींचे विसर्जन अनंत चतुर्दशीच्या दिवशी करतात. काही लोकांकडे दीड दिवसांचा गणपती असतो तर काही जणांकडे पाच दिवस असतो. तर काहीजणांचा गणपती गौरींबरोबर सातव्या दिवशी जातो.

गणपती विसर्जनाच्या दिवशी संध्याकाळी नेहेमीप्रमाणे गणपतीची पूजा करतात. गणपतीच्या हातांत गूळ-खोबरे व तिळाचा लाडू देऊन आरती करातात. 'गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या' अशा गजरांत गणपती मूळच्या जागेवरून हलवून ताम्हणात ठेवतात. वरील पूजा सोवळयाने करतात. नंतर गणपतीचे तोंड घरातील दाराकडे करून गणपतीची पाठ आपल्याकडे करून गणपती विहीरीवर, तळयावर, नदीवर, समुद्रावर विसर्जनाकरीता नेतात. झांज घेऊन 'गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या' असे म्हणत विसर्जनाच्या ठिकाणापर्यंत जातात. तिथे परत गणपतीची पूजा केली जाते. गणपतीला दुर्वा वाहतात, आरती करतात. यास उत्तरपूजा म्हणतात. विसर्जनाच्या वेळी गणपती दोन वेळा पाण्यातून बाहेर काढतात व तिस-या वेळी पाण्यात सोडतात.

नंतर नदीकाठची वाळू किंवा विहीरीजवळचे खडे आणून घरांत चारी बाजूला टाकतात. समज असा आहे की, चारी बाजूला वाळू किंवा खडे टाकले असतां जनावराची भिती नसते. गणपती जवळ टेवलेला नारळ नदीवर, विहीरीवर फोडावा. प्रसाद म्हणून खोबरे वाटतात. घरी आल्यावर सर्वांना प्रसाद व केलेली खिरापत देतात.

काही ठिकाणी गणपती विसर्जनाच्यावेळी गणपतीच्या जागी तांब्याचा कलश व त्यावर नारळ ठेवतात. गणपतीच्या विसर्जनानंतर घरी आल्यावर त्या कलशाची नेहेमीप्रमाणे आरती, मंत्रपुष्प म्हणून सांगता करण्याची पध्दत आहे.

 
 

ऋषीपंचमी (भाद्रपद शुदध पंचमी)

भारतात जुन्या विद्वान ऋषींबद्दल वाटणारी आपुलकी, निष्ठा व्यक्त करण्याचा हा दिवस म्हणून ऋषीपंचमी हा सण साजरा करतात.

सप्तर्षी, अरूंधती व गणपती यांची या दिवशी पूजा करतात. सप्तर्षींच्या सात, अरूंधतीची एक व गणपतीची एक अशा नऊ सुपा-या मांडून पूजा करतात. बायका या दिवशी बैलाच्या मेहनतीचे काहीही खात नाहीत. तसेच गाईचे दूध पीत नाहीत. असे करणे जेव्हा शक्य नसेल तेव्हा फक्त उपवास करतात. खेडेगावातील बायकांना हा उपवास शास्त्रोक्त पध्दतीने करता येतो कारण घराच्या मागील भागात भाजीपाला, वेल इत्यादी लावलेले असतात. त्यांचा ह्या दिवशी उपयोग होतो. या दिवशी पाच प्रकारच्या किंवा एकवीस प्रकारच्या भाज्या एकत्र करून त्या जेवणाच्या वेळी गणपतीला नैवेद्य दाखवून मग जेवण करण्याची पध्दत आहे.

 
 

कार्तिकी एकादशी (कार्तिक शुध्द एकादशी)

वर्षातून दोन महाएकादशी असतात. पहिली आषाढी एकादशी आणि दुसरी कार्तिकी एकादशी. आषाढी एकादशी ही पंढरपूरची एकादशी, तर कार्तिकी एकादशी ही आळंदीची एकादशी म्हणून मानली जाते . आषाढी एकादशीला वारकरी आळंदीहून पंढरपूरला जातात, तर कार्तिकी एकादशीला पंढरपूरहून आळंदीस येतात. आषाढी एकादशीला पांडुरंगाचे महात्म्य असते आणि कार्तिकी एकादशीला ज्ञानेश्वरांचे महात्म्य असते.

या दिवशी लोक उपवास करतात. भजन-कीर्तनात दिवस घालवितात. विठ्ठलाची महापूजा करतात.

 
 

मोक्षदा एकादशी

कुरूक्षेत्राच्या रणभूमीवर भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला जो उपदेश केला ती गीता ! तो दिवस मार्गशीर्ष शुध्द एकादशी हा होता. म्हणून या दिवसाला गीताजयंती असे म्हणतात. गीतेला आपण मोक्षदायिनी मानतो. म्हणून मग या एकादशीला मोक्षदा एकादशी असेही गौरविले गेले. ही मोक्षदा एकादशी आचरल्याने पितरांचा उध्दार होतो, त्यांना मोक्ष मिळतो, अशी परंपरेची श्रध्दा आहे. त्याची एक कथा आहे. ती कथा अशी - चंपक नगरीच्या वैखानस राजाच्या स्वप्नात एकदा त्याचे पितर आले. त्यांनी आपण सोसत असलेल्या नरकयातनांचे राजाकडे वर्णन केले. यामुळे दु:खी झालेल्या राजाने एका ऋषीला यावर उपाय सांगण्याची विनंती केली. त्या ऋषीने मोक्षदा एकादशी करण्याचा सल्ला राजाला दिला. त्याप्रमाणे राजाने मोक्षदा एकादशी केल्याने त्याच्या पितरांना मोक्ष मिळाला.

ही एकादशी निर्जला एकादशी सारखीच अतिमहत्त्वाची मानली जाते. म्हणजे ही एकादशी केली तर इतर सर्व एकादश्या केल्याचे पुण्य लाभते अशी लोक श्रध्दा आहे.

Share
 
Joomla SEO powered by JoomSEF